Ad Advertisement Ad Advertisement

Blood Pressure Fluctuations – रक्तदाब नॉर्मल दिसला तरी धोका असू शकतो

सरासरी आकडा पुरेसा नसल्याचा संशोधकांचा इशारा

व्हर्जिनिया (अमेरिका) : Blood Pressure Fluctuations – डॉक्टरकडे रक्तदाब तपासला आणि आकडे सामान्य (नॉर्मल) आले की आपण निर्धास्त होतो. पण आता संशोधक सांगतात की केवळ सरासरी आकडा पुरेसा नाही. दिवसभरात रक्तदाब किती वेळा आणि किती जोरात वर-खाली होतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. रक्तदाबातील असे अचानक होणारे मोठे चढउतार सरासरी आकडे सामान्य असतानाही हृदयविकार, पक्षाघात (स्ट्रोक) आणि मेंदूला इजा होण्याचा धोका वाढवू शकतात.
अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांनी मेंदूच्या खालच्या भागात, म्हणजे ‘ब्रेनस्टेम’मध्ये, अशा मज्जापेशींचा एक छोटा गट शोधला आहे, जो रक्तदाब स्थिर ठेवण्याचे काम करतो. श्वास, हृदयाचे ठोके यांसारखी आपोआप चालणारी कामे ब्रेनस्टेमच सांभाळतो. झोपेतून उठणे, उभे राहणे, व्यायाम करणे अशा रोजच्या हालचालींमध्ये रक्तदाब फार हेलकावे खाऊ नये, याची काळजी या पेशी घेतात. अभ्यासाचे प्रमुख डॉ. स्टीफन अ‍ॅबट यांच्या मते, यांपैकी फक्त काही शेकडो पेशी नष्ट झाल्या तरी सरासरी रक्तदाब नॉर्मल राहतो, पण तो क्षणाक्षणाला अस्थिर होतो. म्हणजेच रक्तदाब सतत स्थिर ठेवणारी यंत्रणाच बिघडते.

पार्किन्सनशी संबंधित आजाराचा धागा

याचपेशी मल्टिपल सिस्टिम अ‍ॅट्रॉफी या दुर्मीळ आणि प्राणघातक मज्जासंस्थेच्या आजारात खराब झालेल्या किंवा नष्ट झालेल्या आढळल्या होत्या. पार्किन्सनशी संबंधित असलेल्या या आजारात रुग्णांचा रक्तदाब नियंत्रित ठेवणे खूप कठीण जाते. त्यामुळे इतर आजारांमध्येही, अगदी आकडे नॉर्मल दिसत असतानाही, रक्तदाब अस्थिर होण्यामागे या पेशींचा बिघाड असू शकतो, अशी शक्यता संशोधक मांडतात.

उपचारांची दिशा बदलणार?

डॉ. अ‍ॅबट यांच्या मते, रक्तदाबाकडे पाहण्याची आपली पद्धतच बदलायला हवी. फक्त आकडे कमी करणे हे ध्येय न ठेवता, रक्तदाब सतत स्थिर कसा राहील याकडेही लक्ष द्यायला हवे. ही यंत्रणा नीट समजली, तर भविष्यात हे धोकादायक चढउतार कमी करणारे नवे उपचार विकसित होऊ शकतात. हे संशोधन ‘सक्युर्लेशन रिसर्च’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून त्याला अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (एनआयएच) निधी दिला आहे.

Read About : Robotic Cancer Surgery : एकाच दिवशी कर्करोगाच्या 5 गुंतागुंतीच्या रोबोटिक शस्त्रक्रिया!

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.