Janaki Ammal sugarcane research : एक काळ असा होता की, साखरेसाठी भारत ऊस आयात करत असे. भारतातील ऊसापासून साखर तयार करणे तोट्याचा धंदा होता. अनेक संकटाचा सामना करून, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात गोड ऊसाचे वाण विकसित करून, देशाला साखरेचा प्रमुख उत्पादक बनण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करणारी एक महिला. शिक्षणापासून नोकरीपर्यंत केवळ मागासवर्गीय आणि महिला असल्याने उपेक्षा सहन करणारी, मात्र सदैव देशासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करणारी महिला संशोधक म्हणजे जानकी अम्मल.
म्हैसूर संस्थानचे डेप्युटी मॅजिस्ट्रेट दिवाणबहादूर इदावलथ कक्कत कृष्णन यांच्या द्वितीय पत्नी देवी यांच्या दहाव्या अपत्याच्या रूपात जानकींचा ४ नोव्हेंबर १८९७ ला जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देत. मात्र, त्याकाळी मुलींसाठी कलाशिक्षण योग्य मानत. जानकी यांनी मात्र हट्टाने विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. वडिलांना बागकामाची आवड असल्याने जानकी यांच्यात वनस्पतींची आवड आली असावी. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयातून चेन्नई येथील क्वीन्स मेरी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.
लगेच वुमन्स ख्रिश्चन महाविद्यालयात अध्यापनास सुरुवात केली. मात्र, महिला महाविद्यालय असूनही त्यांना भेदभावपूर्ण वागणूक मिळत होती, त्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा निर्णय घेतला. शिष्यवृत्ती मिळावी म्हणून त्यांनी अर्ज केले. त्यांना बार्बोर अध्ययनवृत्ती मिळाली. त्यांनी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात प्रवेश घेतला. १९२५ मध्ये त्यांनी एम. एस. ही पदवी प्राप्त केली. या काळात शिक्षक त्यांच्या प्रायोगिक कौशल्याने प्रभावित झाले होते.
शिक्षण पूर्ण होताच त्या भारतात परतल्या. मात्र, पुन्हा त्यांना अध्ययनवृत्ती देऊन संशोधनासाठी बोलावण्यात आले. अध्ययनवृत्ती देऊन संशोधनासाठी रूजू होणाऱ्या मिशिगन विद्यापीठातील त्या पहिल्या महिला संशोधक. १९३९ मध्ये त्यांच्या संशोधनकार्यावर डी.एस्सी. पदवी प्रदान केली. अमेरिकेत विज्ञानात डी.एस्सी. पदवी प्राप्त करणाऱ्याही त्या पहिल्या महिला संशोधक होत्या, त्यानंतर त्या पुन्हा भारतात परतल्या. त्रिवेंद्रमच्या महाराजा कॉलेज ऑफ सायन्स येथे अध्यापन करू लागल्या. मात्र त्यांना नवे ज्ञान मिळवायचे होते, संशोधन करावयाचे होते. त्याच काळात कोईमतूर येथे ऊस संशोधन केंद्र सुरू झाले. या केंद्रावर जास्त गोडी असणारे वाण बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
जानकी १९३४ मध्ये या केंद्रात प्रमुख जनुकशास्त्रज्ञ म्हणून रूजू झाल्या. तेथे वेकंटरमण हे संचालक होते. संकरित वाण तयार करण्यासाठी संकरयोग्य वाण निवडण्याची जबाबदारी जानकी यांच्यावर देण्यात आली. ऊसाच्या गटातील ज्वारी, मका आणि बांबू या वनस्पतींनी त्यांचे लक्ष वेधले. त्या काळातील ज्वारीचे धाटे सोलून खाण्याइतपत गोड असायचे. या संकरातून जास्त गोडीचे वाण तयार झाले. मात्र, तरीही अपेक्षित गोडवा मिळत नव्हता. अखेर इंपेरेटा अर्थात दुब या गवतवर्गीय वनस्पतीशी संकर घडवून त्यांनी अपेक्षित गोडी असणारा ऊसाचा वाण तयार केला. या वाणापासून गूळ आणि साखरेचे दुप्पट उत्पादन मिळू लागले.
