Llandovery Castle hospital ship attack : रुग्णालयावर हल्ला करणं हे मुळात बेकायदेशीर आहे. रुग्णालयाच्या जहाजावर हल्ला करण्याचा आदेश पाळणं हेदेखील बेकायदेशीरच होतं, यामुळे बेकायदेशीर आदेशांचं पालन करणं हेदेखील बेकायदेशीर आहे, याचं जागतिक सैन्यांसाठी हे एक उदाहरण बनलं.
युद्धकाळात रुग्णवाहू जहाजावरही असं संकट कोसळेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. २७ जून १९१८ चा दिवस. हॅलिफॅक्सहून लिव्हरपूलला जाणाऱ्या ‘लँडोव्हरी कॅसल’ या रुग्णवाहू जहाजावर ६४४ जखमी सैनिक होते. जहाजावर कॅनेडियन आर्मी मेडिकल कॉर्प्सचे कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि मदतनीस मिळून २५८ जण होते. लँडोव्हरी कॅसलच्या संरक्षणासाठी, जहाजाच्या डेकच्या वर लाल क्रॉसचा लाईट चालू होता, त्यामुळे अगदी रात्रीही ते जहाज रुग्णवाहू आहे, लढाईसाठी नाही हे स्पष्ट कळत होतं. पण, रात्रीच्या वेळी जर्मन पाणबुडी यू-८६ ने जहाजाला अडवलं. नुसतं अडवलं नाही तर त्यांनी टॉर्पेडो वापरून जहाजावर हल्ला केला.
टॉर्पेडो इंजिनरूमवर आदळलं. जहाजाचा रेडिओ निकामी झाला, त्यामुळे कॅप्टन ए. आर. सिल्व्हेस्टर मदतीसाठी संदेशही पाठवू शकले नाहीत. त्यांनी लगेच जहाज सोडून देण्याचा आदेश दिला. जहाज बुडायला दहा मिनिटंही लागली नाहीत. पण, टॉर्पेडोच्या स्फोटातून वाचलेले अनेक खलाशी आणि वैद्यकीय कर्मचारी जहाज बुडायच्या आधी लाईफबोटमध्ये जाण्यात यशस्वी ठरले. पण, माणसांनी दिलेल्या संकटाला समुद्रानेही साथ दिली. तिथे जहाजाच्या ढिगाऱ्यामुळे एक भोवरा तयार झाला. त्यात जेमतेम तीन ते चारच लाईफबोटी वाचल्या आणि बाकी त्या भोवऱ्यात अडकून प्रवाश्यांसह बुडाल्या.
ज्या तीन लाईफबोटी वाचल्या, त्यातल्या एकावर कॅप्टन सिल्व्हेस्टर होते. ते त्या लाईफबोटीच्या आधारे जे इतर वाचलेले होते आणि पाण्यात पोहत होते त्यांना लाईफबोटीवर घ्यायचा प्रयत्न करत होते. जहाजाचे काही महत्त्वाचे अवशेष तरंगत होते, तेही उचलायचा प्रयत्न ते करत होते. तेवढ्यात, यू-८६ पाणबुडीवरील एका सैनिकाने कॅप्टनच्या लाइफबोटीला पाणबुडीच्या बाजूला येण्याचा आदेश दिला. कॅप्टनने लगेच आदेश पाळला नाही, तेव्हा इशारा म्हणून गोळी झाडण्यात आली. त्यानंतर कॅप्टन सिल्व्हेस्टर यांना पाणबुडीवर येण्यास सांगण्यात आलं आणि लँडोव्हरी कॅसलवर अमेरिकन वैमानिकांना घेऊन जात असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. जर ते खरं असतं तर हा युद्धाच्या नियमांचा भंग ठरला असता.
कॅप्टनने हा आरोप नाकारला आणि जर्मनांना सांगितले की ते फक्त कॅनेडियन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घेऊन जात होते. लाईफबोटमधील आणखी एक वाचलेले, मेजर टी. लायन नावाचे डॉक्टर यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी आपण अमेरिकन वैमानिक असल्याचं नाकारलं. लँडोव्हरी दारूगोळा घेऊन जात असल्याचा आरोपही त्यांनी खोडून काढला. सिल्व्हेस्टर आणि लायन लाईफबोटवर परतले, पण यू-बोट तिथून गेली नाही. थोड्याच वेळात लाईफबोट दूर वाहत जात असताना, त्यातील लोकांनी यू-बोटवर बसवलेल्या मागच्या तोफेतून गोळीबार झाल्याचं ऐकलं. दोन गोळे त्यांच्या डोक्यावरून गेले. वाचलेल्या इतर लाईफबोट्सवर आणखी सुमारे बारा गोळ्या झाडण्यात आल्या.
