सशुल्क दर्शन पासची चढ्या भावाने विक्रीचा आरोप, दर्शन रांगांच्या नियोजनाचे आव्हान
Tuljabhavani Temple Tuljapur तुळजापूर : अश्विनी पौर्णिमेनंतर आलेल्या पहिल्या रविवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांचा अभूतपूर्व जनसागर लोटला. सुमारे दीड लाख भाविकांनी जगदंबेच्या दर्शनाचा लाभ घेतला. दिवसभर मंदिर परिसरासह दर्शन रांगा भाविकांनी फुलून गेल्या होत्या. मात्र, या प्रचंड गर्दीच्या संधीचा फायदा काही अपप्रवृत्तींनी घेतल्याची चर्चा असून, तीनशे रुपये किंमतीच्या सशुल्क दर्शन पासची जादा दराने विक्री करून भाविकांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे.
रविवारी श्री तुळजाभवानी देवीजींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होणार याची पूर्वकल्पना असल्याने काही व्यक्तींनी आधीच मोठ्या प्रमाणात सशुल्क दर्शन पास मिळवून ठेवल्याची चर्चा आहे. दर्शन मंडप पूर्ण भरल्यानंतर मंदिर समितीने सशुल्क दर्शन पासचे वितरण बंद केले. त्यानंतर आधीच पास मिळविलेल्या काही व्यक्तींनी हे पास चढ्या दराने विकल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काही मोजक्याच व्यक्तींना एवढ्या मोठ्या प्रमाणात पास कसे उपलब्ध झाले? पास वितरण प्रक्रियेत संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका होती का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी भाविकांमधून होत आहे.
मंदिर प्रशासनाने या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकीकडे दीड लाख भाविकांची मांदियाळी, तर दुसरीकडे सशुल्क दर्शन पासच्या कथित गैरव्यवहाराची चर्चा आणि रांगा व्यवस्थापनाचे आव्हान अशा स्थितीत आगामी दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची खरी कसोटी लागणार आहे.
पहाटेपासून दर्शन रांगा गतिमान ठेवण्याचे आव्हान
रविवारी पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन दर्शनाला सुरुवात झाली. सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी कायम होती. सकाळी आठ वाजेनंतर दर्शन मंडप पूर्ण भरताच मंदिर कर्मचाऱ्यांनी दर्शन रांगा वेगाने पुढे हलविल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यास मदत झाली. मात्र, केवळ गर्दी वाढल्यानंतर रांगा हलविण्याऐवजी पहाटे पाच ते सहा वाजेपासूनच सर्व दर्शन रांगा सातत्याने गतिमान ठेवणे आवश्यक आहे.
दिवाळी सुट्यांमुळे वाढणार गर्दी
आगामी काळात दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार असल्याने तुळजापुरात भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दर्शन रांगा वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढे न गेल्यास दुपारच्या सुमारास दर्शन मंडप व मंदिर परिसरात गर्दीचा ताण वाढून बेशिस्त निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दीचा फायदा भुरटे चोर आणि पाकीटमारांकडून घेतला जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे मंदिर समिती, सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाने आतापासूनच संयुक्त नियोजन करणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Climate Change Wheat Protein : वाढत्या CO₂ मुळे गव्हातील प्रथिनांमध्ये बदल, चपातीची गुणवत्ता खराब होणार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.