Ad Advertisement Ad Advertisement

Indian Sailors Stranded in Karachi : कराची बंदरात 6 महिन्यांपासून अडकले 6 भारतीय

इराणी कंपनी-बंदर प्रशासनातील वादाचा बसला फटका, परतीबाबत स्पष्टता नाही, करार आणि व्हिसाची मुदत संपूनही मायदेशी परतण्याचा मार्ग नाही

नवी दिल्ली : Indian Sailors Stranded in Karachi – पाकिस्तानमधील कराची बंदरात ‘केव्हर’ या मालवाहू जहाजावर सहा भारतीय खलाशी गेल्या सहा महिन्यांपासून अडकले आहेत. जहाजाचे मुख्य अधिकारी विनीत किशोर मिश्रा यांच्यासह सहा भारतीयांच्या मायदेशी परतीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. विनीत यांच्या कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे रहिवासी असलेले विनीत मिश्रा २५ फेब्रुवारीला ‘केव्हर’ जहाजावर मुख्य अधिकारी म्हणून रुजू झाले. इराण आणि ओमानमार्गे प्रवास केल्यानंतर जहाज १७ एप्रिलला कराची बंदरात पोहोचले. त्यानंतर जहाजाला बंदरात रोखण्यात आल्याने त्यावरील सर्व भारतीय खलाशी अडकले.

विनीत यांचा सहा महिन्यांचा नोकरीचा करार ऑगस्टमध्ये संपला. त्यांचा व्हिसाही संपला असून, जहाजावरून अधिकृतपणे मुक्त करण्यात आलेले नाही. त्यांना जहाजातून उतरून मायदेशी जाण्याची परवानगी मिळालेली नसल्याचे पत्नी नेहा मिश्रा यांनी सांगितले.

मुलांना वडिलांच्या परतीची प्रतीक्षा

विनीत यांना दोन लहान मुले आहेत. ‘पप्पा घरी कधी येणार?’ असा प्रश्न मुले वारंवार विचारतात. त्यावर ँपत्नी नेहा त्यांना ‘पप्पा लवकरच येतील’ असे सांगून कशीबशी समजूत घालतात. पतीशी १५ ते २० दिवसांतून एकदा, अवघ्या एक-दोन मिनिटांसाठी बोलता येत असल्याचे नेहा यांनी सांगितले. जहाजावर गेल्या तीन महिन्यांपासून वीज नसल्याचा दावाही त्यांनी केला.

अन्न-पाण्याची समस्या, अंधारात वास्तव्य

विनीत यांचे वडील ललित किशोर मिश्रा यांनी जहाजावरील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. विनीत यांनी त्यांना दिलेल्या माहितीनुसार, जहाजावर सकाळी दोन बिस्किटे दिली जातात, दुपारचे जेवण चार वाजता आणि रात्रीचे जेवण साधारण अकरा वाजता मिळते. वीज नसल्यामुळे खलाशांना अंधारात राहावे लागत असल्याचा विनीतच्या वडिलांनी केला.

केंद्र सरकारकडे मदतीची मागणी

जहाजावर इराणी कंपनी आणि बंदर प्रशासनातील वादामुळे जहाज पोहोचताच ते ताब्यात घेण्यात आल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला आणि सर्वांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले, असा आरोपही करण्यात आला. भारतीय दूतावासाकडे संपर्क साधण्यात आला, परंतु पुढे काही झाले नाही, असे कुटुंबाने सांगितले. नेहा मिश्रा आणि त्यांचे सासरे दिल्लीला आले असून, गेल्या चार दिवसांत पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयात अर्ज सादर केल्याचे ललित मिश्रा यांनी सांगितले. विनीत आणि अन्य भारतीय खलाशांची सुरक्षित सुटका करून त्यांना मायदेशी आणण्यासाठी तातडीने मदत मिळावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Read About : Japanese GCCs in India : अरे वा…100 हून अधिक जपानी कंपन्यांची भारतात जागतिक क्षमता केंद्रे

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.