जहाज बुडाल्याने आणि त्यानंतर लाइफबोट्सवर झालेल्या मशीनगनच्या हल्ल्यात एकूण २३४ डॉक्टर, कॅनेडियन आर्मी मेडिकल कॉर्प्सचे सदस्य, सैनिक आणि खलाशी असे सगळे मरण पावले. यामध्ये १४ परिचारिकांचा समावेश होता. वाचलेले फक्त २४ जण होते.
जहाजातले सार्जंट आर्थर नाईट हे नर्सेसबरोबर पाच क्रमांकाच्या लाईफबोटमध्ये होते जे वाचले. त्यांनी एक हृदय प्रसंग सांगितला. ‘अचानक जहाजाचा मागचा डेक तुटून जहाज बुडू लागलं.
पाण्यात निर्माण झालेल्या भोवऱ्यातल्या ओढीने आम्हाला पटकन निर्वात पोकळीत खेचलं. बोट एका बाजूला कलंडली आणि त्यातला प्रत्येक जण पाण्यात बुडाला. पण, जहाजावर रुग्णांची सेवा करणारी प्रत्येक नर्स जीवावर उदार होऊन काम करत होती. शेवटच्या काही क्षणात आम्ही बोटीत सुमारे आठ मिनिटं एकत्र होतो. त्या संपूर्ण काळात मला एकाही सिस्टरकडून कोणतीही तक्रार किंवा कुरकूर ऐकू आली नाही. मदतीसाठी कोणतीही हाक नव्हती किंवा भीतीचे कोणतेही बाह्य लक्षण नव्हतं’.
या सगळ्या प्रसंगात जर्मनांनी ‘मानवी हक्कांचे रक्षण करणं आणि युद्धातील क्रूरता मर्यादित करणं’ या दोन्ही नियमांचं उल्लंघन केलं. जर्मन पाणबुडीचा कॅप्टन, फर्स्ट-लेफ्टनंट हेल्मुट पॅट्झिग याने पाणबुडीच्या लॉगबुकमध्ये जहाज बुडाल्याची नोंद केली नाही. त्याऐवजी लॉगबुकमध्ये असं नमूद केलं होतं की, लँडोव्हरी कॅसल ज्या ठिकाणी बुडाली, त्या ठिकाणापासून पाणबुडी खूप दूर होती. पॅट्झिगने आपल्या कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल कधीही न बोलण्याची सूचनाही दिली होती.
पण, वाचलेल्या २४ जणांच्या साक्षींमुळे ही जहाज दुर्घटना लवकरच सार्वजनिक झाली.
युद्धानंतर, पॅटझिगसह तीन जर्मन अधिकाऱ्यांवर युद्धगुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला. पण, खटल्यापूर्वीच कमांडर पळून गेला. इतर दोन अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं. रुग्णालयावर हल्ला करणं हे मुळात बेकायदेशीर आहे. रुग्णालयाच्या जहाजावर हल्ला करण्याचा आदेश पाळणं हेदेखील बेकायदेशीरच होतं, यामुळे बेकायदेशीर आदेशांचं पालन करणं हेदेखील बेकायदेशीर आहे, याचं जागतिक सैन्यांसाठी हे एक उदाहरण बनलं.
दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या न्युरेमबर्ग खटल्यांमध्ये, जर्मन अधिकारी केवळ आदेशांचे पालन करत होते, हा बचाव न्यायाधीशांनी फेटाळून लावला. युद्धात देशासाठी लढतानाही माणुसकी जिवंत ठेवायलाच हवी हेच यातून स्पष्ट होतं.
स्मिता पोतनीस
संपर्क : ९८२०६११२०६
Read About : Hungry Ghost Festival : भुकेल्या भुतांचा उत्सव
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.