Ad Advertisement Ad Advertisement

Education Department Inspects 517 Private Schools- पटसंख्येच्या बनवाबनवीला शिक्षण विभागाचा दणका!

शहरातील ५१७ खासगी शाळांची झाडाझडती | १७१ अधिकाऱ्यांकडून दोन दिवस तपासणी

छत्रपती संभाजीनगर : Education Department Inspects 517 Private Schools- विद्यार्थी पटसंख्येच्या नावाखाली सुरू असलेल्या संभाव्य बनवाबनवीला दणका देण्यासाठी शिक्षण विभागाने आता थेट शाळांच्या दारात धडक दिली आहे. शहरातील तब्बल ५१७ खासगी शाळांची अवघ्या दोन दिवसांत झाडाझडती घेण्यात आली. १७१ शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांच्या पथकांनी शाळांमध्ये जाऊन यू-डायस प्लस पोर्टलवरील विद्यार्थी संख्या, हजेरीपटावरील नोंदी आणि वर्गात प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची कसून पडताळणी केली. या मोहिमेमुळे कागदोपत्री विद्यार्थी दाखवून शासकीय लाभ आणि शिक्षकांची पदे मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळांचे धाबे दणाणले आहेत.

शिक्षण विभागाने २९ ऑक्टोबरला शहरातील खासगी शाळांच्या विद्यार्थी पटसंख्येची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ३० आणि ३१ ऑक्टोबरला विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १७१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकांनी ५१७ शाळांना भेटी देत नोंदींची तपासणी केली. शाळांनी यू-डायस पोर्टलवर ऑनलाइन भरलेली विद्यार्थी संख्या प्रत्यक्षात कितपत खरी आहे, याचा शोध घेण्यात आला. शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येचा आकडा केवळ कागदावर फुगवला जातो का, हा या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा तपासाचा मुद्दा होता. पडताळणीदरम्यान प्रत्यक्ष वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती, दैनंदिन हजेरी, प्रवेश नोंदवही, मुख्याध्यापकांच्या लॉगिनमधील माहिती आणि यू-डायस प्लस पोर्टलवरील नोंदी यांची एकमेकांशी तुलना करण्यात आली. ऑनलाइन नोंदींमध्ये दाखवलेले विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत शिक्षण घेत आहेत का, याची खातरजमा करण्यात आली. नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थितीत तफावत आढळल्यास संबंधित शाळांकडून खुलासा मागविण्यात येणार आहे.

शिक्षक पदांसाठी पटसंख्येचा खेळ?

शिक्षकांची नवीन पदे मंजूर करून घेणे, तसेच सध्या कार्यरत असलेली शिक्षक पदे रद्द होऊ नयेत, यासाठी काही शाळांकडून विद्यार्थी पटसंख्या वाढवून दाखवली जात असल्याची चर्चा आहे. यासाठी विनाअनुदानित शाळांकडून विद्यार्थी आणि त्यांच्या माहितीची देवाणघेवाण किंवा खरेदी-विक्रीसारखे प्रकार घडत असल्याचेही समोर येत आहे. विद्यार्थी प्रत्यक्षात एका शाळेत शिक्षण घेत असताना त्यांची नोंद दुसऱ्याच शाळेत दाखवली जाते का, यासारख्या बाबींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वाची ठरली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठीच शिक्षण विभागाने ऑनलाइन आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष पडताळणीचा मार्ग स्वीकारला आहे.

शालार्थ प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर तपासणीला महत्त्व

जिल्ह्यात शिक्षक नियुक्त्या, वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी प्रकरणांचा विषय आधीच चर्चेत आहे. ऑक्टोबरमध्ये २०१६ ते २०१९ या कालावधीतील प्राथमिक विभागाच्या ७६१, तर माध्यमिक विभागाच्या ९०३ संचिका शिक्षण संचालनालयाने पुणे येथील कार्यालयात मागविल्या होत्या. यापूर्वी २०१९ ते २०२५ या कालावधीतील शालार्थ आयडी प्रकरणांशी संबंधित तब्बल १० हजार ६० संचिकांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपासणी करण्यात आली होती. त्यामुळे आता विद्यार्थी पटसंख्येच्या पडताळणीकडेही शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


दोन दिवसांच्या या विशेष मोहिमेत केलेल्या तपासणीचा सविस्तर अहवाल सोमवारपर्यंत (२ नोव्हेंबर) शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. या अहवालातून प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या आणि पोर्टलवरील नोंदी यांमधील तफावत स्पष्ट होणार आहे. ज्या शाळांच्या नोंदी संशयास्पद किंवा विसंगत आढळतील, त्यांच्याकडून खुलासा मागवून नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे ५१७ शाळांच्या तपासणीतून नेमके काय समोर येते आणि पटसंख्येच्या आकड्यांचा फुगवटा करणाऱ्यांवर शिक्षण विभाग कोणता कारवाईचा बडगा उगारतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

Read About : Urban Students Exam Fee Waiver Demand – ग्रामीण विद्यार्थ्यांना शुल्कमाफी, शहरी विद्यार्थ्यांना मात्र शुल्काचा भुर्दंड!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.