महावितरणच्या अभियंत्यांकडून राज्यातील २,९१४ शाळांमध्ये जनजागृती
Mahavitaran electrical safety awareness campaign: मुंबई : विजेचा सुरक्षित वापर कसा करावा, विद्युत अपघात कसे टाळावेत आणि वीज बचतीचे महत्त्व काय, याची जाणीव आता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. महावितरणच्या अभियंत्यांनी राज्यभरातील २,९१४ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती अभियान राबवून सुमारे ६ लाख १९ हजार विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे दिले. चित्रमय सादरीकरणे, प्रात्यक्षिके आणि थेट संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विजेच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्युत यंत्रणेविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे लहान मुले आणि विद्यार्थ्यांना विद्युत अपघातांचा धोका असतो. हा धोका कमी करण्यासाठी महावितरणने १५ दिवस हे अभियान राबविले. ओल्या हातांनी विद्युत उपकरणांना स्पर्श न करणे, उघड्या तारांपासून दूर राहणे, वीजवाहिन्यांजवळ खेळणे टाळणे आणि विद्युत उपकरणांमध्ये बिघाड आढळल्यास मोठ्यांना माहिती देणे, अशा सुरक्षिततेच्या उपायांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न
वीज निर्मितीपासून ती घरापर्यंत पोहोचेपर्यंतची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. विनाकारण दिवे आणि विद्युत उपकरणे सुरू न ठेवणे, विजेचा काटकसरीने वापर करणे तसेच सौरऊर्जेसारख्या हरित ऊर्जेचे महत्त्व यावरही भर देण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वीज वापराबाबत जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रात्यक्षिक
पुण्यातील ‘द पुना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड’ या शाळेत अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रात्यक्षिक घेण्यात आले. आवाज, स्पर्श आणि गंध यांच्या माध्यमातून संभाव्य विद्युत अपघाताचा धोका कसा ओळखावा, याची माहिती देण्यात आली. अनेक शाळांमध्ये प्रश्नोत्तरांचे सत्र आणि विद्युत सुरक्षेवरील चित्ररंगभरण स्पर्धाही आयोजित करण्यात आली.
विभागनिहाय शाळांची संख्या
या अभियानांतर्गत कोकण विभागातील ९४६ शाळांमधील २ लाख १४ हजार, नागपूर विभागातील ८९९ शाळांमधील १ लाख ७१ हजार, पुणे विभागातील ८२७ शाळांमधील १ लाख ६९ हजार, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील २४२ शाळांमधील ६५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत विद्युत सुरक्षेचा संदेश पोहोचवण्यात आला.
महत्वाचे मुद्दे
Read About: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.