सोयगाव तालुक्यातील २० गावांतील ५ हजार ऊस तोड कामगार स्थलांतरित
Soygaon sugarcane workers migration सोयगाव (छत्रपती संभाजीनगर) : एका बाजूला दिवाळीच्या पणत्यांनी घरे उजळण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. नवीन कपडे, फराळ, फटाके आणि सणाच्या आनंदात शहरांसह गावागावांत उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, याच दिवाळीत तालुक्यांतील काही गावातील व तांड्यांवर वेगळेच चित्र दिसत आहे. घरात दिवा लावण्याऐवजी संसाराचे ओझे बांधून लेकराबाळांसह परराज्याची वाट धरली जात आहे. कारण, त्यांच्या घरात दिवाळी साजरी करण्यापेक्षा दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न मोठा झाला आहे. ही केवळ ऊसतोड कामगारांची यात्रा नाही, तर दुष्काळाने त्यांच्या आयुष्यावर ओढवलेली जगण्याची सक्ती आहे.
सोयगाव तालुक्यांमधील सुमारे २० ते २५ गावातील जवळपास ५ हजार ऊसतोड कामगार दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर करतात. महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यांसह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांतही त्यांच्या टोळ्या जातात. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे
सोयगाव तालुक्यात दुष्काळाच्या झळा गंभीर झालेल्या असून सप्टेंबरमध्येच ऊसतोडणीसाठी संसाराचे साहित्य आणि लेकराबाळांसह परराज्याच्या दिशेने निघालेली आहेत ऊसतोड कामगारांची कुटुंबे. दुष्काळा मुळे दिवाळीच्या सणातही पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.ग्रामीण भागात दिवाळी म्हणजे कुटुंब एकत्र येण्याचा, घर सजवण्याचा आणि आनंद वाटण्याचा सण. पण ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांसाठी हा सणही स्थलांतराच्या तयारीत जात आहे. घरातील लहान मुलांना शाळा, मित्र आणि गाव सोडून आई-वडिलांसोबत ऊसाच्या फडावर जावे लागले आहे.
दुष्काळ जाहीर झाला; पण जगण्याचा प्रश्न कायम !
यंदा कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती
यंदा कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून दुष्काळ जाहीरही करण्यात आला आहे. मात्र, या गावातील कुटुंबांना प्रत्यक्ष दिलासा किती मिळाला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. गावात रोजगार उपलब्ध झाला असता, तर कदाचित दिवाळीत घराला कुलूप लावून त्यांना बाहेर पडावे लागले नसते.दुष्काळाची व्याख्या पावसाच्या आकडेवारीत मोजता येईल; पण त्याची खरी तीव्रता त्या घराच्या बंद दरवाजात दिसते, जिथे दिवाळीच्या दिवशी पणती पेटत नाही. ज्या अंगणात लेकरांचा किलबिलाट असायला हवा, तिथे स्थलांतराची शांतता पसरलेली असते. ज्या हातांनी घर सजवायला हवे, तेच हात पोटासाठी ऊस तोडायला निघतात.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Climate Change Wheat Protein : वाढत्या CO₂ मुळे गव्हातील प्रथिनांमध्ये बदल, चपातीची गुणवत्ता खराब होणार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.