Ad Advertisement Ad Advertisement

Supreme Court BMC Commissioner salary freeze – मुंबई महापालिका आयुक्तांचा पगार रोखला

५ लाखांचा दंड आणि ‘कंटेम्प्ट’ची नोटीस; सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Supreme Court BMC Commissioner salary freeze : नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आश्विनी भिडे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक कारवाई केली आहे. न्यायालयाने आयुक्तांचा पगार रोखण्याचे आदेश दिले असून, त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमानाची (कंटेम्प्ट ऑफ कोर्ट) नोटीस बजावली आहे. तसेच महापालिकेला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.


सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत, न्या. जयमल बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने ‘पराग कन्स्ट्रक्शन वि. संध्या नांदेडकर’ आणि ‘बृहन्मुंबई महानगरपालिका वि. अनिल शहा’ प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हे आदेश दिले. बेस्ट उपक्रमाच्या पश्चिम उपनगरातील एका बस डेपोच्या जागेचा खासगी विकासकाकडून विकास करून घेण्याबाबत गेल्या दोन दशकांपासून न्यायालयात खटले सुरू आहेत. दुबे कन्स्ट्रक्शन्स या विकासकाने डेपोच्या जागेवरील ३,४०० चौ. मीटर जागा बस स्टॅन्डसाठी महापालिकेकडे हस्तांतरित करावी आणि तेथील अतिक्रमणे हटवावीत, असे निर्देश १३ ऑगस्ट रोजी दिले गेले होते.

विकासकाने जागा हस्तांतरित केली, परंतु अतिक्रमणे हटवण्याच्या बाबतीत महापालिकेने चालढकल केली. एकही दिवसाची अतिरिक्त मुदत देण्यास नकार देत, जोपर्यंत आदेशाची अंमलबजावणी होत नाही आणि तसे न्यायालयात येऊन सांगितले जात नाही, तोपर्यंत आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना १ डिसेंबरपर्यंत पगार मिळणार नाही, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाचे कडक शब्दांत ताशेरे

गेल्या नोव्हेंबरमधील आदेशानुसार अतिक्रमणे हटवल्याचा अहवाल सादर करण्यासाठी मंगळवारची मुदत होती. मात्र, मराठी कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर झाले नसल्याचे कारण देत महापालिकेने आणखी वेळेची मागणी केली. ही विनंती फेटाळत न्यायालयाने अधिकाऱ्यांवर कडक ताशेरे ओढले. अधिकाऱ्यांना मराठी कळत नाही, यावर आम्ही विश्वास ठेवावा असे तुम्हाला वाटते का? अतिक्रमणे करणाऱ्यांशी हातमिळवणी करून न्यायालयाचा आदेश न पाळण्याचा हा खोडसाळ प्रयत्न आहे, असे न्यायालयाने सुनावले.

Read About : Bomb Threat Email Maharashtra – महाराष्ट्रातील 8 हून अधिक जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.