Ad Advertisement Ad Advertisement

Sharad Pawar Discharged from Hospital – रुग्णालयातून डिस्चार्ज : ‘चाणक्य’ नव्या राजकीय पटांसाठी चार्ज!

‘सिल्व्हर ओक’वर पार्थ पवारांसह विविध नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; प्रकृतीच्या विचारपूससाठी भेटीचा नेत्यांचा दावा, मात्र यानंतरही विलीनीकरणाचे तर्कवितर्क जोरात

मुंबई : Sharad Pawar Discharged from Hospital प्रकृती अस्वास्थ्यामुळे तीन दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, ते ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दाखल होताच खासदार पार्थ पवारांसह दोन्ही बाजूंच्या महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. केवळ सदिच्छा आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट असल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असला, तरी आजारपणातून उठताच सुरू झालेल्या या जोरदार राजकीय उठबसमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील हा ‘चाणक्य’ नव्या राजकीय पटांसाठी पूर्ण ताकदीने चार्ज झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलीनीकरणाचे तर्कवितर्क अधिकच तीव्र झाले आहेत.

छातीत कफ आणि संसर्गाचा त्रास जाणवत असल्याने ८५ वर्षीय शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. मात्र, पवार सिल्व्हर ओकवर पोहोचताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार पार्थ पवार हे इतर नेत्यांसह त्यांच्या भेटीला पोहोचले. या वेळी शरद पवार यांच्या पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांनी भेट घेतली. रुग्णालयात असताना प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध नेत्यांनी घेतलेल्या भेटी आणि विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळातून आलेले दावे या पार्श्वभूमीवर, पवार घरी परतताच पार्थ पवार यांनी घेतलेल्या या थेट भेटीमुळे पडद्यामागील हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

घरीच उपचार सुरू राहणार – डॉ. प्रतित समदानी

ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना ब्राँकायटिस आणि छातीच्या संसर्गातून आराम मिळाला आहे. प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असली, तरी त्यांचे वय लक्षात घेऊन काही वैद्यकीय सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असला, तरी त्यांच्यावर घरीच काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू राहतील.

पवार भाजपसोबत जाणार नाहीत – संजय राऊत

शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील विरोधी आघाडीचे भक्कम स्तंभ असून, ते भाजपसोबत जाण्याची कोणतीही शक्यता नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या कथित संवादाच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत, अजित पवार गटाला महायुतीत सन्मान मिळत नसल्याने ते पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली परतण्यास उत्सुक असू शकतात; मात्र त्यांना सोबत घ्यायचे की नाही, याचा अंतिम निर्णय शरद पवारच घेतील, असे राऊत यांनी नमूद केले.

सुनेत्रा पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न – आमदार रोहित पवार

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेमागे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर दबाव आणण्याची रणनीती असू शकते, असा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. अजितदादा यांच्या निधनानंतर नेत्यांनी हा विषय नाकारला होता; मग आताच विलीनीकरणाचा दाखला का दिला जात आहे, असा सवाल करत पक्षांतर्गत महत्त्व कमी झाल्यानेच काही नेते हा दबाव आणत असावेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

Read About : Mahayuti alliance tensions in Maharashtra- महायुतीत पुन्हा धुसफूस?

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.