अमेरिकेतील संशोधकांचे मोठे यश : ऊर्जेचीही मोठी बचत
सॅन डिएगो : Laser-Based Optical Switching – भविष्यातील संगणक, मोबाइल आणि डिजिटल डेटा साठवणूक करणारी उपकरणे आता अनेक पटीने वेगवान होणार आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन डिएगो येथील संशोधकांनी डिजिटल माहिती साठवण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी नवी पद्धत शोधून काढली आहे. चुंबकीय प्रणालीला प्रकाशाद्वारे नियंत्रित करण्याच्या या नव्या तंत्रामुळे कॉम्प्युटरी मेमरी केवळ वेगवानच होणार नाही, तर तिचा आकार लहान होईल आणि विजेची बचतही मोठ्या प्रमाणावर होईल.
सध्या सर्वसाधारणपणे संगणकातील माहिती ही चुंबकीय स्थितीत साठवली जाते. मात्र, या संशोधकांनी अतिवेगवान लेसर किरणांचा वापर करून अत्यंत लहान आणि अचूक आकारात चुंबकीय स्थिती बदलण्यात यश मिळवले आहे. या संपूर्ण प्रक्रियेला ‘ऑप्टिकल स्विचिंग’ (प्रकाशाद्वारे अचूक बदल करणे) असे म्हटले जाते. संशोधकांच्या माहितीनुसार, ही नवी ऑप्टिकल पद्धत पारंपरिक चुंबकीय पद्धतीपेक्षा हजार पटींहून अधिक वेगवान ठरू शकते. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया अत्यंत कमी ऊर्जेचा वापर करून माहिती लिहू शकते. संशोधनाचे हे महत्त्वपूर्ण निष्कर्ष ‘नेचर कम्युनिकेशन’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.
मोबाइल, डेटा सेंटर्सची कार्यक्षमता वाढणार
तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या नव्या संशोधनामुळे भविष्यातील संगणक, मोबाइल आणि डेटा सेंटर्सची कार्यक्षमता प्रचंड वाढणार असून उपकरणांचा वेग आणि वीज बचतीच्या बाबतीत मोठे परिवर्तन घडणार आहे.
तंत्रज्ञान कसे काम करते?
या पद्धतीमध्ये लेसरची ऊर्जा एका अतिशय सूक्ष्म भागात केंद्रित केली जाते. लेसर किरणांच्या पहिल्या झटक्यामुळे चुंबकीय सामग्रीचा अगदी छोटासा भाग हलकासा गरम होतो आणि त्याची चुंबकीय दिशा बदलते. त्यानंतरच्या पुढील झटक्यांमुळे हा बदललेला भाग हळूहळू विस्तारतो आणि नवीन चुंबकीय स्थिती अगदी सुरक्षितपणे स्थिर होते.
Read About : US AI Regulation : अमेरिकेत एआयवर कठोर कायदे होण्याची शक्यता कमी; यूबीएसचा अहवाल
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.