फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटकुमार पटेल यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर :Pharmacy Course Updates – फार्मसी क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि आधुनिक आरोग्यसेवेचा विचार करून फार्मसीच्या अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. गेल्या दहा-बारा वर्षांत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून (पीसीआय) अभ्यासक्रमांचे आवश्यक अद्ययावतीकरण झाले नव्हते. मात्र, आता अभ्यासक्रम अपडेट करण्यात आले असून, त्यात मेडिकल डिव्हाइस क्षेत्राचाही समावेश करण्यात आला आहे. या क्षेत्रासाठी स्वतंत्र अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली असून, त्यामुळे फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यासह नवीन उद्योग सुरू करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे, अशी माहिती फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटकुमार पटेल यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी हॉलमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मेडिकल डिव्हाइस क्षेत्रात फार्मसीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतील. तसेच या क्षेत्रातील विविध घटकांच्या समन्वयातून नवीन उद्योग उभारण्याचीही क्षमता आहे. हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना काम करण्याच्या अधिक संधी मिळतील. विद्यार्थ्यांना संशोधन करणेही नव्या अभ्यासक्रमांमुळे अधिक सोयीचे होणार आहे, असे पटेल यांनी स्पष्ट केले. औषधविक्री ही केवळ डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार औषधे देण्यापुरती मर्यादित नसून, औषधे देताना रुग्णांचे योग्य समुपदेशन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रुग्णांना औषधांचा योग्य वापर, मात्रा आणि घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यावर भर दिला जात आहे. रुग्णांची सुरक्षा हा फार्मसी सेवेचा मूलभूत आधार असून, त्यादृष्टीने आवश्यक बदल केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधविक्री केल्यास कारवाई
सध्या अनेक रुग्ण डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकल स्टोअरमधून औषधे घेतात. विशेषत: अँटिबायोटिक औषधांचा अनावश्यक आणि चुकीचा वापर केल्यामुळे त्यांची परिणामकारकता कमी होण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास मनाई असलेल्या औषधांची ओव्हर द काउंटर विक्री होता कामा नये. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषधविक्रेत्यांवर कारवाई केली जाऊ शकते. संबंधितांना दोन लाख रुपयांपर्यंत दंड होण्याबरोबरच प्रसंगी फार्मसीची नोंदणीही रद्द केली जाऊ शकते, असा इशारा डॉ. पटेल यांनी दिला. भावी फार्मासिस्टनी जबाबदारीने आणि नियमांचे पालन करून व्यवसाय केला पाहिजे. औषधांचा विवेकपूर्ण वापर आणि रुग्णांचे हित यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Read About :IVF Center Sambhajinagar – अनेक दांपत्यांच्या अपत्यप्राप्तीच्या स्वप्नांना मिळणार नवी आशा!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.