खाती ब्लॉक करेपर्यंत खेळ खल्लास : एकाच वेळी दोन बँक खाती अन् क्रेडिट कार्ड केले रिकामे
छत्रपती संभाजीनगर : Cyber fraud in Chhatrapati Sambhajinagar सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक करून सायबर लुटारूंनी अवघ्या पावणेचार तासांत ७ लाख ३० हजार ४६३ रुपयांवर डल्ला मारला. ही घटना सातारा परिसरात समोर आली आहे. भामट्यांनी एकाच वेळी दोन बँक खाती आणि एका क्रेडिट कार्डमधून परस्पर ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे ही रक्कम लंपास केली. बँकांशी संपर्क साधून खाती सुरक्षित करेपर्यंत सायबर भामट्यांनी खेळ खल्लास केला होता. १४ ऑक्टोबरला हा प्रकार घडला. या प्रकरणी ३१ ऑक्टोबरला सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीपकुमार बिश्वनाथ घोष (वय ७४, रा. इंद्र अमृत ऑरेंज सिटी, सातारा परिसर, पैठण रोड) असे फसवणूक झालेल्या निवृत्त ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. घोष हे पत्नीसह राहतात, तर त्यांचा मुलगा बंगळुरू येथे नोकरीस आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घोष हे घरी असताना अचानक त्यांच्या मोबाईलवर एकापाठोपाठ एक असे अनेक ई-मेल येऊ लागले. त्यांच्या बँक खात्यांमधून आणि क्रेडिट कार्डवरून परस्पर आर्थिक व्यवहार सुरू असल्याच्या सूचना आल्या. त्यांनी स्वत: कोणताही व्यवहार केलेला नसल्याने त्यांनी तातडीने आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाशी संपर्क साधून डेबिट व्यवहार बंद करण्याची विनंती केली. मात्र, बँकांशी संपर्क साधून खाती ब्लॉक होईपर्यंत रात्री ८ ते ११.५० या वेळेत सायबर गुन्हेगारांनी तिन्ही ठिकाणांहून मोठी रक्कम लंपास केली. यामध्ये आयसीआयसीआय बँक खात्यातून १ लाख ८३ हजार रुपये, एसबीआय खात्यातून ४८ हजार २ रुपये आणि आयसीआयसीआय बँकेच्या सॅफिरो क्रेडिट कार्डवरून ४ लाख ९९ हजार ७६१ रुपये असा एकूण ७ लाख ३० हजार ४६३ रुपयांचा गंडा घालण्यात आला.
खाती ब्लॉक करेपर्यंत लाखोंचा फटका!
मोबाईलवर ई-मेलचा पाऊस सुरू होताच ७४ वर्षीय घोष यांनी वेळ न दवडता दोन्ही बँकांशी संपर्क साधला. मात्र, बँकेची प्रक्रिया पूर्ण होऊन खाती आणि कार्ड ब्लॉक होईपर्यंत सायबर गुन्हेगारांनी पावणेचार तासांत तीन ठिकाणांहून सव्वासात लाखांहून अधिक रक्कम साफ केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे करत आहेत.
मोबाइल हॅक कसा झाला?
तक्रारदार घोष यांच्या मोबाइलमध्ये एपीके फाईल किंवा मालवेअर लिंक आली होती का? याबाबत नेमकी माहिती नाही, पण त्यांचा मोबाइल नेमका कशामुळे हॅक झाला? याचा पोलीस तपास करीत आहेत. त्यांनी कुठलाही ओटीपी किंवा पासवर्ड दिलेला नसताना ही फसवणूक झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे सायबर तज्ज्ञांपुढेही हा नवीन प्रकार आहे.
Read About : Pregnant Woman Suicide – सहा महिन्यांच्या गर्भवतीची गच्चीवरून उडी मारून आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.