विमान इंधनाच्या दरात प्रति लिटर १.३७ रुपयांची वाढ
नवी दिल्ली : Commercial LPG cylinder price hike : देशात रविवारपासून व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडर (१९-किलोग्रॅम)च्या दरात १० रुपयांची, तर विमान इंधना (एटीएफ)च्या दरात प्रति लिटर १.३७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत असल्याने देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे, पण घरगुती ग्राहकांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे. १४.२-किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९४२ रुपये इतकी स्थिर ठेवण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातसुद्धा कोणताही बदल झालेला नाही.
पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १० रुपयांनी वाढवून २,८२० रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी, १ ऑक्टोबर रोजी या सिलिंडरच्या किमतीत ६२.५० रुपयांची वाढ झाली होती. सप्टेंबरमध्येही हा सिलिंडर ९.५० रुपयांनी महाग झाला होता.
तथापि, जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याच्या किमती अनुक्रमे १८३.५० रुपये आणि १९२ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. जूनमध्ये, आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील तेजी आणि पुरवठ्यावरील निर्बंधांमुळे व्यावसायिक एलपीजीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या. फेब्रुवारी ते जूनदरम्यान, १९-किलोग्राम एलपीजी सिलिंडरच्या दरात एकूण १,३७३ ची वाढ झाली. या कालावधीत, त्याचे दर १,७४०.५० रुपयांवरून ३,११३.५० रुपयांपर्यंत वाढले.
४० टक्के खर्च एटीएफवर
नव्या दरवाढीने दिल्लीत एटीएफचा दर प्रति लिटर १३७.१२ रुपयांवरून १३८.५० रुपये झाला आहे. विमान इंधनाच्या दरात वाढ होण्याचा हा सलग चौथा महिना आहे. यापूर्वी, १ ऑक्टोबर रोजी एटीएफच्या दरात प्रति लिटर १६ रुपयांची वाढ करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये प्रति लिटर ६.२८ रुपये आणि ऑगस्टमध्ये प्रति लिटर ५ रुपयांची वाढ झाली होती. विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चापैकी सुमारे ४० टक्के खर्च एटीएफवर होतो. परिणामी, वाढलेल्या एटीएफच्या किमतींमुळे विमान कंपन्यांचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कसे ठरतात दर
पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एटीएफ आणि एलपीजीच्या दरांचा आढावा घेतात. हे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील संबंधित उत्पादनांच्या बेंचमार्क किमती आणि रुपया-डॉलर विनिमय दराच्या आधारावर ठरवले जातात.
Read About : India GST Collection October 2026 – ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात 23 टक्के वाढ
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.