Marathas in Punjab 1758 : नजीब जिवंत हाती सापडला, त्याने होळकरांकडे जीवाची भीक मागितली आणि होळकरांची भीड रघुनाथरावांस मोडवली नाही, ६ सप्टेंबर १७५७ रोजी नजीब दिल्ली व त्याचे सर्व अधिकार सोडून आपल्या मुलुखात निघून गेला हे आपण गेल्या भागात पाहिले आहे.
नजीब जाताच रघुनाथरावांनी आलमगीर बादशहाला पुन्हा एकदा तख्तावर बसवले, गाजीउद्दीनला वजिरी, अहंमद बंगश याला मीरबक्षीगिरी देऊन दिल्लीचा बंदोबस्त लावण्यात आला. नजीबाने सोडलेली अंतर्वेदीतील ठाणी काबीज करत मल्हारराव होळकर, मानाजी पायगुडे, विठ्ठल शिवदेव, जनार्दन राम आणि गाजीउद्दीन वजीर यांच्या फौजा हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाऊन आल्या. सहाराणपूर येथे रोहिले आणि मराठ्यांची मोठी लढाई होऊन नजीबाचा गुरु कुतुबशहा जखमी होऊन पळून गेला. रोहिल्यांचा बिमोड झाला, अंतर्वेदित मराठ्यांची ठाणी बसली, जानेवारी १७५८ मध्ये होळकरांनी कुंजपुऱ्याचे ठाणेही काबीज करून घेतले आणि मराठे आता पुढची मसलत ठरवू लागले. दिल्लीतून रोहिल्यांची हकालपट्टी झाली, यातच थांबायचे की पुढे पंजाबच्या दिशेने कूच करायची हा मुख्य प्रश्न होता. बादशहा आणि वजीर यांची इच्छा होती की पंजाब अब्दालीच्या तावडीतून मुक्त करावा व त्यासाठी मराठ्यांनी आपली मदत करावी आणि शिखांची इच्छा होती की पंजाब आपल्या मुठीत असावा. असे असल्याने बादशहा, मराठे, शीख आणि अब्दाली अशा चार सत्तांची पंजाबसाठी हिसकाहिसकी होणार हे क्रमप्राप्त होते. यात बादशहा, मराठे आणि शीख हे तिघेही अब्दालीचे शत्रूच असल्याने आपसात समजुतीने उद्दिष्टे साध्य करून घ्यावीत अशी नीति या तिघांचीही होती.
पंजाबमधून पळालेला आदिनाबेग आता जालंधरजवळ तळ ठोकून होता आणि तैमूर आणि जहाँखान यांच्या विरोधात तो हळूहळू फौजेची जमवाजमव आणि कारस्थाने करीत होता. जालंधरच्या दोआबमध्ये त्याने चांगलेच हातपाय पसरले होते. आधी छत्तीस लाखांची खंडणी कबूल करून आता तो दरबारी हजेरी लावण्यास टाळाटाळ करत होता. असे असल्याने जहाँखानाने आदिनाबेग याला तैमूरशहाच्या दरबारी हजेरी लावावी अन्यथा अटक करून तुला दरबारात खेचून आणतो अशी धमकी दिली. ही धमकी येताच आदिनाबेग याने जम्मूजवळील शिवालिक टेकड्यांत पळ काढण्याची तयारी सुरू केली आणि आपला कोणाला संशय येऊ नये म्हणून मुघलांनी बेगम हिला मध्यस्थी करण्यास पाठवले. चिडलेल्या जहाँखानाने बेगमेलाही अटक केली आणि जालंधर ताब्यात घेतले.
पंजाबात अशी गडबड चालू आहे हे ऐकताच अब्दालीने मुलतान येथील आपला सुभेदार मुरादखान याला दहा हजार फौज घेऊन ताबडतोब जहाँखानाच्या मदतीस धाडून दिले. ही दहा हजार फौज आणि आपली फौज अशा संयुक्त सेनेचे नेतृत्व मुरादखान याला देऊन जहाँखानाने त्याला आदिनाबेगची कायमची खोड मोडण्यास मोहीमशीर केले. अफगाण फौज झपाट्याने बियास नदी ओलांडून निघाली, कारण आदिनाबेग होशियारपूरजवळ येऊन बसला आहे अशी बातमी मुरादखान याला मिळाली होती.
