मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर घेतला निर्णय
Raj Thackeray Modi Adani documentary deleted : मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी सबीर भाटिया यांची ३६ मिनिटांची वादग्रस्त डॉक्युमेंट्री सोशल मीडियावरून डिलीट केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त यांच्या विनंतीचा मान राखत आपण डॉक्युमेंट्रीची पोस्ट डिलीट करतोय, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. सबीर भाटियांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अवघ्या ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. जी आग लागायची ती लागली आहे. हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला, असेही राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्या संबंधांवर भाष्य करणारा सबीर भाटिया यांनी तयार केलेला एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी आपल्या समाजमाध्यमांवरून शेअर केला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. ही डॉक्युमेंटरी डिलीट होण्याआधी पाहून घ्या, असा संदेश राज यांनी त्यावेळी दिला होता. मात्र, काही तासांनंतर खुद्द राज यांनाच ही डॉक्युमेंटरी हटवावी लागली आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपले गुपित फुटेल याची भीती निर्माण होणे हे स्वाभाविक होते. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी, अशी विनंती केली गेली असावी.
मुळात मला जे म्हणायचे होते ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केले गेले; यातून देशाचे प्रबोधन होणे हाच उद्देश होता आणि आहे. पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच, म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
उद्योगपतींच्या नव्हे एकाधिकारशाहीच्या विरोधात
माझा कोणत्याही व्यक्तीला, उद्योगपतीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितले की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी. पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदाणीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे.
वनजमिनी उद्योगपतींच्या घशात
महाराष्ट्रातील अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजून घालायच्या ठरवल्या आहेत. आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय, हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
Read About : Manoj Jarange audio clip controversy- जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.