Ad Advertisement Ad Advertisement

Chennai OMR Road Accident – मेट्रोच्या कामादरम्यान रस्ता खचला; ५ फूट खड्ड्यात कार उलटली

चेन्नईच्या ओएमआर रोडवर मेट्रोच्या भूमिगत कामादरम्यान अचानक रस्ता खचला; कारमधील महिला आणि पुरुष थोडक्यात बचावले, वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाची धावपळ

चेन्नई – Chennai OMR Road Accident चेन्नईच्या वर्दळीच्या ओएमआर रस्त्यावर मेट्रोच्या कामादरम्यान रस्ता खचून ५ फूट खोल खड्ड्यात कार कोसळल्याची घटना तिरुवानमियूर एमआरटीएस स्टेशन आणि टायडेल पार्कजवळ घडली. व्यस्त आयटी कॉरिडॉरवर ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने परिसरात वाहतुक कोंडी झाली होती.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिगत काम सुरू असलेल्या भागात अचानक रस्त्याचा एक मोठा भाग खचला. सुरुवातीला एका पांढऱ्या रंगाच्या कारचे पुढचे चाक या खचलेल्या भागात अडकले. कारमध्ये एक पुरुष आणि एक महिला प्रवासी होते. कार पूर्णपणे खड्ड्यात जाण्यापूर्वीच दोघेही वाहनातून बाहेर पडले, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. त्यानंतर, बाजूने एक बस जात असताना रस्त्यावरील दबाव वाढला आणि ती कार थेट खड्ड्यात उलटली. हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्राथमिक तपासानुसार, मेट्रो पिलरसाठी आणि भूमिगत स्टेशनसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे रस्ता खचल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, चेन्नई मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून यामागचे नेमके तांत्रिक कारण शोधण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्या आधीच हलवण्यात आल्या असल्याने पाईपलाईन फुटल्यामुळे ही घटना घडलेली नाही.

या अपघातामुळे ओएमआर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. चेन्नई वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रस्ता बॅरिकेड्स लावून बंद केला. तसेच वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.

Read Also: MDH Masala Success Story : असली मसाले सच सच- एमडीएच
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.