या वाणाच्या सर्व चाचण्या जानकी यांनी पूर्ण केल्या. त्यांच्या संशोधनामुळे भारताने ऊस आयात करणे थांबवले. मात्र, हे उद्दिष्ट साध्य करताना त्यांनाच सर्व कामे करावी लागत. केंद्रातील पुरुष कर्मचाऱ्यांना एका मागास प्रवर्गातील महिला अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणे अपमान वाटे. शक्य असेल तेथे ते अडथळे आणत. ऊसावरील संशोधन पूर्ण होताच त्यांनी अन्य वनस्पती, प्रामुख्याने भाजीपाल्यापासून गवतापर्यंत संकरित वाण तयार करण्यासाठी प्रयोग सुरू केले. ज्ञानाची भूक त्यांना शांत बसू देत नव्हती.
त्यांनी मूळ उद्दिष्टात नसणारे प्रयोग सुरू केल्यामुळे संचालक वेंकटरमण खूश होते. मात्र, अन्य कर्मचाऱ्यांकडून असहकार वाढला. त्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. जानकी यांनी कधीच कसलाही भेदभाव केला नसला, तरी त्यांना इतरांच्या मनातील भेदभावामुळे असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत होते. याचा परिणाम संशोधनावर होऊ लागला. समजावून सांगूनही परिस्थिती बदलत नव्हती. संचालक पूर्णवेळ त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपलब्ध राहू शकत नव्हते.
अखेर १९४० मध्ये त्या इंग्लंडला गेल्या. तेथे जॉन इनस फलोद्यान केंद्रात चार वर्षे जनुक तज्ज्ञ म्हणून कार्यरत राहिल्या. १९४५ ते १९५० या काळात त्या रॉयल सोसायटीच्या फलोद्यान विभागात कार्यरत राहिल्या. या दहा वर्षांत त्यांनी इंग्लंडमधील वनस्पतीय जनुकांचा अभ्यास केला. इंग्लंडमध्येही त्यांनी अनेक संकरित वाण तयार केले. संशोधक सी. डी. डर्लिंग्टन यांच्यासमवेत ‘दि क्रोमोसोम ॲटलास ऑफ कल्टिवेटेड स्पेसीज’ हा आजही संदर्भासाठी वापरला जाणारा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यांनी औषधी वनस्पतींवरही मोठे संशोधन केले.
दरम्यान, भारत स्वतंत्र झाला होता. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जानकी यांच्या कार्याची माहिती समजली. पंडितजींनी जानकींची भेट घेऊन भारतात परतण्याची विनंती केली. खुद्द पंतप्रधानांनी केलेली विनंती कमला यांनी अव्हेरली नाही. त्यांनी भारताच्या बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचे संचालकपद स्वीकारले. लखनौ येथे बॉटॅनिकल गार्डनची स्थापना करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. भारताचा वनस्पतीशास्त्रीय नकाशा त्यांनी बनवला.
सेंट्रल बॉटॅनिकल लॅबोरेटरी, भाभा अणू संशोधन केंद्र अशा अनेक संस्थांत संशोधन करून त्या नव्या ज्ञानाचा शोध घेत राहिल्या. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी नोकरीतून निवृत्ती घेतली. मात्र, त्यांनी चेन्नई येथील विद्यापीठात संशोधन सुरू केले. त्यांचा पहिला शोधनिबंध १९३१ मध्ये तर अखेरचा शोधनिबंध वयाच्या ८६ व्या वर्षी १९८४ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर काही दिवसांत ७ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. ज्ञानाचा भुकेला एक झंझावात शांत झाला, मात्र भारताला गोड ऊसाची देणगी देऊन!
डॉ. व्ही.एन. शिंदे
संपर्क : ९६७३७८४४००
Read About : Science of Pandemics : महामारीचे सूक्ष्म विश्व
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.