Ad Advertisement Ad Advertisement

Japanese GCCs in India : अरे वा…100 हून अधिक जपानी कंपन्यांची भारतात जागतिक क्षमता केंद्रे

एआय, सायबर सुरक्षा आणि अभियांत्रिकी क्षेत्रात जपानी कंपन्यांचा वाढता भर; बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे ठरत आहेत प्रमुख केंद्रे

नवी दिल्ली : Japanese GCCs in India भारतातील तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग कौशल्याचा फायदा घेण्यासाठी १०० हून अधिक जपानी कंपन्यांनी भारतात आपली जागतिक क्षमता केंद्रे (ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्स – जीसीसी) स्थापन केली आहेत किंवा त्यांचा विस्तार केला आहे.
रिअल इस्टेट सेवा फर्म ‘कुशमन अँड वेकफिल्ड’च्या अहवालानुसार, जपानी कंपन्यांचा भर आता केवळ बॅक-ऑफिस कामे किंवा खर्च कमी करण्यावर नसून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), अभियांत्रिकी, उत्पादन विकास आणि सायबर सुरक्षा यांसारख्या उच्च-मूल्याच्या तंत्रज्ञानावर आहे.
जपानी ‘जीसीसी’ आता डिजिटल उत्पादन विकास, एआय, स्वयंचलन आणि प्रगत विश्लेषणासाठी उत्कृष्टता केंद्र (सेंटर्स ऑफ एक्सलन्स) म्हणून काम करत आहेत. हे केंद्र जपानी कंपन्यांच्या जागतिक व्यावसायिक निर्णयप्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि कारणे

कुशमन अँड वेकफिल्डच्या व्यवस्थापकीय संचालक अर्पिता श्रीवास्तव म्हणाल्या, हा आता आउटसोर्सिंगचा विषय राहिलेला नाही. जपानी कंपन्या केवळ खर्च कमी करण्यासाठी भारतात येत नाहीत, तर त्या व्यवसाय मूल्य निर्माण करणारे, नवकल्पनांना चालना देणारे आणि जागतिक उपक्रमांना पाठिंबा देणारे धोरणात्मक केंद्र उभारतात. भारतात दरवर्षी सुमारे २५ ते २८ लाख विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शाखेचे पदवीधर तयार होतात. या मोठ्या मनुष्यबळामुळे जपानी कंपन्यांना कुशल तंत्रज्ञ सहज उपलब्ध होत आहे.

जीसीसीसाठी प्रमुख शहरे

बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे ही शहरे जपानी जीसीसीसाठी मुख्य आकर्षण ठरत आहेत. याशिवाय कंपन्या आता इतर नव्या शहरांचाही (दुसरी श्रेणी) विचार करत आहेत.

रिअल इस्टेट, भविष्यातील संधी

या विस्तारामुळे भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठा फायदा होत आहे. जपानी भांडवलाच्या मदतीने ऑफिस कॅम्पस, तंत्रज्ञान पार्क्स आणि रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म्स विकसित केले जात आहेत. पुढील दशकात जपानी कंपन्या भारतातील जीसीसी परिसंस्थेच्या विकासात आणखी मोठी भूमिका बजावतील आणि जपानी उद्योगांसाठी भारत हा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा स्रोत बनेल, असा विश्वास या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

Read About : Touchscreen Garment Fabric – जगातील पहिले टचस्क्रीन गारमेंट फॅब्रिक विकसित; आता कपड्यांवरच चालणार ॲप्स, 50 वेळा धुतल्यानंतरही टचस्क्रीन व्यवस्थित

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.