Ad Advertisement Ad Advertisement

Solar Energy Homes Farmers – 56 हजारांहून अधिक घरांच्या छतांवर सौरऊर्जा संच

४४ हजार शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा लाभ | जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत विकास कामांचा आढावा

छत्रपती संभाजीनगर : Solar Energy Homes Farmers – ग्रामीण आणि शहरी भागातील वीजविषयक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासह सौरऊर्जेच्या माध्यमातून जिल्ह्याला ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी महावितरणकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार २०८ घरांच्या छतांवर १९७.३७ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा संच बसविण्यात आले असून, ४४ हजार २२२ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचा पर्याय उपलब्ध होत आहे.

जिल्हा विद्युत समितीची बैठक खासदार संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.४) महावितरणच्या परिमंडल कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील वीजविषयक विकासकामे, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, वीजगळती रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि विविध सौरऊर्जा योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला समितीचे सहअध्यक्ष खा. डॉ. कल्याण काळे, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता मनीष ठाकरे, अधीक्षक अभियंता बीना सावंत, प्रभारी अधीक्षक अभियंता विनय घनबहादूर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत स्मार्ट (स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर) योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादाची विशेष माहिती देण्यात आली. दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. दारिद्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार असून, यामुळे सुमारे २५ वर्षे मोफत वीज मिळण्याचा लाभ मिळणार आहे.

सरकारी अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थ्यांचा आर्थिक भारही कमी झाला आहे. पीएम सूर्यघर योजनेलाही जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ५६ हजार २०८ घरांच्या छतांवर सौर संच बसविण्यात आले आहेत. त्यांची एकूण स्थापित क्षमता १९७.३७ मेगावॅट आहे. दुसरीकडे, मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून ४४ हजार २२२ सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध होत असून, पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० अंतर्गत ३४६ मेगावॅट क्षमतेचे ५१ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील ३८५ कृषी वाहिन्यांवरील एक लाख ६३ हजार ६०१ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

शेतीपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण प्रगती मानली जात आहे. वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठीही महावितरणकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी असलेल्या काही कृषी वाहिन्यांवर लाईन कॅपॅसिटर बसविण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज मिळू लागली आहे. तसेच सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत वाहिनी विलगीकरणाची २०४ पैकी १९२ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. शेतशिवारातील घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष डिझाइन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत.

याशिवाय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० अंतर्गत नवीन उपकेंद्रे, उच्चदाब रोहित्रांची क्षमतावाढ आणि अतिरिक्त रोहित्रे बसविण्याच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. बैठकीत विकासकामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश खा. संदीपान भुमरे आणि उपस्थित लोकप्रतिनिधींनी दिले. लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेऊन विविध योजनांना गती देण्यासह जिल्ह्यात सुरळीत आणि दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रभारी मुख्य अभियंता मनीष ठाकरे यांनी दिली.

Read About : Urban Students Exam Fee Waiver Demand – ग्रामीण विद्यार्थ्यांना शुल्कमाफी, शहरी विद्यार्थ्यांना मात्र शुल्काचा भुर्दंड!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.