Ad Advertisement Ad Advertisement

India vs New Zealand 4th T20I 2026- भारताची विजयी मालिका खंडित

टी-२० मालिका : गोलंदाजांची सुमार कामगिरी कारणीभूत; न्यूझीलंडचा ८७ धावांनी विजय

India vs New Zealand 4th T20I 2026 : ऑकलंड : गोलंदाजांची सुमार कामगिरी आणि संघ नियोजनातील चुकांमुळे भारतीय संघाला टी-२० मालिकेतील चौथी लढत गमवावी लागली. न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्सचे शतक (१०७) आणि मिचेल ब्रेसवेलच्या (६५) अर्धशतकी खेळीवर मालिकेत पहिल्यांदा अडीचशेच्या (७ बाद २५९) पार मजल मारली. प्रत्युत्तरात भारताला ९ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारता आली आणि न्यूझीलंडने ८७ धावांनी मालिकेत सलग तीन पराभवानंतर पहिल्यांदाच विजय संपादन केला. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा आघाडीवर असला, तरी पराभवामुळे गत तीन सामन्यांसोबत २०२० पासूनची विजयी मालिकाही खंडित झाली.


द्विशतकी आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून अभिषेक शर्मा (२७), कर्णधार श्रेयस अय्यर (२२)सोबत तळाच्या फलंदाजांनी प्रतिकार केला. वैभव सूर्यवंशीला अंतिम अकरामधून बाहेर करत संजू सॅमसनला पुन्हा सलामीला पाठवण्यात आले. गत लढतीमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर उतरला होता. पुन्हा आपल्या जुन्या भूमिकेत आल्यानंतर सॅमसन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकला नाही आणि केवळ ४ धावा काढून परतला. दोन सामन्यांनंतर परतलेल्या इशान किशनने (०) घोर निराशा केली. वेगवान गोलंदाज जेकब डफीने पहिल्याच षटकात सॅमसन व इशान यांना बाद करत भारताला दुहेरी धक्के दिले.

गत लढतीमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या अभिषेकने लय कायम राखताना १५ चेंडूंत ३ चौकार, १ षटकारने झटपट धावा काढल्या. कर्णधार श्रेयसही ४ चौकार लगावून परतला. गेल्या लढतीमध्ये पॉवरप्लेमधील (बिनबाद ११८ धावा) चौफेर फटकेबाजीमुळे भारताचा विजय निश्चित झाला होता आणि या लढतीमध्ये पॉवरप्लेमध्ये (४ बाद ६१ धावा) पराभव निश्चित झाला. त्यानंतर गोलंदाजीत महागडा ठरलेला नितीश कुमार रेड्डी (२१ धावा, २ षटकार), तिलक वर्मा (३५ धावा, १ चौकार, ३ षटकार), नमन धीर (२८ धावा, २ चौकार, २ षटकार) या तिघा फलंदाजांनी प्रतिकार करीत मोठ्या धावसंख्येने पराभव टाळला. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज जेकब डफी (२३ धावांत ४ बळी) सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. मालिकेत पहिलाच सामना खेळणाऱ्या मॅथ्यू फिशरसोबत कर्णधार मिचेल सँटनरने प्रत्येकी २ बळी टिपले.


फलंदाजीसाठी निमंत्रित करण्यात आलेल्या न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने ४६ चेंडूंत कारकीर्दीतील तिसरे शतक झळकावले. फिलिप्सने १०७ धावांची खेळी ४९ चेंडूंनी उभारताना ६ चौकार आणि १० उत्तुंग षटकार लगावले. मधल्या फळीतील मिचेल ब्रेसवेलसोबत त्याने ४० चेंडूंत ११५ धावांची भागीदारी रचली. नितीश कुमारच्या १६ व्या षटकात फिलिप्सने सलग चार षटकार लगावले. ब्रेसवेलने मालिकेत पहिल्यांदा मोठी खेळी उभारताना ४ चौकारांनी २५ चेंडूंत ६५ धावा काढल्या. त्याअगोदर फिन ॲलन (३१) आणि डॅरेल मिचेलने २४ धावांचे योगदान दिले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला वगळण्याबाबत व्यवस्थापनाकडून कोणतेही कारण देण्यात आले नाही. गत तीन सामन्यांत केवळ एक बळी घेता आल्यामुळे त्याला विश्रांती देत मयंक यादवला संधी देण्यात आल्याचा कयास वर्तवण्यात येत आहे. मयंकने निवड सार्थ ठरवताना ३ बळी घेतले. मात्र, यासाठी त्याने ४ षटकांमध्ये ४८ धावा दिल्या. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (६४ धावा) सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला.

सूर्यवंशीला वगळण्याचा निर्णय अनाकलनीय

दुखापतीमधून सावरलेल्या इशान किशनचा अंतिम अकरामध्ये समावेश करून गत लढत फटकेबाजीच्या बळावर गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, व्यवस्थापनाचा हा निर्णय पूर्णपणे फसला आणि इशान धावांचे खातेही उघडू शकला नाही. सूर्यवंशीने गत दोन लढतींमध्ये ४९ धावा काढल्या आहेत, यापैकी तिसऱ्या सामन्यात सलामीला येत त्याने १९ चेंडूंत ४ चौकार, ४ षटकारांनी ४५ धावा काढल्या होत्या. यामुळे लय प्राप्त झालेल्या सूर्यवंशीला वगळून व्यवस्थापनाने काय साध्य केले, असा प्रश्न निर्माण होत आहे.

दुसरा सर्वात मोठा पराभव

भारताचा धावांच्या तुलनेत आतापर्यंतचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव (८७ धावा) आहे. इंग्लंडविरुद्धचा २०२५ मधील १२५ धावांचा पराभव या पंक्तीत पहिल्या स्थानी आहे.

  • भारतीय संघ न्यूझीलंडच्या भूमीवर २०२० पासून टी-२० च्या मैदानात अजिंक्य राहिला होता. भारताने गत सहा वर्षांत न्यूझीलंडविरुद्ध १० सलग दहा सामने जिंकले, पण या लढतीच्या निमित्ताने त्यांना प्रथमच पराभव स्वीकारावा लागला.
अर्शदीपचे बळींचे दीड शतक

डावखुऱ्या अर्शदीप सिंगने या सामन्यातून टी-२० प्रकारात आपले बळींचे दीड शतक साजरे केले. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर (५) त्याचा दीडशेवा बळी ठरला. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत सात गोलंदाजांनी १५० किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.मिचेल सँटनरनेही (१५१ बळी) या सामन्यातून २ बळी घेत दीडशे बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवले.

Read About : Asian Games 2026 : ट्रीसा-गायत्रीचा वर्ल्ड नंबर-3 जोडीला धक्का
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.