Geeta Indian girl Pakistan : एक दहा-बारा वर्षांची मूकबधिर मुलगी लाहोरच्या रेल्वेस्थानकात बेवारस आढळल्याने तिला कराचीतल्या इधी फाऊंडेशनकडे सोपवण्यात आले. इधी फाऊंडेशन भलेही पाकिस्तानातील असले तरी त्यांचे काम जगासाठी प्रेरणादायी आहे. बेवारस, निराधारांना आधार देवून त्यांच्यात जगण्याची उर्मी तयार करताना आतापर्यंत ५०,००० लोकांना त्यांनी नवीन जीवन दिले आहे.
१९५१ साली अब्दुल सत्तार इधी आणि त्यांच्या पत्नी बिल्कीस यांनी इधी फाऊंडेशनची स्थापना केली. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्याबरोबरच जगातील अनेक देशांत त्यांचे काम अविरतपणे सुरू असते. त्यांच्याकडील रुग्णवाहिकेच्या संख्येने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. असो. संस्थेत आलेल्या मूकबधिर मुलीला कुठलीच सांकेतिक भाषाही समजत नव्हती. तिला जवळ घेत फातिमा असे नामकरण केले, त्याचवेळी संस्थेच्या ध्यानात आले की तिचे वर्तन हिंदू असल्याने त्यांनी नाव बदलून गीता ठेवत तिला पूजा करण्यासाठी काही फोटो दिले. तिचे पालन पोषण सुरु असताना ती कोण, कुठली हे शोधण्यासाठी या दाम्पत्याने तब्बल १२ वर्षे खर्ची घातले. दरम्यान, सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट आल्याने त्यातील पाकिस्तानी मुलीला तिच्या देशात कसे पोहोचवले याची चर्चा झाली.
इधी फाऊंडेशनच्या लक्षात आले की, आपल्याकडील मुलगी ही भारतीय हिंदू असून तिला तिच्या पालकापर्यंत पोहोचवले पाहिजे. यासाठी सोशल मीडियावर तिचा फोटो शेयर करण्यात आला. ही बातमी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी लगेच हालचाल करत २६ आक्टोबर २०१५ ला गीताला भारतात आणले. या ठिकाणी गीताचा सांभाळ करून मूकबधिराची भाषा शिकवण्यासाठी तिला इंदौरच्या आनंद सर्व्हिसेस सोसायटीकडे सुपूर्द केले. याचे प्रमुख ज्ञानेंद्र पुराणिक यांनी तिला जुजबी भाषा शिकवून बोलते केले, तेव्हा ती आपल्या घराजवळ रेल्वे, ऊसाचे शेत, तळे आहे असे सांगायची. त्यावरून त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन मराठवाड्यासह तेलंगणातील अनेक गावांचा दौरा केला.
यादरम्यान भारतातील २४ कुटुंबांनी गीता आपलीच असल्याचा दावा केला. परंतु, पूर्ण खात्री झाल्याशिवाय सरकार तिला कोणाकडेही सोपवायला तयार नव्हते. अशावेळी गीताला परभणीतील पहल फाऊंडेशनचे अनिकेत शेलगावकर यांच्याकडे सोपवले. आश्चर्याची बाब म्हणजे गीताला तिचे मूळ गाव आणि आई-वडील याच जिल्ह्यात सापडले. त्यानुसार जिंतूर येथील मोलमजुरी करून जगणाऱ्या सुधाकर आणि मीना वाघमारे यांची ती मुलगी असल्याचे समजले. मूकबधिर असणाऱ्या या मुलीचे नाव आहे राधा वाघमारे.
