Sharad Purnima : संस्कृत भाषेत शरद् हा द्कारान्त शब्द स्त्रीलिंगी आहे. या शब्दाचे एकूण तीन अर्थ होतात. त्यातले शरद ऋतू आणि संवत्सर म्हणजे वर्ष हे पहिले दोन अर्थ सर्वश्रुत आहेत. शेवटचा अर्थ मात्र अतिशय गहन आणि जाणीव समृद्ध करणारा आहे यात तिळमात्र शंका नाही. हा अर्थ समजावून घ्यायचा तर रसायनशास्त्राचा संदर्भ लक्षात ठेवायला हवा. रसायनशास्त्रात संयुग म्हणजे कंपाऊंड तयार होण्याची अंतिम अवस्था म्हणजे ‘इन फाईन कॉम्पोझिटी!’ या अवस्थेला संस्कृत भाषेत ‘शरद्’ म्हणतात.
एकदा का संयुग निर्माण झालं की त्याच्यातल्या घटकांना विलग करणं अतिशय कर्मकठीण, म्हणूनच शरद ऋतूदेखील अतिशय महत्त्वाचा आहे. सृष्टीच्या निरंतरतेसाठी आवश्यक असलेल्या जनन आणि प्रजनन या दोन्ही प्रक्रियांचा अन्योन्य संबंध अधोरेखित करणारा नवरात्री महोत्सव याच काळात साजरा करण्यात आला.
त्यानंतर येणारी आश्विन मासातली शरद पौर्णिमादेखील अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. या दिवशी चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह तिच्या सर्वांत जवळ असतो, त्यामुळे इतर अकरा पौर्णिमांपेक्षा त्याचा आकार मोठा आणि तेज अधिक प्रबल असतं. चंद्र किंवा चंद्रमा या संस्कृत शब्दाचा अर्थच चकाकणारा असा होतो. तो चकाकतो म्हणून त्याला चंद्र असं विशेष नाव आहे.
त्या शिवाय त्याला सोम (सोम वनस्पतीचा / अमृताचा स्वामी), शशांक / शशी (ज्याच्यावर सशाचे (शश) चिन्ह आहे असा), सुधाकर (अमृताचे हात असणारा), सुधांशु (अमृताचे किरण असलेला), निशाकर / निशापती/ रजनीश / रजनीनाथ/ राकेश (राका = रात्र तयार करणारा किंवा रात्रीचा स्वामी), इंदु (चमकदार किंवा पाण्याचा थेंब), मृगांक (हरणाचे (मृग) चिन्ह अंकित असणारा), रोहिणीकांत (रोहिणी नक्षत्राचा पती), कुमुदबान्धव (कुमुद (चंद्रप्रकाशी कमळ) फुलवणारा मित्र), ताराधिप / नक्षत्रपती (ताऱ्यांचा किंवा नक्षत्रांचा अधिपती), हिमांशू (ज्याचे किरण हिमासारखे आहेत असा).
प्राचीन भारतीय लोकांनी चंद्र या खगोलीय ज्योतिपिंडाकडे बघत आपल्या कल्पनाशक्तीला ताण दिला आणि त्यातून अनेक गोष्टींची निर्मिती झाली. त्यातली सर्वात लोकप्रिय कथा आहे ती समुद्रमंथनाची. सतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या देव आणि असुर यांच्यातलं वितुष्ट विकोपाला गेलं. देवांच्या मानानं असुरांची शक्ती चांगलीच भारी पडत होती. अखेर अमर होण्यासाठी अमृताची प्राप्ती करून घ्यावी असा विचार देवांनी केला. पण, एकट्या देवांना अमृत प्राप्तीसाठी करण्याचा क्षीरसागर मंथून काढण्याचा उद्योग काही जमणार नव्हता, म्हणून त्यांनी असुरांना मदतीसाठी विनवलं.
दोन्ही पक्षांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांना यश आलं आणि या समुद्र मंथनातून चौदा रत्नं प्रकटलीत. त्यापैकी फाल्गुन पौर्णिमेला प्रकटलेलं दहावं रत्न म्हणजे चंद्र. सनातन परंपरेत त्याला मनाचा कारक मानतात. मनोविज्ञान हे आधुनिक शास्त्रदेखील याची पुष्टी करतं. चंद्राच्या घटण्या वाढण्याचा परिणाम माणसाच्या मानसिक अवस्थेवर होत असतो, त्यामुळे पौर्णिमा आणि अमावास्येला मनोरुग्णांच्या वर्तनात बदल होत असतो.
