गोपनीयता आणि बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण करत एआय मॉडेल्सना डेटाचा वापर करता यावा, यासाठी मेईटीने तयार केले हँडबुक
नवी दिल्ली : India DEPA Framework भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील महत्त्वाकांक्षांना मोठे बळ देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने’ (मेईटी) एक मोठे पाऊल उचलले आहे. गोपनीयतेचे रक्षण करत एआय मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी डेटा सुरक्षितपणे शेअर करता यावा, यासाठी मंत्रालयाने ‘डेटा एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन आर्किटेक्चर’ (डेपा) या रूपरेषेचे हँडबुक तयार केले आहे. यात डेटा नाही, तर एआय मॉडेलच डेटाकडे जाणार आहे.
बंगळुरू येथे आयोजित एका उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत मेईटीचे सचिव एस. कृष्णन यांच्या हस्ते आणि आयस्पर्ट फाउंडेशनच्या सहकार्याने हे हँडबुक लाँच करण्यात आले. डेटा सुरक्षा, आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहकार्य आणि जबाबदार एआय वापराच्या दृष्टीने भारताचे हे पाऊल जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण मानले जात आहे. India DEPA Framework
काय आहे ‘डेपा’?
India DEPA Framework अनेकदा गोपनीयता, बौद्धिक संपदा अधिकार (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी) आणि डेटा चोरीच्या भीतीमुळे संस्था आपला महत्त्वाचा डेटा शेअर करण्यास कचरतात. हीच अडचण दूर करण्यासाठी डेपा एक ‘तंत्रज्ञानात्मक आणि कायदेशीर’ चौकट उभी करते. या माध्यमातून संस्थांना आपल्या माहितीवर पूर्ण नियंत्रण ठेवून विशिष्ट उद्देशासाठी एआय प्रशिक्षणासाठी डेटा शेअर करता येईल.
महत्त्वाची वैशिष्ट्ये:
‘डेटा नाही, मॉडेलच डेटाकडे जाणार”: केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद यांनी स्पष्ट केले की, या प्रणालीमुळे मूळ डेटा दुसऱ्याला हस्तांतरित न करताही एआय मॉडेल्सना तो वापरता येईल. म्हणजेच ‘डेटा मॉडेलकडे जाण्याऐवजी, एआय मॉडेल स्वत: डेटाकडे जाईल.’ India DEPA Framework
त्रिस्तरीय सुरक्षा : या चौकटीत करारात्मक परवानग्या, नियंत्रित संगणन (कॉम्प्युटिंग) वातावरण आणि गोपनीयता रक्षण करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाफ करण्यात आला आहे.
डेटाच्या वापराचा मागोवा : एआय प्रशिक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान डेटा कुठून आला, त्याची परवानगी काय आहे आणि त्याचा कसा वापर होतोय, यावर पारदर्शकतेने लक्ष ठेवले जाईल.
दिग्गज काय म्हणतात?
भारताच्या एआय महत्त्वाकांक्षांना जबाबदार आणि सुरक्षित डेटा वापराची जोड मिळणे आवश्यक आहे. डेपा प्रशिक्षण चौकटीमुळे व्यापक स्तरावर विश्वसनीय डेटा सहकार्य शक्य होईल आणि डेटाच्या सुरक्षेसह मोठ्या डेटासेट्सचा मार्ग मोकळा होईल.
— एस. कृष्णन, सचिव, मेईटी
भारताच्या डेटा अर्थव्यवस्थेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. २०१६ मध्ये ‘यूपीआय’ची झालेली सुरुवात जेवढी महत्त्वाची होती, तितकाच मोठा प्रभाव या चौकटीचा डेटा क्षेत्रात पडेल.
— शरद शर्मा, सह-संस्थापक, आयस्पर्ट फाउंडेशन
या चौकटीमुळे संशोधकांना विविध प्रकारच्या डेटासेट्सचा वापर करून अधिक मजबूत एआय मॉडेल्स विकसित करता येतील आणि डेटा मालकांच्या हक्कांचेही संरक्षण होईल.
— क्रिस गोपालकृष्णन, सह-संस्थापक, इन्फोसिस
Read About : Claude AI Drug Discovery – ॲलर्जीवरील उपचारासाठी क्लाऊडने तयार केली 35 हजार अँटीबॉडी डिझाइन्स!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.