इंग्रजीत लिहिली, गायली आणि संगीतबद्धही केली तब्बल १५ गाणी
मुंबई : Himesh Reshammiya 15 English Songs – ‘आशिक बनाया आपने’, ‘झलक दिखला जा’, ‘तेरा सुरूर’ यांसारख्या गाजलेल्या गाण्यांनी संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करणारा गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया आता काहीतरी वेगळे करण्याच्या तयारीत आहे. आजवर हिंदी गाण्यांमधून लोकप्रिय झालेला हिमेश आता थेट आंतरराष्ट्रीय संगीतविश्वात आपले नशीब आजमावणार आहे. विशेष म्हणजे, त्याने इंग्रजी भाषेत तब्बल १५ गाणी तयार केली आहेत. या गाण्यांचे बोलही त्याने स्वत: लिहिले आहेत, संगीतही स्वत: दिले आहे आणि ती गायलीदेखील आहेत. आणखी एक खास गोष्ट म्हणजे, या १५ गाण्यांपैकी एक गाणे जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानासाठी अगदी योग्य असल्याचा खुलासा हिमेशने केला आहे. त्यामुळे त्याच्या आगामी आंतरराष्ट्रीय अल्बमची चर्चा सुरू झाली आहे.
इंग्रजीत १५ गाणी तयार, हिमेशचा मोठा खुलासा
हिमेश रेशमियाने अलीकडेच प्रसिद्ध मुलाखतकार कोमल नाहटा यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीत त्याला आंतरराष्ट्रीय संगीतक्षेत्रातील कोणत्या गायक किंवा गायिकेसोबत काम करायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नाचे उत्तर देण्याआधीच हिमेशने एक मोठे गुपित उघड केले.
तो म्हणाला, ”मी इंग्रजी भाषेत १५ गाणी तयार केली आहेत, हे आजवर फार कमी लोकांना माहीत आहे. या गाण्यांचे लेखन, गायन आणि संगीतनिर्मिती मी स्वत: केली आहे. विशेष म्हणजे, ही गाणी केवळ इंग्रजीत आहेत म्हणून परदेशी गाण्यांची नक्कल वाटणार नाहीत. त्यांच्यात स्वत:ची वेगळी ओळख आणि संगीतशैली आहे. ही गाणी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी तयार केली आहेत.”
हिमेशच्या या वक्तव्यामुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे काम केल्यानंतर आता तो इंग्रजी गाण्यांच्या माध्यमातून जगभरातील श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची तयारी करत आहे.
मोठ्या प्रमाणावर होणार अल्बमचे लॉन्चिंग
आपल्या इंग्रजी गाण्यांचा अल्बम कधी प्रदर्शित करणार, याबाबतही हिमेशने माहिती दिली. सध्या तो अनेक चित्रपट आणि इतर कामांमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे या अल्बमच्या लॉन्चिंगसाठी त्याला अद्याप पुरेसा वेळ देता आलेला नाही. मात्र, सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर हा अल्बम मोठ्या तयारीनिशी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याचा त्याचा विचार आहे.
याबाबत बोलताना हिमेश म्हणाला, ”भारतात ज्या पद्धतीने गायक म्हणून माझी ओळख निर्माण झाली आणि मला लॉन्च करण्यात आले, त्याच पद्धतीने आता मी माझा इंग्रजी अल्बम जगभरातील प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या अल्बममधील पहिले गाणेही जागतिक स्तरावर मोठ्या थाटात प्रदर्शित केले जाईल. हा एखाद्या आंतरराष्ट्रीय गाण्यात काही ओळी गाण्याचा प्रयत्न नाही. हा संपूर्ण अल्बम इंग्रजी सगीत ऐकणाऱ्या जगभरातील श्रोत्यांसाठी तयार केला आहे” म्हणजेच हिमेश केवळ आंतरराष्ट्रीय गाण्यांमध्ये पाहुणा कलाकार म्हणून सहभागी होणार नाही, तर स्वत:च्या गाण्यांच्या जोरावर जागतिक संगीतविश्वात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
‘आशिक बनाया आपने’प्रमाणेच पुन्हा एकदा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
हिमेश रेशमियाचे नाव घेतले की अनेकांच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम ‘आशिक बनाया आपने’ हे गाणे येते. २००५ मध्ये आलेल्या या गाण्याने त्याच्या गायकीला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यावेळी त्याचा वेगळा आवाज ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले होते. कारण संगीतकार म्हणून ओळख असलेल्या हिमेशने गायक म्हणूनही प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली होती.
