Ad Advertisement Ad Advertisement

India vs New Zealand 5th T20I 2026- राखीव फळीला आजमावणार?

अखेरच्या लढतीमध्ये कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता; सॅमसनला वगळून सूर्यवंशीला खेळवण्याची चर्चा

India vs New Zealand 5th T20I 2026 : हॅमिल्टन : भारतीय संघ मालिकेतील एकमेव पराभवानंतर अखेरच्या लढतीमध्ये अंतिम अकरामध्ये राखीव फळीला आजमावू शकतो. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवचे नाव यामध्ये आघाडीवर आहे. कारण, कुलदीपला मालिकेत एकदाही संधी देण्यात आली नाही. आगामी एकदिवसीय मालिका लक्षात घेता कुलदीपचा अखेरच्या लढतीमध्ये समावेश केला जाऊ शकतो. तसेच संजू सॅमसनला वगळून वैभव सूर्यवंशीला खेळवण्याची चर्चा रंगली आहे. गत लढतीमध्ये फलंदाजांच्या बळावर विजय संपादन करत भारताची घोडदौड खंडित करणारा न्यूझीलंड आपली लय कायम राखण्यास प्रयत्नशील असेल.

भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा आघाडीवर आहे. मात्र, गत लढतीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे निर्भेळ यशाची संधी गमावली. तसेच गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे पुन्हा एकदा व्यवस्थापन चिंतातूर झाले आहे. या परिस्थितीत अखेरच्या लढतीची विजयाने सांगता करण्याचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी व्यवस्थापनाला तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीचा अंतिम अकरामध्ये समावेश करावा लागेल. सॅमसनने मालिकेतील चार लढतींमध्ये ६७, १३, १८, ४ धावा काढल्या असून, त्याला एका लढतीमध्ये विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याच्या स्थानावर सूर्यवंशीला मैदानात उतरवले जाऊ शकते. गत आठ सामन्यांमध्ये १५५ धावा काढणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यरला आपला ठसा उमटवण्याची संधी चालून आली आहे. श्रेयसनंतर फलंदाजीस उतरणारे नमन धीर (१०६ धावा) आणि नितीश कुमार रेड्डी (४९ धावा/३ बळी) या अष्टपैलू दुकलीने मिळणारी संधी सत्करणी लावली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या घरच्या मैदानातील मालिकेत गोलंदाजांची कामगिरीच चिंतेची बाब होती आणि न्यूझीलंडच्या भूमीवरही गोलंदाज महागडे ठरत आहेत.

मात्र, आघाडीच्या फळीतील फलंदाजांमुळे गोलंदाजांचे अपयश झाकले गेले आहे. चार वर्षांनंतर पुनरागमन करणारा भुवनेश्वर कुमार व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ करून दाखवण्यास कमी पडला आहे. तीन लढतींमध्ये त्याने केवळ एक बळी घेत धावांची खैरात केली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसोबत अष्टपैलू अक्षर पटेल यांच्यावर गोलंदाजीची मदार आहे. तुलनेत अर्शदीपने धावांना रोख घालताना पाच बळी घेतले आहेत.कुलदीपला खेळवण्याचा प्रयोग केल्यास नमन धीरला बाहेर बसवले जाऊ शकते. ‘पार्ट टाइम’ फिरकीपटू म्हणून अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्याकडे चेंडू सोपवण्याचा प्रयोग केला जाऊ शकतो.

यजमान संघ विजयी लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात

यजमान संघ गत लढतीमध्ये ग्लेन फिलिप्सच्या शतकी खेळीवर प्राप्त केलेली विजयी लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. सलामीवीरांची जोडी टीम सायर्फट (३६ धावा) आणि फिन ॲलन (१३२ धावा) यांना रोखण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले आहेत. सलामीच्या या जोडीने पहिल्या लढतीमध्ये चांगले प्रत्युत्तर दिले होते. मात्र, त्यानंतर त्याची खेळी बहरली नाही. फिलिप्स त्यांच्याकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. एक शतक आणि दोन अर्धशतकांनी त्याच्या नावावर सर्वाधिक २७६ धावा जमा आहेत.यष्टिरक्षक फलंदाज मिचेल ब्रेसवेल गेल्या लढतीचा अपवाद वगळता फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. जेकब डफी आणि ॲडम मिल्ने या वेगवान गोलंदाजांवर त्यांची मदार आहे.

संधी मिळणे कठीण – बहुतुले

भारताचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी म्हटले आहे की, अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना याची पूर्ण जाणीव आहे की, न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत संघात असूनही त्यांना खेळण्याची संधी मिळणार नाही, कारण संघ व्यवस्थापन सध्या आपल्या पसंतीच्या गोलंदाजी संयोजनासह मैदानात उतरत आहे.

पडद्यामागे अथक परिश्रम

संघ निवडीची परिस्थिती जाणून बहुतुले यासंदर्भात पुढे म्हणाले की, ‘दोन्ही खेळाडूंना संघ निवडीची परिस्थिती समजते, ते पडद्यामागे अथक परिश्रम करीत आहेत आणि संधी मिळाल्यास खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. मला वाटते की, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, ते (कुलदीप आणि वरुण) खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत, पण संघाला कोणत्या गोलंदाजी संयोजनाची गरज आहे, हे समजून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यांना कदाचित खेळण्याची संधी मिळणार नाही, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.

स्थळ : हॅमिल्टन, वेळ : दु. १२.३० वा., प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स समूह

Read About : India vs New Zealand 4th T20I 2026- भारताची विजयी मालिका खंडित

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.