विद्यार्थ्यांचे आरोग्य डोळयासमोर ठेवून शिक्षण संचालनालयाचे पाऊल
नवी दिल्ली : Delhi Schools Hybrid Mode – वाढत्या वायुप्रदूषणामुळे राजधानी दिल्लीत इयत्ता पाचवीपर्यंतच्या शाळा ‘हायब्रिड मोड’वर चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवेची गुणवत्ता घसरत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य डोळयासमोर ठेवून शिक्षण संचालनालयाने हे पाऊल उचलले आहे.
इयत्ता पाचवीपर्यंतच्या सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांसाठी ‘हायब्रिड मोड’चे निर्देश जारी करण्यात आले आहेत. शिवाय नवी दिल्ली नगरपालिका (एनडीएमसी), महानगरपालिका आणि दिल्ली छावणी बोर्डच्या शाळांना देखील हे निर्देश लागू असतील. शालेय विद्यार्थी प्रदूषणाच्या विळख्यात अडकू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा किंवा घरूनच ऑनलाईन पद्घतीने शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. शनिवारी दिल्लीतील वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआ) ३६४ नोंदवण्यात आला आहे. ही ‘अतिशय खराब’ श्रेणी मानले जाते. सर्व ताज्या निर्देशांची योग्य व कठोर अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्यासाठी सर्व जिल्ह्यांच्या उपसंचालकांना प्रत्यक्ष शाळांना भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान इतर राज्यांमधील ‘बीएस-६’खालील वाहनांना बंदी
दिल्लीतील वायू प्रदूषणाची गंभीर समस्या लक्षात घेता आता दरवर्षी १ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत इतर राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेल्या आणि ‘बीएस-६’ पेक्षा कमी उत्सर्जन मानके असलेल्या सर्व वाहनांवर दिल्लीत प्रवेश बंदी असेल, असे शनिवारी राज्य सरकारने जाहीर केले. दिल्ली सरकारच्या हिवाळी कृती आराखड्यांतर्गत वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या नव्या नियमाची अंमलबजावणी १ नोव्हेंबर २०२६ पासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली असून, यामध्ये सर्व प्रकारच्या व्यावसायिक मालवाहू वाहनांसह (मोठी, मध्यम आणि अवजड वाहने) ऑल इंडिया टूरिस्ट परमिट अंतर्गत चालणाऱ्या सर्व ‘बीएस-४’ व त्यापेक्षा कमी मानकांच्या बसेसचा समावेश आहे. तथापि, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना या बंदीतून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.