Ad Advertisement Ad Advertisement

District Hospital Advanced X-Ray – जिल्हा रुग्णालयात 30 लाखांचे अत्याधुनिक एक्सरे मशीन

रुग्णांना मिळणार जलद आणि अचूक तपासणीची सुविधा!

छत्रपती संभाजीनगर : District Hospital Advanced X-Ray – चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांना अधिक जलद आणि अचूक एक्सरे तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे ३० लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक एक्सरे मशीन बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जुन्या मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने नवीन मशीन बसविण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. नवीन मशीन कार्यान्वित झाल्यानंतर एक्सरे तपासणीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होण्यास मदत होणार असून, रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात २०१६ मध्ये एक्सरे मशीन खरेदी करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून या मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत होता. साधारणत: १० ते १२ रुग्णांचे एक्सरे काढल्यानंतर मशीन गरम होऊन बंद पडत असे. जिल्हा रुग्णालयात दर महिन्याला जवळपास १ हजार ८०० रुग्णांचे एक्सरे काढले जातात. त्यामुळे मशीन बंद पडल्याचा परिणाम मोठ्या संख्येने रुग्णांवर होत होता. विशेषत: ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत होता. जिल्हा रुग्णालयात एक्सरेची सुविधा मोफत उपलब्ध असल्याने येथे रुग्णांची नेहमीच गर्दी असते. मात्र, मशीन बंद पडल्यामुळे काही रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये एक्सरे काढावे लागत होते. परिणामी त्यांच्यावर आर्थिक भार पडत होता. जुन्या मशीनच्या दुरुस्तीसाठी राज्यस्तरावर खासगी संस्थेला कंत्राट देण्यात आले होते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तंत्रज्ञांकडून दुरुस्ती केली जात होती. काही वेळा आवश्यक सुटे भाग मुंबई किंवा पुण्याहून मागवावे लागत असल्याने दुरुस्तीला विलंब होत होता.

नवीन मशीनमुळे तपासणीला मिळणार वेग

रुग्णांची गैरसोय कायमस्वरूपी कमी करण्याच्या दृष्टीने आता सुमारे ३० लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक एक्सरे मशीन बसविण्यात येत आहे. या मशीनमुळे रुग्णांचे एक्सरे अधिक जलद आणि अचूक पद्धतीने काढता येणार आहेत. त्यामुळे तपासणीसाठी लागणारा वेळ कमी होण्यासह रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासही मदत होणार आहे. नवीन मशीन कार्यान्वित झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील एक्सरे विभागाची कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.

नवीन मशीन सुरू होईपर्यंत पोर्टेबल एक्सरेची सुविधा

नवीन मशीन बसविण्याचे काम सुरू असतानाही रुग्णांची तपासणी थांबू नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. सध्या पोर्टेबल एक्सरे मशीनच्या माध्यमातून रुग्णांचे एक्सरे काढण्यात येत आहेत. त्यामुळे नवीन मशीन कार्यान्वित होईपर्यंतही रुग्णांना एक्सरे तपासणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
डॉ. कमलाकर मुदखेडकर (जिल्हा शल्यचिकित्सक)

Read About : Ayush Hospital Land Issue – छत्रपती संभाजीनगरच्या आयुष रुग्णालयाचा जागेअभावी प्रश्न रखडला!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.