Hercule Poirot mystery : हरक्यूल पायरोला डायना मेबरली नावाच्या तरुणीने मदतीची विनंती केली. डायना आणि ह्यू चँडलर यांचा गेल्या वर्षभरापासून विवाह ठरला होता, परंतु ह्यूने अचानक हे लग्न मोडले. त्याला वाटत होते की आपण वेडे होत चाललो आहोत. त्याचे मूळ चँडलर कुटुंबातील मानसिक विकारांच्या इतिहासात दडले होते.
ह्यूचे आजोबा आणि त्याच्या वडिलांची आत्या या दोघांनाही वेड लागले होते. ह्यूचे वडील, ॲडमिरल चँडलर हे त्याची प्रकृती अधिक बिघडण्यापूर्वी त्याने नौदलातील नोकरी सोडावी म्हणून आग्रही होते. पण, मुलाला नौदलातून काढण्यामागचे खरे कारण लपवून, शेतीवाडी मालमत्ता याची व्यवस्था पाहण्यासाठी त्याची गरज असल्याचे सांगितले. हा खुलासा कोणाच्याही गळी उतरला नव्हता. कुटुंब, मित्र आणि ह्यूचा गॉडफादर असलेल्या कर्नल फ्रोबिशरलाही तो पटला नव्हता. पायरोने अधिक चौकशी केल्यावर डायनाने कबूल केले की जवळच्या शेतांमध्ये काही विचित्र घटना घडल्या होत्या. मेंढ्यांचे गळे चिरलेले आढळले होते.
मात्र, या घटनांचा ह्यूशी काही संबंध आहे असे तिला वाटत नव्हते. दुसरीकडे, ॲडमिरल आपल्या मुलाची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यासही तयार नव्हते. पायरो डायनासोबत चँडलर कुटुंबाच्या वाड्यावर, लायड मॅनर येथे गेला. तिथे त्याची सगळ्यांशी भेट झाली. ह्यू त्याला एखाद्या धष्टपुष्ट, उमद्या तरुण बैलासारखा वाटला. त्यानंतर कर्नल फ्रोबिशरकडून त्याला कुटुंबातील मानसिक विकारांच्या इतिहासाची जास्त माहिती मिळाली. ह्यूच्या आजोबांना तर वेड लागल्यामुळे मनोरुग्णालयात दाखल करावे लागले होते.
ह्यू दहा वर्षांचा असतानाच त्याच्या आईचा नौकाविहाराच्या अपघातात मृत्यू झाला होता. त्या वेळी ती ॲडमिरलसोबत नौकेत होती. खरेतर ॲडमिरलशी विवाह करण्यापूर्वी तिचे कर्नल फ्रोबिशरशी लग्न ठरले होते. मात्र, ब्रिटिश सैन्यातील नोकरीमुळे फ्रोबिशर भारतात गेला, त्यामुळेच तिचे ॲडमिरलशी लग्न झाले. भारतातून परतल्यावर फ्रोबिशरला हे समजले तरीही नंतर त्या दोघांमधील मैत्रीचे संबंध तुटले नाहीत. पायरोने मेंढ्यांच्या हत्येच्या घटनेबद्दल फ्रोबिशरकडून अधिक माहिती काढून घेतली.
त्या रात्री ॲडमिरलला ह्यूच्या कपड्यांवर रक्त लागलेले दिसले होते. ह्यूच्या खोलीतील बेसिनमध्येही रक्त होते. मात्र, आपण काय केले याची ह्यूला काहीच आठवण नव्हती. पायरोने ॲडमिरलचीही चौकशी केली. या घटनांना सुरुवात झाल्यापासून ॲडमिरलचे वय जणू झपाट्याने वाढले होते. ह्यूने डायनाशी असलेले लग्न मोडणे हेच सर्वांच्या हिताचे आहे असे त्याचे मत होते. ”माझ्या आणि माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर लायड मॅनरमध्ये चँडलर घराण्यातील कोणीही उरणार नाही,” असे तो उदासपणे म्हणाला.
