मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
छत्रपती संभाजीनगर : Synthetic Track Olympic Medal- विभागीय क्रीडा संकुल येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकच्या सुविधेमुळे शहरातील खेळाडूंना दर्जेदार सरावाची संधी उपलब्ध होणार आहे. याच ट्रॅकवर सराव करणारा एखादा खेळाडू भविष्यात ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा किंवा कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल मैदान, स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) व युवा वसतिगृहाचे लोकार्पण रविवारी (दि.१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खा. संदिपान भुमरे, आ. सुहास शिरसाट, आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, क्रीडाप्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलात अतिशय सुंदर असा सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आला आहे. त्यासोबतच फ्लडलाइट्स आणि इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा लाभ घेऊन स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल. पुढील काळात आशियाई स्पर्धा, ऑलिम्पिक किंवा कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या या ट्रॅकवर सराव करणारा एखादा मुलगा किंवा मुलगी भारतासाठी पदक जिंकेल, असा मला विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले. या क्रीडा सुविधेच्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या समितीचे तसेच क्रीडा विभागाचे मुख्यमंत्र्यांनी मनापासून अभिनंदन केले. उत्कृष्ट सिंथेटिक ट्रॅक तयार करणाऱ्या सर्व संबंधितांचे कौतुक करत उपस्थित खेळाडूंना त्यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
क्रीडा विभागाला शिक्षण विभागाची साथ
हा सोहळ्या यशस्वितरित्या पार पाडण्यासाठी क्रीडा विभागाला शिक्षण विभागाची साथ मिळाली. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांच्या नियोजनानुसार ३५ शाळांमधील सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी खेळाचे महत्व सांगण्यात आले. याशिवाय देशभक्तीपर गिताच्या आयोजनामुळे वातावरण निर्मिती झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमण होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
१२ कोटी ७५ लाखांत सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल मैदान
विभागीय क्रीडा संकुलात १२ कोटी ७५ लाख रुपये खर्चून आठ लेनचा ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक व नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान विकसित करण्यात आले आहे. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी दहा लेन उपलब्ध आहेत. या सुविधांमुळे धावणे, अडथळा शर्यती, रिले, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक यांसारख्या विविध क्रीडाप्रकारांचा सराव व स्पर्धा घेता येणार आहेत. फुटबॉल मैदानावर आधुनिक स्प्रिंकलर सिंचन यंत्रणाही बसविण्यात आली आहे. दहा हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये चार उंच मास्टवर प्रत्येकी २२ याप्रमाणे एकूण ८८ दिव्यांची प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ११ कोटी ६७ लाख ४२ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. फ्लड लाईट्समुळे सायंकाळच्या वेळेतही खेळाडूंना सराव व स्पर्धांचे आयोजन करता येणार आहे. खेळाडूंच्या निवासासाठी चार कोटी रुपयांच्या निधीतून युवा वसतिगृह उभारण्यात आले आहे. यामध्ये १६ खोल्या, परिषद सभागृह, स्वयंपाकगृह, भोजनगृह, ग्रंथालय व वाचन कक्षाच्या सुविधा उपलब्ध आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनी धावण्याच्या स्पर्धांना प्रारंभ
लोकार्पणानंतर नूतन सिंथेटिक ट्रॅकवर मुली व मुलांच्या १०० मीटर प्रदर्शनी धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लॅप देऊन दोन्ही स्पर्धांना प्रारंभ केला. राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांत सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्यासमवेत छायाचित्रही काढले. यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना सिंथेटिक ट्रॅकची प्रतिकृती, अजिंठा-वेरूळ शिल्प असलेले सन्मानचिन्ह व त्यांच्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवर आधारित ‘डीएफ’ क्रीडा साहित्य संच भेट देण्यात आला.
Read About : National Under 14 Tennis Champion- राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेखचा दुहेरी मुकुट
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.