महाराष्ट्राच्या लोककलेपासून भारत दर्शनापर्यंत विद्यार्थ्यांची बहारदार सादरीकरणे
छत्रपती संभाजीनगर : School Annual Gathering Madhura Welankar – मोबाईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात वाचनसंस्कृती, कौटुंबिक संवाद आणि माणुसकीची नाळ जपण्याचा मोलाचा संदेश प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. मुलांनी दररोज किमान दहा मिनिटे पुस्तके वाचावीत, पालकांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा आणि प्रत्येकाच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
एलोरा इंग्लिश स्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. मधुरा वेलणकर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक रंगांनी बहरले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे, ॲड. संदीप राजे भोसले, प्रा. अशोक तांबटकर, संस्थेचे सचिव प्रल्हाद शिंदे, प्राचार्य संगीता शिंदे आणि प्रा. अजिंक्य शिंदे यांची उपस्थिती होती.
पारंपरिक भाषणाची चौकट बाजूला ठेवत मधुरा वेलणकर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. गोष्टी, उदाहरणे आणि स्वत:च्या अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी जीवनातील महत्त्वाची मूल्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. आज एकाच घरात चार माणसे असतानाही प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे कौटुंबिक संवाद आणि जिव्हाळा कमी होत आहे. तंत्रज्ञान वाईट नाही, मात्र त्याचा वापर कसा आणि किती करायचा, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मोबाईल वापरण्याची वेळ निश्चित करा आणि मुलांना मोबाईलवर काय पाहायला मिळते, याकडे पालकांनीही लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित ‘एलोरा टॅलेंट’ स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने आदर्श पालकांचाही सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, नातवंडांच्या प्रगतीसाठी आणि जडणघडणीसाठी योगदान देणाऱ्या आजी-आजोबांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरजित कौर सौदी यांनी केले, तर निलाक्षी राव यांनी आभार मानले.
दररोज दहा मिनिटांचे वाचन घडवेल व्यक्तिमत्त्व!
मोबाईलच्या आकर्षणातून बाहेर पडून मुलांनी पुस्तकांशी मैत्री करावी, असे आवाहन करत त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. गोष्टी ऐकल्याने आणि पुस्तके वाचल्याने बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती आणि विचार करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज किमान दहा मिनिटे पुस्तक वाचण्याची सवय लावावी, असे त्यांनी सांगितले.
रंगीत फुग्यांची गोष्ट सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाचा सुंदर मंत्र दिला. फुग्याचा रंग महत्त्वाचा नसतो, तर त्यामध्ये भरलेली हवा त्याला उंच झेप घेण्यास मदत करते. त्याचप्रमाणे शिक्षकांनी दिलेले ज्ञान, संस्कार आणि मूल्ये विद्यार्थ्यांना आयुष्यात उंच भरारी घेण्याची ताकद देतात. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी शाळा आणि शिक्षकांना विसरू नका, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. तसेच मुलांची एकमेकांशी तुलना न करता प्रत्येकातील वेगळेपण ओळखून त्यांच्या आवडीनिवडी आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन पालकांना केले.
सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे पथनाट्य
स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम. देशभक्तीपर सादरीकरणांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागवली, तर भारुड, पोवाडा, वासुदेव, लावणी आणि कोळीगीतांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडले. शेतकरी नृत्यातून बळीराजाचे कष्ट आणि ग्रामीण जीवन उलगडले. व्यसनमुक्तीचा संदेश देणारे गीत, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करणारे सादरीकरण आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या पथनाट्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. वेस्टर्न डान्ससह नृत्याच्या विविध प्रकारांनी कार्यक्रमात रंगत आणली. ‘भारत दर्शन’ या संकल्पनेतून देशातील विविध प्रांतांची संस्कृती, वेशभूषा, परंपरा आणि नृत्यशैली यांचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.
Read About : Ayush Hospital Land Issue – छत्रपती संभाजीनगरच्या आयुष रुग्णालयाचा जागेअभावी प्रश्न रखडला!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.