शस्त्रसाठा संपण्याच्या मार्गावर, चीनचा धोका वाढला
वॉशिंग्टन : इराणविरोधातील अमेरिकेची लष्करी कारवाई सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू असून, या युद्धाचा परिणाम आता अमेरिकेच्या क्षेपणास्त्र आणि हवाई संरक्षण क्षमतेवर दिसू लागला आहे. काही ठिकाणी एका इराणी ड्रोन किंवा क्षेपणास्त्राला पाडण्यासाठी दोन ते तीन इंटरसेप्टर डागण्यात आले. त्यामुळे अमेरिकेचा शस्त्रसाठा संपण्याच्या मार्गावर असून मित्रराष्ट्रांना चीनचा धोका वाढला आहे. इराणकडून सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू असताना अमेरिकेने त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महागडे इंटरसेप्टर वापरले आहेत.
फेब्रुवारी ते जुलैदरम्यान अमेरिकेच्या पॅट्रियाट इंटरसेप्टरच्या सुमारे ६५ टक्के साठ्याचा वापर झाला. युद्धापूर्वी सुमारे २,३३० इंटरसेप्टर उपलब्ध होते; त्यापैकी आता ८५० पेक्षा कमी उरल्याचे सांगितले जाते.
याशिवाय पहिल्या चार आठवड्यांत अमेरिकेने ८५० हून अधिक टोमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १,००० हून अधिक पॅट्रियाट व थाड इंटरसेप्टर वापरल्याचे अहवाल आहेत. एटीएसीएमएस आणि पीआरएसएम या अचूक दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचाही मोठा साठा संपल्याचे वृत्त आहे.
चीनविरोधातील तयारीवर परिणाम?
अमेरिकेच्या संरक्षण उद्योगाला हे साठे वेगाने भरून काढण्यात अडचणी येत आहेत. पॅट्रियाट इंटरसेप्टरचे उत्पादन वाढवण्याची योजना असली तरी पूर्ण साठा पुनर्संचयित होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.
याचा सर्वाधिक परिणाम युरोप आणि आशियातील अमेरिकेच्या मित्रदेशांवर होण्याची शक्यता आहे. जपान, तैवान आणि दक्षिण कोरियाला शस्त्रपुरवठ्यात विलंब होत आहे. दरम्यान, चीनने तैवानभोवती लष्करी दबाव वाढवला आहे. त्यामुळे इराणमधील दीर्घकाळ चालणारे युद्ध अमेरिकेची चीनविरोधातील लष्करी तयारी कमकुवत करू शकते, अशी चिंता अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये वाढत आहे.