ह्यूशी बोलताना पायरोला त्याच्या स्वप्नांविषयी समजले. त्याला वारंवार पाण्यासंबंधी भीतीदायक स्वप्ने पडत. त्याला भासही होत. पायरोशी बोलता बोलताच एकदम त्याला बागेत एक सांगाडा दिसला. तरीही पायरोला ह्यूच्या मानसिक संतुलनाविषयी शंका नव्हती. तो वेडा नसून या प्रकरणामागे काहीतरी वेगळे रहस्य आहे याची त्याला खात्री वाटू लागली. त्याने तपास सुरू केला. डायनाला त्याची रात्री वाड्यावर मुक्काम करण्यासाठी सोय करण्यास सांगितले. त्याने ह्यूची खोली तपासली. त्यानंतर तो तिथे दात घासण्याचा ब्रश विकत घेण्याच्या निमित्ताने स्थानिक औषधविक्रेत्याकडे गेला.
त्या रात्री ह्यूने स्वत:च्या बंद खोलीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. डायनाच्या खोलीबाहेर तो रक्ताने माखलेला चाकू हातात घेऊन आढळला. त्याने एका मांजराची हत्या केली होती. शुद्धीवर आल्यावर हे समजताच ह्यूला मोठा धक्काच बसला. नंतर बंदूक घेऊन ससे मारण्यासाठी बाहेर जाणार असल्याचे त्याने सर्वांना सांगितले, पण त्याचा खरा हेतू जंगलात जाऊन आत्महत्या करण्याचा होता. स्वत:ला आणि इतरांना पुढील यातनांपासून वाचवण्याचा त्याचा प्रयत्न होता.
पायरोने त्याला थांबवले आणि सर्वांना सांगितले की ह्यूला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे. गुन्हेगाराने ॲडमिरलच्या ॲट्रोपिनयुक्त डोळ्यांच्या औषधाचा वापर करून ह्यूला वेड्यासारखी लक्षणे निर्माण करण्याचा कट रचला होता. भारतात धतुऱ्याच्या विषबाधेविषयी फ्रोबिशरने सांगितलेल्या अनुभवांवरून त्याला ही कल्पना सुचली होती. ह्यूच्या शेव्हिंग क्रीममध्ये ॲट्रोपिन मिसळण्यात आले होते, त्यामुळे तो पदार्थ त्वचेतून शरीरात शोषला जात होता. परिणामी ह्यूला भास होत आणि तीव्र तहान लागत असे. त्याच वेळी गुन्हेगाराने प्राण्यांची हत्या करून त्याचे पुरावे ह्यूविरुद्ध पेरले होते. पायरोने ॲडमिरलवर या गुन्ह्याचा आरोप केला. कारण ॲडमिरलला समजले होते की ह्यू हा प्रत्यक्षात फ्रोबिशरचा मुलगा आहे.
पत्नीच्या अनैतिक संबंधाचा सूड घेण्यासाठी त्यानेच तिला पूर्वी नौकाविहारावेळी बुडवून मारले होते. आता ह्यूला संपवण्याचा कटही त्यानेच आखला होता. चँडलर कुटुंबात आनुवंशिक मानसिक विकार असल्यामुळे खरेतर ॲडमिरललाच त्या विकाराचा त्रास होता. डॉक्टरांनी ह्यूची तपासणी केली असती तर तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे स्वस्थ असल्याचे उघड झाले असते, म्हणूनच ॲडमिरल त्याला डॉक्टरांपासून दूर ठेवत होता. पायरोने औषधविक्रेत्याकडून ह्यूच्या शेव्हिंग क्रीमची तपासणी करून घेतली. ह्यू व फ्रोबिशर यांच्या हावभावांतील साम्य लक्षात घेऊन पायरोने आपला तर्क पडताळून पाहिला होता.
पायरोचे स्पष्टीकरण ऐकून ॲडमिरलने हे खोटे आहे असे म्हणून त्याची खिल्ली उडवली. पण, त्यानंतर त्याने ह्यूची बंदूक घेतली आणि ससे मारण्यासाठी जंगलाची वाट धरली. मग अचानक काही वेळातच बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला.
डॉ. सुनीता बागवडे
Read About : Meerut nurse murder case : लग्नाची गाठ, नव्हती नेहाच्या नशिबात
E-Paper : Punyanagari E-Paperस्पेशल फीचर


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.