Ad Advertisement Ad Advertisement

Tibet Mega Dam – ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाधरणामुळे भारत-बांगलादेशला पुराचा धोका?

१६८ अब्ज डॉलरचा प्रकल्प; भूकंप, भूस्खलन आणि हवामान बदलाचे संकट, भारताकडून ११,२०० मेगावॅटच्या सियांग धरणाची तयारी

बीजिंग : Tibet Mega Dam चीनकडून तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर (तिबेटमध्ये ‘यारलुंग त्सांगपो’) १६८ अब्ज डॉलर (सुमारे १४ लाख कोटी रुपये) खर्चून जगातील सर्वात मोठे धरण बांधले जात आहे. मात्र, या शतकात या नदीचा पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढणार असून येथे महापुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा गंभीर इशारा स्वत: चीनच्याच संशोधकांनी दिला आहे.

‘चाईनीज अकादमी ऑफ सायन्सेस’ आणि युनान विद्यापीठाच्या संशोधकांनी तिबेटमधील झाडांच्या बुंध्यातील वर्तुळांचा अभ्यास करून १३२५ ते २०२० या कालावधीतील पाण्याचा इतिहास अभ्यासला. या अभ्यासाच्या आधारे तयार केलेल्या मॉडेलनुसार, भविष्यातील हवामान बदलांमुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहात मोठी वाढ होईल आणि विनाशकारी पूर येण्याची शक्यता वाढेल. ‘चायना सायन्स बुलेटिन’ या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. Tibet Mega Dam

धरण प्रकल्पाचे प्रचंड स्वरूप

Tibet Mega Dam हे धरण तिबेटमधील मेडॉग (मोतुओ) जिल्ह्यात भारत-चीन सीमेजवळ बांधले जात आहे. या प्रकल्पाची वीजनिर्मिती क्षमता ६०,००० मेगावॉटपेक्षा जास्त असेल, जी चीनमधील सध्याच्या जगात सर्वात मोठ्या असलेल्या ‘थ्री गॉर्जेस’ धरणापेक्षा तिप्पट आहे.

हवामान बदलाचा फटका

तिबेटचे पठार जागतिक सरासरीच्या दुप्पट वेगाने तापत आहे. यामुळे तेथील बर्फ वितळण्याचे प्रमाण आणि पावसाचे चक्र वेगाने बदलत आहे. या बदलांचा परिणाम केवळ तिबेटवरच नाही, तर भारतासह संपूर्ण दक्षिण आशियातील पूर आणि दुष्काळाच्या परिस्थितीवर होणार आहे. Tibet Mega Dam

भूकंप आणि भूस्खलनाचा धोका

Tibet Mega Dam ज्या ठिकाणी हे धरण बांधले जात आहे, त्याच्या अगदी खाली एक सक्रिय भूकंपीय फॉल्ट लाईन आहे, असा इशारा जुलै महिन्यात चिनी भूगर्भशास्त्रज्ञांनी दिला होता. ऑगस्ट महिन्यात चीन-नेपाळ सीमेवर बर्फ आणि खडकांचे कडे कोसळल्याने आलेल्या महापुरात १,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, ज्याने हिमालयीन प्रदेशातील या धोक्याची पुन्हा जाणीव करून दिली आहे.

भारत-बांगलादेशला मोठा धोका

ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमधून निघून भारताच्या अरुणाचल प्रदेश (जिथे तिला सियांग म्हणतात) आणि आसाममधून वाहत पुढे बांगलादेशात जाते. चिनी संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, पाण्याचा प्रवाह वाढल्यास सीमेपलीकडील देशांसाठी पाण्याच्या व्यवस्थापनाचे मोठे संकट निर्माण होऊ शकते.

चीन सरकारचा दावा

दशकांच्या अभ्यासानंतर आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांनंतरच हे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे खालील भागात (भारतात) वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी या प्रकल्पाचा बचावात केला होता. अभियांत्रिकी क्षेत्रातील अभूतपूर्व आव्हान आणि तीव्र भूकंपप्रवण क्षेत्र असूनही चीन या प्रकल्पावर ठाम आहे. परंतु चिनी शास्त्रज्ञांच्या ताज्या इशाऱ्यामुळे या ेमहाप्रकल्पाच्या आणि भारतासह शेजारील देशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Tibet Mega Dam

भारताचे धरणाला धरणाने उत्तर

नवी दिल्ली : चीनच्या ब्रह्मपुत्रा नदीवरील महाकाय जलविद्युत प्रकल्पाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने अरुणाचल प्रदेशात ११,२०० मेगावॅट क्षमतेचा सियांग धरण प्रकल्प प्रस्तावित केला आहे. मात्र, स्थानिक आदि आदिवासी समुदायाचा या प्रकल्पाला विरोध होत आहे.
तिबेटमधून उगम पावणाऱ्या सियांग नदीवर प्रस्तावित धरणामुळे पाण्याचा साठा आणि प्रवाह नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते, असा सरकारचा दावा आहे. चीनने जुलै २०२५ मध्ये तिबेटमध्ये सुमारे ६० हजार मेगावॅट क्षमतेच्या महाधरणाचे बांधकाम सुरू केले. त्यामुळे भारताला भविष्यातील जलसुरक्षेची चिंता आहे.

प्रस्तावित धरणामुळे पूर्वजांच्या जमिनी, शेती, पर्यावरण आणि सांस्कृतिक ओळखीला धोका निर्माण होईल, अशी स्थानिकांची भीती आहे. आदि संघटनांनी प्रकल्पाचा प्राथमिक व्यवहार्यता अहवाल रद्द करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या मते, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. व्यवहार्यता, पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिकांशी चर्चा झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

Read About : Indian Sailors Stranded in Karachi : कराची बंदरात 6 महिन्यांपासून अडकले 6 भारतीय
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.