Ad Advertisement Ad Advertisement

Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela-दोन विश्वविक्रमांनी झाला सिंहस्थाचा श्रीगणेशा!

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण सोहळ्यातील २० कोटींचा खर्च लागला सार्थकी

Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela : नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक पर्वाचा श्रीगणेशा ठरलेला धर्मध्वजारोहण सोहळा २० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या नियोजनातून दिमाखात पार पडला. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि १३ आखाड्यांचे प्रमुख महंत यांच्या उपस्थितीने सोहळ्याला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. रामकुंड ते कुशावर्त तीर्थापर्यंत विद्युत रोषणाई, भव्य व्यासपीठे, चोख सुरक्षा व्यवस्था आणि तीन हेलिपॅड अशा सुविधांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर नगरीला आंतरराष्ट्रीय सोहळ्याचे स्वरूप लाभले.

सामूहिक शंखनाद आणि गोदा महाआरतीच्या माध्यमातून दोन विश्वविक्रमांची नोंद झाली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ परिसरातील व्यासपीठे, बॅरिकेडिंग, तंबू आणि अन्य सुविधांसाठी ११.१३ कोटी रुपयांची तरतूद केली होती. रामकुंड येथील ध्वजारोहण, गोदा महाआरती आणि सामूहिक शंखनादासाठी दोन कोटी पाच लाख रुपये, तर त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ व नवीन घाट परिसरातील तात्पुरत्या विद्युत व्यवस्थेसाठी ७४ लाख ५० हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत या कामांना तातडीने मान्यता देण्यात आली. निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने नियोजन केले. आकर्षक रोषणाई आणि भव्य व्यवस्थेमुळे दोन्ही तीर्थक्षेत्रांचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव खुलून आले. या सोहळ्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनाची, प्रशासकीय सज्जतेची आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनाची प्रभावी झलक देशासमोर मांडली. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख देणारा हा सोहळा ठरला.

सुरक्षित हवाई वाहतुकीसाठी तीन हेलिपॅड

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुरक्षित व जलद हवाई वाहतुकीसह आपत्कालीन व्यवस्थेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्र्यंबकेश्वर येथे सुमारे २.४७ कोटी रुपये खर्चून तीन हेलिपॅड उभारली. सिंहस्थ काळातही ही सुविधा महत्त्वाच्या दौऱ्यांसाठी आणि आपत्कालीन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहे.

पायाभूत सुविधांना गती

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि अन्य शासकीय यंत्रणांनी रस्ते दुरुस्ती, चौकांचे सुशोभीकरण आणि स्वच्छतेची कामे केली. ओझर ते नाशिक मार्गाची नियमित देखभाल करून तो सुस्थितीत ठेवण्यात आला. ध्वजारोहणासाठी उभारलेल्या सुविधा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातही उपयुक्त ठरणार असून, या कामांमुळे कुंभमेळ्याच्या पायाभूत तयारीला गती मिळाली आहे.

Read About : Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela-सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलपर्वाचा अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ!

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.