२००० ते २०१९ या काळात दरवर्षी सरासरी १३४ अब्ज टन बर्फ वितळला; तलाव आणि समुद्राला मिळणाऱ्या हिमनद्यांच्या वेगवान हालचालींचा हवामान बदलावर परिणाम
नवी दिल्ली : Glacier Melting जगातील एकूण हिमनद्यांपैकी समुद्र, तलाव किंवा बर्फाच्या हिमाच्छादित कड्यांना (आईस शेल्व्ह) जाऊन मिळणाऱ्या हिमनद्यांचे प्रमाण अवघे ३ टक्क्यांहून थोडे जास्त आहे. मात्र, २००० ते २०१९ या कालावधीत याच हिमनद्यांमुळे जगातील ५०% पेक्षा जास्त बर्फ वितळला असून, दरवर्षी सरासरी १३४ अब्ज टन बर्फ नाहीसा झाला आहे, असा खळबळजनक खुलासा एका नव्या संशोधनातून झाला आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या प्रसिद्ध संशोधन पत्रिकेत हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. ब्रिटनमधील बर्मिंगहॅम आणि लीड्स विद्यापीठ या संस्थांच्या पर्यावरण शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.
हिमनद्यांचा मोठा आकार
तलावांमध्ये जाऊन मिळणाऱ्या हिमनद्या जमिनीवर संपणाऱ्या हिमनद्यांपेक्षा आकाराने खूप मोठ्या असतात. जगातील एकूण हिमनद्यांच्या क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्र याच हिमनद्यांनी व्यापले आहे.
वाहण्याचा वेग जास्त
संशोधनानुसार जमिनीवरील हिमनद्यांच्या तुलनेत तलावांना मिळणाऱ्या हिमनद्या १०% तर समुद्राला मिळणाऱ्या हिमनद्या ४४% जास्त वेगाने वाहतात. तलावांना मिळणाऱ्या हिमनद्या त्यांच्या आकाराच्या मानाने जमिनीवरील हिमनद्यांपेक्षा तब्बल ५७% जास्त बर्फ गमावतात.
तलावांमुळे बर्फ वेगाने का वितळतो?
संशोधक जोसेफ मॅलाल्यू यांच्या मते, तलावांमध्ये शेवट होणाऱ्या हिमनद्यांमधील बर्फ अतिशय वेगाने वितळत आहे. याचे मुख्य कारण तलावाचे पाणी, हिमनद्यांचा आकार किंवा दोन्ही घटक असू शकतात. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, हिमनदीचा पुढील भाग तलावात असल्याने बर्फाचे मोठे मोठे खडक तुटून पाण्यात पडतात. तलावाच्या पाण्याचा संपर्क आल्याने पाण्याच्या पृष्ठभागाखालील बर्फ वेगाने वितळतो. Glacier Melting
भविष्यातील धोके, हवामान बदल
जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्यांचे स्वरूप बदलत आहे. समुद्राला मिळणाऱ्या हिमनद्या मागे सरकून जमिनीवर येत आहेत, ज्यामुळे त्यांचा वितळण्याचा वेग काहीसा कमी होऊ शकतो. इतर भागांत नवीन तलाव निर्माण झाल्याने जमिनीवरील हिमनद्यांचे रूपांतर ‘तलाव-आधारित’ हिमनद्यांमध्ये होत आहे, ज्यामुळे बर्फ आणखी वेगाने वितळण्याचा धोका वाढला आहे.
सध्या समुद्रपातळीतील वाढ आणि पाण्याचे नियोजन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हवामान मॉडेल्समध्ये तलावांना मिळणाऱ्या हिमनद्यांचा पूर्णपणे विचार केलेला नाही. त्यामुळे भविष्यातील नैसर्गिक आपत्ती आणि पाणीटंचाईचा अचूक अंदाज बांधण्यासाठी या नव्या घटकांचा मॉडेल्समध्ये समावेश करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
Read About: Bio-Hybrid Robots – उंदराच्या पेशींपासून बनवले उड्या मारणारे बायो-हायब्रिड रोबोट्स; शास्त्रज्ञांचा अनोखा शोध
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.