Ad Advertisement Ad Advertisement

BP Singh Death – ‘दया, दरवाजा तोड दो’ चा आवाज घडवणारा पडद्यामागचा जादूगार हरपला

‘सीआयडी’ निर्माते बी. पी. सिंह यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, ‘सीआयडी’ आणि ‘आहट’ मधून घराघरांत पोहोचलेले नाव काळाच्या पडद्याआड

मुंबई : BP Singh Death – ‘दया, कुछ तो गडबड है!’ हा संवाद कानावर पडला की डोळ्यांसमोर उभे राहतात एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत आणि गुन्ह्यांचा छडा लावणारी ‘सीआयडी’ची संपूर्ण टीम. वर्षानुवर्षे प्रेक्षकांना रहस्य आणि थराराच्या दुनियेत खिळवून ठेवणाऱ्या या मालिकेच्या पडद्यामागून मात्र आज एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. प्रत्येक गुन्ह्याचे रहस्य उलगडणाऱ्या ‘सीआयडी’चा खरा शिल्पकारच काळाच्या पडद्याआड गेला आहे. लोकप्रिय मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक बी. पी. सिंह यांचे मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

‘सीआयडी’ आणि ‘आहट’मधून लाखो प्रेक्षकांच्या मनात घर

‘सीआयडी’ आणि ‘आहट’मधून लाखो प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या प्रतिभावान निर्मात्याच्या निधनाने मनोरंजनविश्व हळहळले आहे. पडद्यावर कितीही गुंतागुंतीचा गुन्हा असला तरी त्याचा छडा लागायचाच, पण आज ‘सीआयडी’च्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाला मात्र कोणतेच उत्तर नाही. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने भारतीय मनोरंजनविश्वात शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बी. पी. सिंह यांचे पूर्ण नाव बृजेंद्र पाल सिंह असे होते. ‘सीआयडी’ आणि ‘आहट’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय दूरचित्रवाणीवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. रहस्य, थरार आणि गुन्हेगारी तपास यांची प्रभावी सांगड घालणाऱ्या त्यांच्या मालिकांनी अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या कामाचा ठसा केवळ दूरचित्रवाणीच्या पडद्यावरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनावरही उमटला.

‘सीआयडी’ला घराघरांत पोहोचवले

१९९८ मध्ये प्रसारित होण्यास सुरुवात झालेली ‘सीआयडी’ ही मालिका भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील लोकप्रिय मालिकांपैकी एक ठरली. गुन्ह्यांचा तपास, संशयितांचा शोध, अनपेक्षित वळणे आणि प्रत्येक भागातील रहस्य यांमुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले.

या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक आणि निर्मितीप्रमुख म्हणून बी. पी. सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मालिकेच्या कथानकाची मांडणी, दृश्यांची बांधणी आणि तपासप्रक्रियेचे चित्रण यांतून त्यांनी प्रेक्षकांना वेगळा अनुभव दिला. अनेक वर्षे सुरू राहिलेल्या या मालिकेने भारतीय घरांमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली.

बी. पी. सिंह यांनी ‘सीआयडी’मध्ये पडद्यावरही भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेले डीसीपी शमशेर सिंह चितोळे हे पात्रही मालिकेच्या चाहत्यांसाठी परिचित होते. त्यामुळे ते केवळ मालिकेमागील सर्जनशील व्यक्तिमत्त्व नव्हते, तर प्रेक्षकांशी थेट जोडले गेलेले कलाकारही होते.

‘आहट’मधूनही निर्माण केला रहस्य थराराचा प्रभाव

बी. पी. सिंह यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘आहट’ ही भय आणि रहस्यप्रधान मालिका. सोनी टीव्हीवर १९९५ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांना भयकथा, गूढ घटना आणि अनपेक्षित प्रसंगांचा अनुभव दिला. ही मालिका २०१५ पर्यंत विविध टप्प्यांत प्रसारित झाली.

गुन्हेगारी तपास आणि भय-रहस्य अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मालिकांमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता बी. पी. सिंह यांनी दाखवून दिली. त्यांच्या अन्य प्रकल्पांमध्य ‘खाकी’, ‘अभय’आणि ‘सुपरकॉप्स व्हर्सेस सुपर व्हिलन्स’ यांचाही समावेश होता.

