जालना शहरासह जळकीबाजार फाट्याजवळील दुर्घटना
Jalna road accidents जालना/धावडा : जालना शहरातील नूतन वसाहत परिसरातील उड्डाणपुलावरून भरधाव मालवाहू कंटेनर सुमारे ५० फूल उंचीवरून खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात ट्रकमधील दोघांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा एकता ढाब्याजवळ ही दुर्घटना घडली. तर अन्य एका अपघातात सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार फाट्यावर रस्त्यावर उभ्या असलेल्या पंचर ट्रॅक्टर-ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जाळीचा देव येथील मिस्त्री काम करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहिल्या अपघातात बंगळुरू येथून विविध प्रकारचा माल घेऊन इंदूरकडे निघालेला भरधाव कंटेनर जालना शहरातील भाग्यनगर परिसरात उड्डाण पुलावरून ५० फूट खाली एका छाब्याच्या गेटच्या आत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. जितेंद्र यादव (वय ३५) आणि राम पंकज यादव (वय ४०, दोघेही रा. छतरपूर, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंटेनरमध्ये बंगळुरू येथून रेंज हूड, गॅस गिझर, लॉजिस्टिक साहित्य तसेच भंगार असा माल भरण्यात आला होता. हा माल घेऊन कंटेनर इंदूरच्या दिशेने रवाना झाला होता. दरम्यान, जालना शहराच्या बायपास परिसरात आल्यानंतर चालकाचा रस्ता चुकला. त्यामुळे बायपासचा मार्ग सोडून कंटेनर शहराच्या दिशेने वळला. शहरातून जात असताना कंटेनरचा वेग अधिक होता.
भाग्यनगर परिसरातील पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनर थेट पुलावरून एकता ढाब्याच्या गेटच्या आत खाली कोसळला. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने कंटेनरमधील जितेंद्र यादव आणि राम पंकज यादव यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. कंटेनर पुलावरून खाली कोसळल्याचा आवाज आणि घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक शैवाळे यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून मदत व बचावकार्य सुरू केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तर पोलीस अधीक्षक तेंगबिर सिंह संधू यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे भाग्यनगर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या अपघातामुळे शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जाळीचा देव येथील दोघांचा जागीच मृत्यू
शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत जाळीचा देव येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. सिल्लोड तालुक्यातील मादणी येथे मिस्त्री कामासाठी गेलेले चौघे जण काम आटोपून दुचाकीने आपल्या जाळीचा देव या गावी परतत होते. दरम्यान, जळकी बाजार फाट्यावर पंचर झालेली ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्यावर उभी होती. याचवेळी भरधाव दुचाकीने ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघेही गंभीर जखमी झाले.
या अपघातात संदीप शामधन मंडावत (वय ३४) आणि सचिन नंदू जामुंदे (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विकास भीमराव कपाटे (वय ४५) आणि प्रशांत व्यंदेशकर (वय ३५) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल भागवत शेळके, व्ही. आर. पवार आणि दगडू तडवी पुढील तपास करीत आहेत.
कुटुंबियांवर शोककळा
जळकी बाजार फाट्यावर झालेल्या अपघातातील मृत संदीप मंडावत यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. तर सचिन जामुंदे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा अचानक मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेने जाळीचा देव गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत दोघांवरही रविवारी गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Climate Change Wheat Protein : वाढत्या CO₂ मुळे गव्हातील प्रथिनांमध्ये बदल, चपातीची गुणवत्ता खराब होणार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.