आता इंग्रजी गाण्यांच्या बाबतीतही असाच अनुभव येईल, असा विश्वास हिमेशला वाटतो. त्याने सांगितले की, या अल्बममधील गाणी अतिशय वेगळी असतील. त्यात रोमँटिक गाण्यांचाही समावेश आहे. या गाण्यांच्या दर्जाबद्दल आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल तो खूप उत्सुक आहे.
हिमेशच्या मते, ज्याप्रमाणे ‘आशिक बनाया आपने’ ऐकताना लोकांना त्याचा आवाज कसा असेल याची कल्पना नव्हती, त्याचप्रमाणे त्याची इंग्रजी गाणी ऐकल्यानंतरही श्रोत्यांना एक वेगळाच अनुभव मिळेल.
रिहानासाठी खास गाणे तयार, हिमेशला तिच्यासोबत करायचे काम
या संपूर्ण मुलाखतीतील सर्वांत मोठी चर्चा रंगली ती रिहानाच्या नावामुळे. आंतरराष्ट्रीय संगीतविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध पॉपस्टार रिहानासोबत काम करण्याची संधी मिळाली तर कोणते गाणे सादर करायला आवडेल, असा प्रश्न हिमेशला विचारण्यात आला.
यावर त्याने सांगितले की, त्याने तयार केलेल्या १५ इंग्रजी गाण्यांपैकी एक गाणे रिहानाच्या आवाजासाठी अगदी योग्य आहे. त्याच्या मते, हे गाणे रिहानाने गायले तर त्याला एक वेगळीच उंची मिळू शकते.
हिमेशच्या या विधानामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. कारण भारतीय संगीतविश्वातील लोकप्रिय गायक आणि आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना यांचे एकत्र येणे ही संगीतप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरू शकते. मात्र, या सहकार्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. हिमेशने केवळ आपली इच्छा आणि त्या गाण्याबद्दलचा विश्वास व्यक्त केला आहे.
ब्लूमबर्गच्या यादीचा उल्लेख, जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न
या मुलाखतीत हिमेशने ब्लूमबर्गच्या जगातील आघाडीच्या पॉपस्टार्सच्या यादीत स्थान मिळाल्याचाही उल्लेख केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अल्बम प्रदर्शित करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे त्याला वाटते. स्वत:च्या संगीताला जागतिक प्रेक्षकांसमोर आणण्याची ही चांगली संधी असल्याचे त्याने सांगितले.
हिमेश रेशमियाने आतापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत गायक, संगीतकार आणि अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याच्या गाण्यांची शैली अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. काही गाण्यांवर टीका झाली, तर अनेक गाणी प्रचंड लोकप्रियही झाली. मात्र, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा त्याचा प्रयत्न कायम राहिला आहे. आता इंग्रजी गाण्यांच्या माध्यमातून तो आणखी एक नवा प्रयोग करणार आहे.
हिमेशचा आवाज आता जगभर घुमणार? चाहत्यांना अल्बमची प्रतीक्षा
१५ इंग्रजी गाणी, स्वत:चे लेखन, स्वत:चे संगीत, स्वत:चा आवाज आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भव्य लॉन्चिंगची तयारी… हिमेश रेशमियाचा हा नवा प्रकल्प नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे. विशेष म्हणजे, रिहानासाठी योग्य असलेले गाणे त्याने आधीच तयार केल्याचा खुलासा केल्यामुळे या अल्बमबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
आता प्रश्न एवढाच आहे की, हिंदी गाण्यांनी भारतीय श्रोत्यांना वेड लावणारा हिमेश इंग्रजी गाण्यांनी परदेशातील संगीतप्रेमींची मने जिंकू शकेल का? त्याच्या १५ गाण्यांपैकी रिहानाला खरोखरच एखादे गाणे आवडेल का? आणि या दोघांचा आवाज एकाच गाण्यात ऐकण्याची संधी चाहत्यांना मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळतील. पण एक मात्र नक्की, हिमेशने आता आपल्या संगीताची सीमा भारतापुरती ठेवलेली नाही, नसून त्याचे पुढचे लक्ष्य संपूर्ण जग आहे.
Read About: Dil Ki Bewafaiyaan serial – गौरव-श्रद्धाची जोडी जमली, प्रेमात होणार ‘बेवफाई’?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.