बातमी खरी असली तरी आदिनाबेग काही स्वस्थ बसलेला नव्हता. अलासिंग जाट, जस्सासिंग अहलुवालिया आणि जस्सासिंग रामगडिया हे तीन शीख सरदार मोठे शक्तिशाली झालेले होते. यातील जस्सासिंग अहलुवालिया याच्याशी आदिनाबेगने संधान बांधले. कर्तारपूर आणि अमृतसर येथे अफगाणांनी घातलेल्या धिंगाण्यामुळे शीख संतापलेले होतेच, त्यांनाही अब्दालीचे उट्टे काढण्याची आयती संधी चालून आली. आदिनाबेग आणि शीख यांचे मिळून पंचवीस हजार घोडदळ अफगाण फौजेवर महिलपूर येथे चालून गेले. अफगाण फौज आणि आदिनाबेगची फौज यातील फरक लक्षात यावा म्हणून शिखांनी आदिनाबेगला आपल्या फौजेच्या पागोट्यांत गवताचे तुरे बांधायला सांगितले आणि ही फौज अफगाणांवर तुटून पडली. अफगाण फौजेत हलक्या तोफा बऱ्याच होत्या, त्यांनी या घोडदळावर भडिमार सुरू केला, पण शीख घोडदळाच्या हल्ल्यांपुढे त्यांचा निभाव लागेना. बघता बघता अफगाण फौज उधळली गेली, मुरादखान जखमी होऊन लाहोरला पळून गेला आणि विजयी शीख फौजेने जालंधरवर धडक मारली (६ जानेवारी १७५८). कर्तारपूरच्या कत्तलीसाठी जबाबदार असलेल्या नासिरखानचे प्रेत त्याचे थडगे फोडून बाहेर काढण्यात आले. जालंधरमधील अफगाणांची साधनसामुग्री, रसद, दारूगोळा लुटण्यात आला आणि आता शीख फौजा लाहोरवर छापे मारू लागल्या. जालंधरच्या दोआबात ‘कडा प्रसाद’ म्हणून शीख सैन्य कर वसूल करू लागले. अफगाणांची सत्ता बघता बघता जालंधरमधून हद्दपार झाली.
जहाँखान हे बघून संतापाने फणफणत होता. लढाईतून पळून आलेल्या मुरादखानाला त्याने चाबकाने फोडून काढले, पण त्याने अफगाणांची गेलेली अब्रू परत थोडीच येणार होती? शिखांचे हे यश पाहून आदिनाबेगलाही मनात धडकी भरलेली होती. आज जरी हे लोक आपल्या बाजूने लढत असले, तरी आज ना उद्या मुघल सत्ता उलथवून ते आपले राज्य उभे करू शकतात या विचाराने त्याला झोप येईना. दुसरीकडे अब्दालीने प्रचंड फौज आणि तोफखाना पाठवला तर त्याच्यापुढे आपण कसे टिकणार हाही प्रश्न त्याला त्रास देऊ लागला होता, पण त्याच्या सुपीक डोक्यात एक कल्पना अशी आली की, अब्दाली आणि शीख डोईजड झाले तर शीख, या दोघांनाही भारी पडू शकणारे आलम हिंदुस्तानात जर कोणी असतील तर ते मराठेच आहेत, त्यामुळे आपण मराठ्यांना पंजाबात आणावे, त्यांच्याकडून जहाँखानाची आणि तैमूरची खोडकी मोडावी आणि शीख व मराठ्यांचेही भांडण लावून देऊन आपण लाहोरमध्ये सुकामेवा खात बसावे असा बेत त्याच्या डोक्यात शिजू लागला. पण, असे खरेच घडणार होते का?
संदर्भ : G. Singh (1959)- Ahmad Shah Durrani: Father of Modern Afghanistan. Bombay: Asia Publishing House.
अश्विन पुंडलिक
ashwin3009@gmail.com
Read About : Rent vs buy home India : भाड्याने राहून गुंतवणूक करणे फायदेशीर असते का?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.