राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले दीपप्रज्वलन
वॉशिंग्टन : Donald Trump Celebrates Diwali – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेले भारतीय वंशाचे अमेरिकन अधिकारी, उद्योजक आणि आघाडीच्या कंपन्यांच्या वरिष्ठ प्रमुखांसोबत व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून या विशेष समारंभाची सुरुवात केली.
या प्रसंगी अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा, प्रसिद्ध शेफ विकास खन्ना, जीओक्यूआईआई टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि सीईओ विशाल गोंडल, आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरविंद कृष्णा, मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे संजय मेहरोत्रा, एफबीआयचे संचालक काश पटेल आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे संचालक जय भट्टाचार्य प्रामुख्याने उपस्थित होते.
याशिवाय अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, सामाजिक सुरक्षा प्रशासनाचे उपआयुक्त अर्जुन मोदी, धल्ला ग्रुप ऑफ कंपनीजच्या अध्यक्षा रूबी धल्ला, नॅक सिस्टम्सचे संस्थापक राजीव शर्मा, केशवम डीसीचे अध्यक्ष विश्वजीत मल्लम्पती आणि राष्ट्राध्यक्षांचे विशेष अतिथी हेतलकुमार पटेल यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. उद्योजक विशाल गोंडल यांनी या सोहळ्याचे क्षण सोशल मीडियावर शेअर करत ‘ओव्हल ऑफिसमधील सामायिक प्रकाशाचा हा एक संस्मरणीय क्षण’ असल्याचे नमूद केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा आपला बहुमान असून, त्यांना ‘हनुमान चालीसा’ची प्रत भेट देताना अत्यंत अभिमान वाटल्याचे गोंडल यांनी सांगितले. दीपप्रज्वलनादरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री अधिक घट्ट व्हावी आणि अंधारावर प्रकाशाचा विजय व्हावा, अशी प्रार्थना केल्याचेही त्यांनी नमूद केले.
बुश यांच्या कार्यकाळात २००३साली सुरुवात
व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी करण्याच्या या परंपरेची सुरुवात २००३ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी केली होती. सुरुवातीला हे आयोजन ‘आयझेनहावर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंग’मध्ये केले जात असे. त्यानंतर २००९ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे व्हाइट हाउसच्या ‘इस्ट रूम’मध्ये दीपप्रज्वलन करणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले. तेव्हापासून व्हाइट हाउसच्या विविध भागांमध्ये, विशेषत: ओव्हल ऑफिस आणि रूझवेल्ट रूममध्ये हा दीपोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे.
Read About : US Midterm Election 2026 – मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का; दोन्ही सभागृहांवर डेमोक्रॅट्सचे वर्चस्व
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.