Ad Advertisement Ad Advertisement

China Dark Tourism Trend : चीनमध्ये कृत्रिम वादळ आणि पुराचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी!

चीनमध्ये कृत्रिम वादळ, पूर, भूकंप आणि आगीचा थरार अनुभवण्यासाठी तरुणांची गर्दी; आपत्तींचे अनुकरण करणारी केंद्रे, ‘डार्क टुरिझम’ लोकप्रिय

बीजिंग : China Dark Tourism Trend पर्यटन म्हटले की डोंगर, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक स्थळे डोळ्यांसमोर येतात. मात्र, चीनमध्ये पर्यटक चक्क कृत्रिम वादळ, पूर आणि भूकंपाचा थरार अनुभवण्यासाठी पैसे खर्च करत आहेत. आपत्तींचे अनुकरण करणारी केंद्रे आणि मृत्यू-विनाशाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचा ‘डार्क टुरिझम’ हा नवा ट्रेंड विशेषत: तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.
चीनमधील चोंगकिंग येथील २८ वर्षीय लिओन ल्व्ह हिने हांगझोऊ येथे जाऊन कृत्रिम पूरस्थितीचा अनुभव घेतला. पाण्याच्या प्रचंड प्रवाहात ती काही क्षणांसाठी घाबरली आणि तिला आपण खऱ्या आपत्तीत असल्यासारखे वाटले. मात्र, या अनुभवातून पुरात शांत कसे राहावे, शरीराची योग्य स्थिती कशी ठेवावी आणि स्वत:चा बचाव कसा करावा, हे शिकल्याचे तिने सांगितले.

हांगझोऊमधील ‘ल्व्हशिंग बेस’ या कंपनीने २०२४ मध्ये सुमारे दोन लाख चौरस मीटर क्षेत्रावर आपत्ती अनुभव केंद्र सुरू केले. येथे वादळे आणि चिखलाचे प्रवाह यांसारख्या परिस्थिती निर्माण केल्या जातात. कंपनीचे व्यवस्थापक वांग कुआंगहान यांच्या मते, येथे येणाऱ्या वैयक्तिक पर्यटकांमध्ये २० ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण मोठे आहे. पुढील तीन वर्षांत चीनमध्ये आणखी पाच केंद्रे सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

भूकंप, आग आणि त्सुनामीचा अनुभव

बीजिंगमधील सार्वजनिक सुरक्षा संग्रहालयात कृत्रिम भूकंप, त्सुनामी आणि आगीचे अनुभव दिले जातात. ग्वांगझूमध्येही आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी पाच मजली केंद्र उभारण्यात आले आहे. चीनमध्ये २०२५ मध्ये विक्रमी उष्ण दिवस नोंदवले गेले, तर १० वादळांचा तडाखा बसला. आपत्तींमुळे सुमारे ६.७ कोटी लोक प्रभावित झाल्याचे देशाच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने सांगितले. China Dark Tourism Trend

विनाशाच्या ठिकाणांनाही पर्यटकांची पसंती

China Dark Tourism Trend काही पर्यटक प्रत्यक्ष शोकांतिकांशी संबंधित स्थळांनाही भेट देत आहेत. २००८ मधील सिचुआन भूकंपात ७० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. बेइचुआनमधील उद्ध्वस्त इमारती आजही जतन करण्यात आल्या आहेत. नानजिंग हत्याकांड स्मारकालाही पर्यटकांची वाढती पसंती मिळत आहे.

पर्यटनासोबत आपत्तीविषयक जागरूकता

२०२४ मध्ये चीन सरकारने आपत्तीविषयक शिक्षणासाठी प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या केंद्रांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले. तज्ज्ञांच्या मते, नव्या पिढीला केवळ प्रसिद्ध स्थळे पाहण्यापेक्षा अनुभवातून शिकण्याची इच्छा आहे. त्यामुळे मनोरंजनासोबत सुरक्षितता, आपत्ती व्यवस्थापन आणि इतिहास समजून घेण्याची संधी देणारे पर्यटन लोकप्रिय होत आहे.

Read About : Newborn baby viral video – नवजात बाळाचा रॉयल स्वॅग व्हायरल – 2026

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.