७६ जखमी, तर १२००० नागरिक सुरक्षित स्थळी
Tibet Earthquake 16 Dead : बीजिंग/ल्हासा : चीनशासित तिबेट या स्वायत्त प्रदेशात गुरुवारी रात्री उशिरा शक्तिशाली भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.० एवढी नोंदवली गेली. त्यानंतर अनेक तास भूकंपाचे धक्के जाणवत राहिले. या भूकंपामुळे किमान १६ जणांचा बळी गेला असून, ७६ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ११ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. भूकंपानंतर युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले व सुमारे १२,००० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. नागकू क्षेत्राला या भूकंपाचा सर्वाधिक मोठा फटका बसला असून, इथे ३३९ घरांची पडझड झाली. तर भयभीत झालेले हजारो नागरिक सैरावैरा पळत सुटल्याचे पाहायला मिळाले.
या भूकंपाविषयी सविस्तर वृत्त असे की, चीनच्या तिबेट क्षेत्रात स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भूकंप झाला. सुमारे ७.० तीव्रतेच्या या शक्तिशाली भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली. या भूकंपामध्ये आतापर्यंत किमान १६ जणांचा मृत्यू झाल्याची आणि ७६ जण जखमी झाल्याची पुष्टी झाली. उत्तर तिबेटमधील नागकू शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये शेकडो घरे जमीनदोस्त झाली. तर अनेक महत्त्वाचे रस्ते आणि दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाली. या भूकंपानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य हाती घेतले.
भूकंपग्रस्त भागात पीडितांसाठी तात्पुरती राहण्याची सोय, तंबू आणि आवश्यक मदत साहित्य पोहोचविले जात आहे. गेल्या पाच वर्षांत तिबेट क्षेत्रात आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. अमेरिकन जिऑलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, हा भूकंप स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजून ३३ मिनिटांच्या सुमारास झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू नागकू शहरापासून सुमारे १९१ किलोमीटर ईशान्य दिशेला होता. भूकंपाची खोली सुमारे १८ किलोमीटर नोंदवली गेली. नागकू हे तिबेटची राजधानी ल्हासापासून साधारण ३०० किलोमीटरहून अधिक उत्तरेकडे स्थित आहे.
नागकू भागात सर्वाधिक नुकसान
या भूकंपाचा सर्वाधिक फटका तिबेटचे उत्तरेकडील शहर नागकू आणि परिसराला बसला. इथे किमान ३३९ घरे कोसळल्यामुळे मोठ्या संख्येने लोक बेघर झाले. भूकंपानंतर स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले. भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी सुमारे १,६०० हून अधिक प्रतिनिधी जुंपले असून, असंख्य बचाव पथके तैनात आहेत. प्रशासनाने पीडितांसाठी १,००० तयार घरे, सुमारे ३,००० तंबू, फोल्डिंग खाटा, टॉर्च आणि थंडीपासून बचावासाठी आवश्यक कपडे पाठवले आहेत.
दळणवळण सेवा विस्कळीत
भूकंपामुळे अनेक भागांमधील दळणवळण सेवा विस्कळीत झाली. काही क्षेत्रांशी संपर्क तुटल्यामुळे प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी वेळ लागत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनानेभूकंपग्रस्त क्षेत्रातून धावणाऱ्या गाड्यांची वाहतूक तात्पुरती थांबवली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे व भूस्खलन झाले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३१७ चा काही भाग बंद करण्यात आला. सध्या या मार्गावरून केवळ मदत व बचाव कार्य संबंधित वाहनांनाच जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या रस्त्यावरील ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे.
पुढील तीन दिवस बर्फवृष्टीची शक्यता
हवामान खात्याने भूकंपग्रस्त क्षेत्रात पुढील तीन दिवस अधूनमधून बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे मदत आणि बचाव कार्यामध्ये आणखी अडथळे उत्पन्न होऊ शकतात. प्रशासनाने बचाव पथकांना हवामानाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.