Ad Advertisement Ad Advertisement

Surgical Skills Training – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शस्त्रक्रिया कौशल्यांचे प्रशिक्षण

तीन दिवसीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : Surgical Skills Training वैद्यकीय शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शस्त्रक्रिया कौशल्यांचे ज्ञान आणि अनुभव मिळावा, या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ‘व्हील बेस्ड सर्जिकल स्किल लॅब ट्रेनिंग’ या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘इन्स्टट्यिूट ऑन व्हील्स’ या उपक्रमांतर्गत आयोजित या प्रशिक्षणाला वैद्यकीय पदवीपूर्व विद्यार्थी आणि पदव्युत्तर निवासी डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य, उपकरणे आणि इतर तांत्रिक सुविधा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या ‘इन्स्टट्यिूट ऑन व्हील्स’ उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक प्रशिक्षण सुविधांच्या माध्यमातून विविध शल्यचिकित्सा तंत्रांचा प्रत्यक्ष सराव करण्याची संधी मिळाली. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते फीत कापून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. विनोद मुंदडा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. अनिता कंडी, डॉ. नोमान खान, डॉ. विशाखा अय्यर, डॉ. जगन्नाथ काळे यांच्यासह विभागातील प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. सुक्रे यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वैद्यकीय शिक्षणात सैद्धांतिक ज्ञानाइतकेच प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात डॉक्टर म्हणून काम करताना शस्त्रक्रियेशी संबंधित मूलभूत तसेच प्रगत कौशल्ये आत्मसात असणे आवश्यक आहे. अशा प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच प्रत्यक्ष वैद्यकीय सेवेत काम करताना त्यांना त्याचा निश्चितच उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली पार पडला. विद्यार्थ्यांना प्रत्येक कौशल्याचे तंत्र समजावून सांगण्यासोबतच त्यांच्याकडून प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना शल्यचिकित्सेतील विविध प्रक्रियांचा जवळून अनुभव घेता आला.

मूलभूत ते प्रगत शस्त्रक्रिया कौशल्यांचा सराव

या तीन दिवसीय प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना शल्यचिकित्सेतील मूलभूत कौशल्यांपासून ते प्रगत शस्त्रक्रिया तंत्रांपर्यंत विविध बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सर्जिकल गाऊनिंग, सर्जिकल स्यूचरिंग अर्थात जखमेवर टाके घालणे आणि नॉटिंग अर्थात शस्त्रक्रियेदरम्यान गाठी बांधणे यांसारख्या मूलभूत कौशल्यांचा समावेश होता. याशिवाय आतड्यांची जोडणी (बॉवेल ॲनास्टोमोसिस), रक्तवाहिन्यांची दुरुस्ती (व्हॅस्क्युलर रिपेअर), टेंडन रिपेअर, पोटाच्या जखमेचे क्लोजर (ॲब्डॉमिनल क्लोजर) आणि लॅपरोस्कोपिक स्यूचरिंग यांसारख्या प्रगत शस्त्रक्रिया कौशल्यांचेही प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष सरावाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची हाताळणी, टाके घालण्याची योग्य पद्धत, गाठी बांधण्याचे तंत्र, विविध ऊतींची जोडणी आणि शस्त्रक्रियेतील अचूकतेचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली.


Read About : Teachers Diwali Holidays Extended – शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्या 21 नोव्हेंबरपर्यंत वाढल्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.