चित्रपटांची जादू, उत्तराखंडमध्ये भाविकांची गर्दी, तर इटलीला जाण्यासाठी पर्यटकांची झुंबड
मुंबई : Hanuman Ansh and Cocktail 2 boost tourism – चित्रपट केवळ मनोरंजन करत नाहीत, तर पर्यटनालाही चालना देतात. चित्रपटांमध्ये दिसणारी सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाण्याचे नियोजन करतात. आता ‘हनुमान अंश’ आणि ‘कॉकटेल २’ या चित्रपटांमुळे पुन्हा एकदा हे पाहायला मिळत आहे. ‘हनुमान अंश’मुळे उत्तराखंडमधील कैंची धाम येथे भाविकांची गर्दी वाढली आहे, तर शाहिद कपूर, कृती सेनॉन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘कॉकटेल २’नंतर इटलीसाठीच्या प्रवास बुकिंगमध्ये ३८ टक्के वाढ झाल्याचे वृत्त आहे.
‘हनुमान अंश’मुळे कैंची धाम चर्चेत
उत्तराखंडमधील नैनीतालजवळ असलेले कैंची धाम हे नीब करौरी बाबांचे प्रसिद्ध आश्रम आहे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटामुळे या धार्मिक स्थळाविषयी लोकांची उत्सुकता वाढली आहे. गेल्या सप्ताहाअखेर येथे पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना नीब करौरी बाबांच्या आश्रमाला भेट देण्याची इच्छा होत आहे. त्यामुळे कैंची धामकडे पर्यटकांचा ओघ वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
गर्दी वाढली, हॉटेलचे भाडेही महागले
कैंची धाममध्ये पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला फायदा होत आहे. मात्र, गर्दीमुळे अनेक अडचणीही निर्माण झाल्या आहेत. ‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, सामान्यत: एका रात्रीसाठी २,००० ते ३,००० रुपये असणाऱ्या काही हॉटेल खोल्यांचे भाडे गर्दीच्या काळात ७,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पर्यटकांच्या वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून, स्थानिक सुविधांवरही ताण पडत आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासन नोंदणी व्यवस्था सुरू करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे.
‘कॉकटेल २’ची इटलीला पसंती; बुकिंगमध्ये ३८% वाढ
‘कॉकटेल २’ या चित्रपटाने इटलीच्या पर्यटनाला नवी चालना दिली आहे. चित्रपटातील अनेक दृश्ये इटलीतील सुंदर ठिकाणी चित्रित करण्यात आली आहेत. कतानिया, नोटो, सिराक्यूज, अवोला आणि मिलान यांसारख्या शहरांचे सौंदर्य प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.
चित्रपटातील नयनरम्य दृश्यांमुळे इटलीला भेट देण्याची इच्छा अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय पर्यटकांमध्ये या देशाची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसत आहे.
चित्रपट प्रदर्शित झाला अन बुकिंग वाढले
‘बॉम्बे टाइम्स’च्या वृत्तानुसार, ऑनलाइन प्रवास सेवा देणाऱ्या ्रइक्सिगो कंपनीचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक बाजपेयी यांनी या वाढीची माहिती दिली. ‘कॉकटेल २’ प्रदर्शित झाल्यानंतर वर इटलीला जाणाऱ्या आणि तेथून परत येणाऱ्या प्रवासाच्या बुकिंगमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ३८ टक्के वाढ झाली आहे. चित्रपटांचा पर्यटनावर होणारा हा परिणाम यापूर्वीही पाहायला मिळाला आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मुळे स्पेन, ‘थ्री इडियट्स’मुळे लडाखमधील पँगाँग सरोवर आणि ‘कहो ना प्यार है’मुळे न्यूझीलंडला प्रसिद्धी मिळाली होती.
चित्रपटांमुळे पर्यटनाला नवी दिशा
चित्रपटांमुळे एखाद्या ठिकाणाला प्रसिद्धी मिळते, पर्यटकांची संख्या वाढते आणि स्थानिक व्यवसायांना फायदा होतो. मात्र, अचानक वाढणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक, निवास आणि स्वच्छतेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पर्यटन वाढीसोबत आवश्यक सुविधांचे नियोजनही महत्त्वाचे आहे. ‘हनुमान अंश’ने धार्मिक पर्यटनाला चालना दिली, तर ‘कॉकटेल २’ने इटलीकडे पर्यटकांचे लक्ष वेधले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, चित्रपटांची जादू आता केवळ चित्रपटगृहांपुरती मर्यादित राहिलेली नाही, ती पर्यटकांना नवे ठिकाण शोधण्यासाठी आणि प्रवासाची बॅग भरून बाहेर पडण्यासाठीही प्रेरित करत आहे.
Read About:
Nana Patekar : नाना गेले पण नाना संपले नाहीतhttps://epunyanagari.com/nana-patekar/
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.