Ad Advertisement Ad Advertisement

Ashti kidnapping case तरूणाचे अपहरण करून 11 लाखांची खंडणी उकळली

बीड जिल्ह्यातील प्रकार : हात बांधून चारचाकीत नेले टाकून

Ashti kidnapping case आष्टी : शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका तरूणाचे दोन अनोळखी व्यक्तींनी अपहरण करून त्यास मध्यरात्रीपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून पैशांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास पत्नी व आईला त्रास देण्यासह जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. अखेर अपहत व्यक्तीच्या चुलत भावाकडून ११ लाख रुपयांची खंडणी घेऊन तरूणाची सुटका केल्याप्रकरणी दोन अनोळखींविरुध्द अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आष्टी तालुक्यातील लोणी (स.) येथील अनेश विष्णू वाळके (३०) याने आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यात २ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनेश वाळके शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. २५ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० सुमारास तो कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गावातील सोमनाथ बेल्हेकर यांच्यासोबत शेतात गेला होता. त्याच्यासोबत गावातील काही व्यक्तीही शेतात आले होते. काही वेळाने सोमनाथ बेल्हेकर पाणी आणण्यासाठी निघून गेला. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती तेथे आले.

त्यांनी तक्रारदार अनेशच्या चेहऱ्यावर कापड टाकून दोन्ही हात पाठीमागे बांधले आणि दुचाकीवरून रेल्वे पटरीकडे नेले. त्यानंतर एका चारचाकी वाहनातून त्यांना कच्च्या रस्त्याने फिरवून एका ठिकाणी नेले. तेथे स्वच्छतागृहाची सोय असलेल्या खोलीत त्यांना ठेवण्यात आले. दरम्यान, बाथरूममध्ये गेल्यानंतर बाहेर उभी असलेली कार तक्रारदाराच्या निदर्शनास आली. त्यानंतर अनेश वाळके यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर आक्षेपार्ह बोलून त्रास देण्यात आला. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. रात्री दोन वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता.

पैसे मिळताच रस्त्यावर सोडून दिले

२६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजेपासून पुन्हा पैशांसाठी फोन येऊ लागले. तक्रारदाराचे चुलत भाऊ दीपक जालिंदर वाळके याला फोन करून कंपनीत पैसे भरायचे असल्याचे सांगण्यात आले. पैसे घेऊन अहिल्यानगरला येण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास दीपक वाळके अहिल्यानगर येथे पैसे घेऊन गेले. यावेळी एका संशयिताने दीपक यांच्याकडून ११ लाख रुपये घेतले अन् त्यानंतर अनेश यांना रेल्वे पटरीकडील रस्त्यावर सोडून देण्यात आले. संबंधित व्यक्तींकडून आपल्याला व कुटुंबीयांना धोका असल्याचे अनिश वाळके यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Read About : Husband Suicide After Wife Affair – पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची सासरवाडीतच आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.