Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra farmers Diwali relief- सरकारची दिवाळी बळीराजाच्या दारात

स्वत:सह सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती; ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार जमा; मराठवाड्याला हक्काचे ७ टीएमसी पाणी देणार

Maharashtra farmers Diwali relief मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, पुढील दोन दिवसांत ९५ टक्के शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आपण स्वत: व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अपुऱ्या पावसामुळे राज्यातील ८५ टक्के भाग दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अंतरिम मदत दिली जात असून, उर्वरित ५ टक्के शेतकऱ्यांना बँक खात्यांतील तांत्रिक अडचणींमुळे रक्कम जमा होण्यास थोडा वेळ लागत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत बुधवारी ४ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ७६४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले. यात मराठवाड्यातील सर्वाधिक २ लाख ७६ हजार लाभार्थी आहेत.

आतापर्यंत जवळपास २१ लाख शेतकऱ्यांना सुमारे १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. लाभार्थी याद्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच उर्वरित खात्यांमध्ये रक्कम जमा होईल. भाजप, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्या महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित राहिलेल्या मराठवाड्याला महायुती सरकारनेच हक्काचे ७ टीएमसी पाणी दिले असून, त्याचे काम पूर्णत्वाच्या जवळ आले आहे. धाराशिव आणि बीड जिल्ह्यांना याचा मोठा लाभ होईल, असेही ते म्हणाले.

संविधान बदलण्याचा विरोधकांचा डाव

काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि विरोधी आघाडीच्या नेतृत्वात व्यवस्था परिवर्तनाचा प्रयत्न सुरू असून, हा प्रकार प्रत्यक्षात संविधान बदलण्याचाच डाव असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेबाबत ते म्हणाले की, हे मोर्चे अराजकतेच्या विरोधात आणि संविधानाच्या रक्षणासाठी आहेत. रस्त्यावर उतरणाऱ्यांपेक्षा लोकशाही आणि संविधानाला मानणाऱ्यांची संख्या मोठी असून, अराजकता रोखण्यासाठी आम्हीही रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊस आंदोलनावर तोडग्यासाठी मुश्रीफ यांच्याकडे जबाबदारी

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर-सांगली पट्ट्यात सुरू केलेल्या ऊस आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आंदोलनामुळे केवळ शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे. एफआरपी देणे बंधनकारक असताना त्यापेक्षा अधिक दराची मागणी होत असून, हा वाद कारखाने आणि शेतकरी यांच्यातील आहे. आंदोलन शांततेत संपवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे चर्चेची जबाबदारी दिली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Read About : Maharashtra Fodder Camps Biometric – चारा छावण्यांमध्ये बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही बंधनकारक

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.