अवघ्या २० मिनिटांत डल्ला; उत्तर कोरियाच्या हॅकर्सवर संशय
लंडन : Binance Crypto Hack – जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज असलेल्या ‘बायनान्स’मधून हॅकर्सनी सुमारे ६.३ अब्ज डॉलर (सुमारे ५० हजार कोटी रुपयांहून अधिक) किमतीचे डिजिटल चलन चोरले आहे. क्रिप्टोच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा मानला जात आहे. यानंतर कंपनीने गुरुवारी पैसे भरणे आणि काढणे दोन्ही थांबवले. सर्व नुकसान कंपनी भरून काढेल आणि ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत, असे बायनान्सने स्पष्ट केले आहे.
चोरीचा बहुतांश प्रकार गुरुवारी रात्री उशिरा सुमारे २० मिनिटांत घडला, असे ‘टीआरएम लॅब्स’ आणि ‘चेनॅलिसिस’ या अमेरिकी ब्लॉकचेन विश्लेषण कंपन्यांनी सांगितले. हल्लेखोराने १० वेगवेगळ्या ब्लॉकचेनवरील बायनान्सच्या वॉलेट्समधून सुमारे ६.३६ अब्ज डॉलर बाहेर काढले. याआधीचा मोठी चोरी फेब्रुवारी २०२५ मध्ये झाली होती. तेव्हा ‘बायबिट’ एक्स्चेंजवरील १.५ अब्ज डॉलर लंपास करण्यात आले होते. त्याच्या चौपटीहून अधिक रक्कम या वेळी चोरीला गेली आहे. यापैकी सुमारे ३ अब्ज डॉलर गोठवण्यात यश आले आहे. त्यातील २.३ अब्ज डॉलरहून अधिक रक्कम ‘टिथर’ आणि ‘सर्कल’ या स्टेबलकॉइन कंपन्यांनी गोठवली. उरलेल्या ३.३ अब्ज डॉलरचे काय झाले, हे बायनान्सने सांगितलेले नाही. चोरीचा आकडा आणखी वाढू शकतो, असा इशाराही कंपनीने दिला आहे.
चोर कोण?
हा हल्ला उत्तर कोरियाच्या ‘ट्रेडरट्रेटर’ या हॅकर गटाने केला असल्याचे टीआरएमने म्हटले आहे. हा गट कुप्रसिद्ध ‘लाझारस ग्रुप’शी संबंधित आहे. चेनॅलिसिसनेही हाच निष्कर्ष काढला. लाझारस ग्रुप उत्तर कोरियाच्या मुख्य गुप्तचर संस्थेच्या नियंत्रणाखाली असल्याचे सांगत अमेरिकेने २०१९ मध्ये त्यावर निर्बंध घातले होते. बायबिट चोरीसाठीही अमेरिकेच्या एफबीआयने याच गटाला जबाबदार धरले होते. उत्तर कोरिया मात्र हॅकिंगमधील सहभाग नेहमीच नाकारतो. बायनान्सने मात्र सावध भूमिका घेतली आहे. तपासात अद्याप कोणालाही जबाबदार ठरवलेले नाही, असे कंपनीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड टेंग यांनी सांगितले.
Read About : Laser-Based Optical Switching – लेसर किरणांमुळे कॉम्प्युटरची मेमरी होणार प्रचंड वेगवान!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.