बी.टेक. मेकॅट्रॉनिक्ससह डेटा ॲनालिसिस, जिओइन्फॉर्मेटिक्स आणि ॲग्रो बिझनेसचे अभ्यासक्रम सुरू होणार | मानसशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाही मंजुरी
छत्रपती संभाजीनगर : BAMU Career-Oriented Courses विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत विविध नवीन पदवी, पदव्युत्तर आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे अभियांत्रिकी, डेटा ॲनालिसिस, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, जिओइन्फॉर्मेटिक्स तसेच मानसशास्त्र क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या बैठकीत एकूण २४ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रात चार वर्षांचा बी.टेक. मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच बी.एस्सी. जिओइन्फॉर्मेटिक्स, बी.एस्सी. केमिस्ट्री, बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स विथ डेटा ॲनालिसिस आणि बी.एस्सी. प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव उपपरिसरात बी.बी.ए. अग्रो बिझनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच नवीन पर्याय उपलब्ध होतील.
मानसशास्त्र क्षेत्रातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात एम.ए. रिहॅबिलिटेशन सायकॉलॉजी, एम.ए. क्लिनिकल सायकॉलॉजी आणि याच विषयांशी संबंधित दोन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासही मान्यता देण्यात आली. यामुळे मानसिक आरोग्य, पुनर्वसन आणि समुपदेशन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणाची संधी मिळणार आहे.
नव्या व्यावसायिक क्षेत्रांकडे वळण्याची संधी
याशिवाय बी.ए. शिक्षणशास्त्र, बी.ए. योगशास्त्र आणि योग शिक्षकांसाठी फाउंडेशन सुरू करण्यासही अधिसभेने मंजुरी दिली. विविध विषयांमधील अभ्यासक्रमांचा विस्तार केल्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच नव्या व्यावसायिक क्षेत्रांकडे वळण्याची संधी मिळणार आहे. बैठकीत विद्यार्थी आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांशी संबंधित विषयांवरही चर्चा झाली. विद्यापीठाशी संलग्न स्वायत्त अशासकीय महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अराजपत्रित अधिकारी समजण्यात यावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला.
तसेच कॅस शिबिरांना विनाकारण गैरहजर राहणाऱ्या प्राचार्य आणि संस्थाचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबाबत समज देण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारांची अंमलबजावणी केल्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला. युवक महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि संचालक डॉ. कैलास अंभुरे यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला. या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. प्रविण वक्ते, कुलसचिव डॉ. संजय कवडे, चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि अधिसभेचे ४० सदस्य सहभागी झाले होते.
Read About : Urban Students Exam Fee Waiver Demand – ग्रामीण विद्यार्थ्यांना शुल्कमाफी, शहरी विद्यार्थ्यांना मात्र शुल्काचा भुर्दंड!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.