‘ते कामासाठीच जगत होते’- दयानंद शेट्टी

‘सीआयडी’ मालिकेत दयाची लोकप्रिय भूमिका साकारणारे अभिनेते दयानंद शेट्टी यांनीही बी. पी. सिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सिंह यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेची आणि समर्पणाची आठवण सांगितली.

दयानंद शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, बी. पी. सिंह यांचे संपूर्ण आयुष्य निर्मिती आणि आशयपूर्ण कार्यक्रम तयार करण्याभोवती केंद्रित होते. कामाबद्दल त्यांना प्रचंड आवड होती आणि ते आपल्या कामाशी पूर्णपणे समर्पित होते. शेट्टी यांनी त्यांना उत्कृष्ट कॅमेरामनपैकी एक म्हणूनही गौरवले.

बी. पी. सिंह यांची प्रकृती गेल्या काही काळापासून ठीक नव्हती, असेही शेट्टी यांनी सांगितले. त्यांच्या निधनाने ‘सीआयडी’शी संबंधित कलाकार आणि या मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

अशोक पंडित यांनी व्यक्त केला शोक

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून बी. पी. सिंह यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती, असे सांगत पंडित यांनी सिंह यांना जवळचा मित्र आणि उत्तम माणूस म्हणून संबोधले.

पंडित यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, बी. पी. सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. ‘सीआयडी’ आणि ‘आहट’ यांसारख्या मालिकांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशाचे मनोरंजन केले. त्यांचे काम भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी दिग्दर्शक संघटनेचे अध्यक्ष म्हणून बी. पी. सिंह कार्यरत असताना त्यांच्याशी जवळून काम करण्याची संधी मिळाली, अशी आठवणही अशोक पंडित यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, सिंह हे केवळ प्रतिभावान निर्माते-दिग्दर्शक नव्हते, तर एक संवेदनशील व्यक्ती आणि जिवलग मित्रही होते. त्यांच्या निधनाबद्दल कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींबद्दल सहवेदना व्यक्त करताना पंडित यांनी त्यांच्या मनोरंजनविश्वातील योगदानाची आठवण कायम राहील, असे नमूद केले.

२८ ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार

अशोक पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, बी. पी. सिंह यांच्या पार्थिवावर बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरही शोकसंदेश व्यक्त केले जात आहेत. अभिनेते अनूप सोनी यांनी ‘रेस्ट इन पीस सर’ अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

भारतीय टेलिव्हिजनवर कायम राहील ठसा

बी. पी. सिंह यांनी आपल्या कारकिर्दीत रहस्य आणि गुन्हेगारी कथांना लोकप्रियतेच्या नव्या उंचीवर नेले. ‘सीआयडी’मधील तपासाची पद्धत, पात्रांची ओळख आणि कथानकातील थरार यामुळे ही मालिका अनेक वर्षे प्रेक्षकांच्या चर्चेत राहिली. दुसरीकडे, ‘आहट’ने भय आणि गूढकथांच्या चाहत्यांना आकर्षित केले. एखादी मालिका लोकप्रिय होण्यासाठी केवळ कलाकारांचे योगदान पुरेसे नसते, तिच्यामागील दिग्दर्शकाची दृष्टी, निर्मात्याचे नियोजन आणि संपूर्ण टीमची मेहनतही तितकीच महत्त्वाची असते. बी. पी. सिंह यांनी आपल्या कामातून हे अधोरेखित केले.

आज ते आपल्यात नसले, तरी त्यांनी निर्माण केलेल्या मालिका, त्यांनी साकारलेली पात्रे आणि त्यांनी प्रेक्षकांना दिलेले मनोरंजन यांमधून त्यांची आठवण कायम जिवंत राहील. ‘सीआयडी’च्या प्रत्येक चाहत्यासाठी त्यांचे जाणे ही केवळ एका निर्मात्याची हानी नाही, तर भारतीय टेलिव्हिजनच्या एका महत्त्वाच्या पर्वाला पडलेला विराम आहे.

Read About: Kriti Sanon Varun Dhawan Reunion – ‘भेडिया’ची जोडी पुन्हा एकत्र

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.