१०-११ वर्षांची राधा २००० साली घरातून निघून गेली. कदाचित नांदेडवरून येणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसने ती अमृतसरला आणि तेथून ती चुकून समझौता एक्स्प्रेसने ती पाकिस्तानला पोहोचली. तिच्या सुदैवाने कराचीतील अब्दुल सत्तार यांच्या इधी फाऊंडेशनने तिचे छान संगोपन केले. भारतात आल्यानंतर तिच्या पुढील व्यवस्थेवर लक्ष ठेवणारे अब्दुल सत्तार यामुळे खूप सुखावले होते. दुर्दैवाने २०१६ साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर तिच्या आई बनून राहिलेल्या सुषमा स्वराज यांचेही निधन झाले.
२००० ते २०२१ या वर्षाचा राधाचा प्रवास थक्क करणारा ठरला. तिचे वडील सुधाकर यांचे निधन झाल्यानंतर आई मीना यांनी दिनकर पांढरे यांच्यासोबत दुसरा विवाह केल्याने त्या छत्रपती संभाजीनगरला स्थलांतरित झाल्या. थोड्याच दिवसांत दुसऱ्या वडिलांचेही निधन झाल्याने आई मीना पुन्हा एकट्या झाल्या. मूळ वाघमारे कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने पहल फाऊंडेशनने राधाला पूर्णत: कुटुंबाकडे सोपवलेले नव्हते.
२० वर्षांपूर्वी हरवलेली मूकबधिर मुलगी सापडल्याचा भलेही आनंद झाला असला तरी दुसऱ्या पतीपासून झालेल्या दुसऱ्या मुलीमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळालेला होता. परंतु, सर्वांचीच परिस्थिती बिकट असल्याने व आपल्या प्रकृतीमुळे माझ्यामागे राधाला कोण सांभाळणार अशाप्रकारची चिंता व्यक्त करत त्यांनी राधाला आश्रमातच ठेवावे असा सल्ला दिला.
कुटुंबिय मिळाल्यानंतरही राधा पुन्हा पोरकी झाली. खरंतर भारतात येणे म्हणजे तिचा हा प्रवास एक मृगजळ ठरला, कारण एक तर व्यंग आणि त्यातून २० वर्षांत तिने केलेल्या वाटचालीत भोगलेल्या यातना सांगण्याइतपत तिला तेवढे आकलन नव्हते. आईचा सहवास नसल्याने तिची ओढ नव्हती. सारासार विचार करून राधाला पुन्हा एकदा इंदौरच्या आनंद फाऊंडेशनकडे सुपूर्द करण्यात आले. तेथील पुराणिक दाम्पत्य तिची योग्य ती काळजी घेत आहेत. थोडेफार शिक्षण घेतल्यानंतर ती दिव्यांगासाठी काम करणार आहे.
यादरम्यान पाकिस्तानसारख्या देशात इधी फाऊंडेशनच्या माध्यमातून अब्दुल सत्तार यांच्या कार्याचा अभ्यास करता आला. तिला भारताकडे सोपवल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दिलेला एक कोटीचा धनादेश इधीने नाकारत सांगितले की, आम्ही सरकारी मदत न घेता लोकसहभागातून ही संस्था चालवत आहोत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे शेकडो रुग्णवाहिका आणि एक हेलिकॉप्टर असून देशांतर्गत कुठल्याही संकटात ते धावून जातात. पाकिस्तानसारख्या अस्थिर राष्ट्रात अब्दुल सत्तारसारखी माणसं राहतात याचे निश्चितच आश्चर्य वाटते. योगायोगाने अब्दुल चाचा फाळणीमुळे गुजरातमधल्या जुनागडमधून पाकिस्तानला स्थलांतरित झाले. एकदोन वेळा नोबेलसाठी त्यांचे नामांकन झाले होते, त्यामुळे एक अनाथ मुलगी चुकून पाकिस्तानसारख्या राष्ट्रात गेली तरी आई-वडिलांपेक्षा सुरक्षित हातात गेली होती.
प्रा. डॉ.सतीश कदम
संपर्क : ९४२२६५००४४
Read About : Florida Shipwreck Treasure : फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरचा खजिना
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.