४ नोव्हेंबरला ६७ वा दीक्षांत समारंभ | राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन
छत्रपती संभाजीनगर : Bamu University 67th Convocation Ceremony डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६७ व्या दीक्षांत समारंभाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, ४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा सोहळा पार पडणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन यंदाचा दीक्षांत समारंभ अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला मुंबई येथील इन्स्टट्यिूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे (आयसीटी) कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या समारंभात प्रा. अनिरुद्ध पंडित दीक्षांत भाषण करणार असून, राज्यपाल जिष्णु देव वर्मा अध्यक्षीय मार्गदर्शन करणार आहेत. कुलगुरू डॉ. विजय फुलारी स्वागतपर व प्रास्ताविक भाषण करतील. प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव, चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ६६ वा दीक्षांत समारंभ ५ जानेवारी २०२६ रोजी झाला होता. त्यानंतर ६ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांच्या कालावधीत पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या ३३४ संशोधकांनी ६७ व्या दीक्षांत समारंभासाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये मानव्यविद्या शाखेतील सर्वाधिक १३१, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील १२४, आंतरविद्याशाखेतील ४८, तर वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र शाखेतील ३१ संशोधकांचा समावेश आहे.
याशिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या परीक्षांतील १० हजार ३३१, मार्च-एप्रिल २०२६ मधील ५५ हजार २५५ आणि विद्यापीठ परिसरातील १ हजार ६३९ पदवीधारक अशा एकूण ६७ हजार ५५९ विद्यार्थ्यांचा या दीक्षांत समारंभात समावेश असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.
Read About : BAMU Career-Oriented Courses – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे नवे दालन
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.