परीक्षा अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ | फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांचे अर्ज नियमित शुल्कात स्वीकारणार | विलंब व अतिविलंब शुल्कातून विद्यार्थ्यांची सुटका
छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Ssc Hsc Exam Form Deadline Extended- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी आवेदनपत्रे भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यानुसार आता नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. विशेष म्हणजे, सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित शुल्कातच स्वीकारण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे विलंब व अतिविलंब शुल्काचा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर पडणार नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी यासंदर्भातील अधिकृत सूचना ३० ऑक्टोबर रोजी जारी केले आहे. नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तसेच तुरळक विषय घेऊन परीक्षेला प्रविष्ट होणारे विद्यार्थी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत (आयटीआय) ट्रान्सफर ऑफ क्रेडीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या मुदतवाढीचा लाभ मिळणार आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरायची आहेत. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क भरून अर्ज स्वीकारता येतील. त्यानंतर शुल्क पावत्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
सध्या राज्यात दुष्काळी परिस्थितीची पार्श्वभूमी असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांसाठी विलंब शुल्क किंवा अतिविलंब शुल्क आकारले जाणार नाही. सर्व आवेदनपत्रे नियमित शुल्क आकारूनच स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे मुदतीत अर्ज करण्याची संधी मिळण्यासोबतच अतिरिक्त शुल्काचा भुर्दंडही विद्यार्थ्यांना सोसावा लागणार नाही. मात्र, ३० नोव्हेंबरनंतर अर्ज भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात दहावी-बारावीच्या अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात २२ ऑक्टोबरपर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये बारावीचे १ लाख २७ हजार १२१, तर दहावीचे १ लाख २७ हजार ८०९ विद्यार्थी नोंदणीकृत झाले आहेत. दोन्ही वर्गांची मिळून एकूण २ लाख ५४ हजार ९३० विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याची माहिती विभागीय मंडळाचे सचिव रविंद्र वाणी यांनी दिली.
शाळांना प्रिलिस्ट पडताळणीच्या सूचना
अर्ज भरताना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रथम कॉलेज, स्कूल प्रोफाईल मधील संस्था, मान्यताप्राप्त विषय आणि शिक्षकांची माहिती अचूक भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज सादर केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या प्री-लिस्ट ची प्रिंट काढून विद्यार्थ्यांच्या जनरल रजिस्टरनुसार माहितीची पडताळणी करावी. विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेण्यासोबतच मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे.
Read About : Teachers Diwali Holidays Extended – शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्या 21 नोव्हेंबरपर्यंत वाढल्या
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.