विविध शिक्षक संघटनांच्या एकजुटीला यश
छत्रपती संभाजीनगर :Teachers Diwali Holidays Extended- जिल्हा परिषद तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या दिवाळी सुट्या वाढविण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, राष्ट्रवादी शिक्षक संघ यासह विविध शिक्षक संघटनांनी एकत्रितपणे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दिवाळी सुट्टयांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता २ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळी सुट्टया राहणार असून, २३ नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरू होणार आहेत.
जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या दिवाळी सुट्टयांचा कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. यासाठी वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. शिक्षकांच्या या मागणीसाठी सर्व संघटनांनी आपापल्या स्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही गेल्या चार दिवसांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच शिक्षण सभापती यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सुट्टया वाढविण्याची आग्रही मागणी केली होती. विविध शिक्षक संघटनांनी उपस्थित केलेल्या या विषयाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षण व क्रीडा सभापती अनिता मोठे, प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे, माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अखेर प्रशासनाने शिक्षकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून दिवाळी सुट्टयांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता शिक्षकांना २१ नोव्हेंबरपर्यंत सुट्टयांचा लाभ मिळणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने २३ नोव्हेंबरपासून शाळांचे नियमित कामकाज सुरू होईल.
संघटनांच्या एकजुटीचा विजय!
दिवाळी सुट्टया वाढविण्याच्या मागणीसाठी विविध शिक्षक संघटनांनी दाखविलेली एकजूट, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका यामुळे हा निर्णय शक्य झाला. या निर्णयामुळे जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेले हे यश असल्याची भावना शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रणजित राठोड, नितीन नवले, कडूबा साळवे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, वाहेद शेख, रमाकांत छडीदार यांनी व्यक्त केली.
Read About : दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कावरून शहरातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.