दर दिवशी हा चंद्र वेगळ्याच आकारात दिसतो. याला भारतीयांनी म्हटलं ‘कला.’ ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी प्रत्येक दिवसाची कला मोजली आणि तिलादेखील नाव दिलं.
१. अमृता = अमृत किंवा उत्तम जीवनशक्ती देणारी,
२. मानदा = मनाला सुखकारक ,
३. पूषा = मानसिक/शारीरिक विकासासाठी पोषण करणारी,
४. तुष्टी = मनाला संतोष, तृप्ती आणि मानसिक शांती देणारी,
५. पुष्टि = शारीरिक बल, आरोग्य आणि समृद्धी वाढवणारी,
६. रति = प्रेम, आनंद आणि आकर्षणाची निर्मिती करणारी,
७. धृति = संयम, धैर्य आणि ज्ञान (विद्या) देणारी,
८. शशिनी = तेजस्विता आणि शुद्धतेनं परिपूर्ण अशी अंधार दूर करणारी,
९. चंद्रिका = शीतल प्रकाश आणि मन:शांती देणारी,
१०. कांति = सौंदर्य, कीर्ती आणि तेजस्विता ओतप्रोत असलेली,
११. ज्योत्स्ना = रात्रीचा अंधार दूर सारणारा दैवी प्रकाश,
१२. श्री = धन, ऐश्वर्य आणि लक्ष्मीचे स्वरूप असणारी,
१३. प्रीति = स्नेह, जवळीक आणि प्रेम वाढवणारी,
१४. अंगदा = स्थायित्व, शक्ती आणि शारीरिक पूर्णता देणारी,
१५. पूर्णा कार्य पूर्ण करण्याचं सामर्थ्य आणि पूर्णता दर्शवणारी,
१६. पूर्णामृता = अमृतानं परिपूर्ण अशी पौर्णिमेच्या दिवशीची सर्वोच्च केला.
दर पौर्णिमेला चंद्राची पूर्णामृता ही कला कार्यान्वित होत असली तरी शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असल्यामुळे पूर्णामृतातल्या अमृतत्वाचा आपण पृथ्वी आटवलेल्या दुधाशी चांगल्या प्रकारे संयोग होऊ शकेल हाच शरद पौर्णिमेचा महोत्सव साजरा करण्यामागचा विचार आहे.
चंद्र, लक्ष्मी आणि अमृत हे एकाच क्षीरसागरातून उत्पन्न झालेत, त्यामुळे ते एकमेकांचे सख्खे भाऊ-बहीण आहेत अशी सश्रद्ध भारतीयांची मान्यता आहे, त्यामुळे पूर्णामृताकलेला अनुसरून लक्ष्मीदेखील अवतरेल ही खात्रीच असल्यानं तिचं पूजन करण्याची परंपरा आहे. प्राचीन (१५व्या शतकापूर्वीची) विष्णुमंदिरांत मुख्य द्वारशाखेची वरची चौकट किंवा मंदिराच्या बाह्य भिंतींवर नवग्रह कोरलेले असतात, तर दक्षिण भारतात नवग्रहपीठच असतं. या दोन्हींत चंद्राचं शिल्प असतंच.
दानशिळेवर हे दान ‘आचंद्रदिवाकरौ’ आहे हे सांगणारे सूर्यचंद्र कोरलेले असतात. पण, महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी गावी असलेल्या मार्कं डादेव या शिवमंदिरात चंद्राचं एक स्वतंत्र आणि दुर्लभ शिल्प आहे. मुख्य मंडपातून गर्भगृहाकडे जाताना उजव्या भिंतीवर कोरलेला आहे, हाती अमृत कलश घेतलेला वाहन सशाला टेकून उभा असलेला चंद्र आणि त्याच्या खालच्या चौकटीत चंद्रकिरण टिपणारे चकोर पक्षीदेखील चांगले ठसठशीत कोरले आहेत. चंद्राच्या वर्णनानुसार मूर्ती घडवणाऱ्या शिल्पकाराला कोजागिरी पौर्णिमेची ही एकविसावी शिल्पगाथा समर्पित!!!
डॉ. रमा गोळवलकर
संपर्क : ९४२२११४६२०
Read About : Hungry Ghost Festival : भुकेल्या भुतांचा उत्सव
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.