प्रयोगशाळेतील चाचणीत फ्लू विषाणूमुळे पेशींचे होणारे नुकसान कमी झाल्याचे निष्पन्न
बर्लिन : Medieval Mummy Powder मुमिया व्हेरा इजिप्टियाका नावाच्या या ममीच्या पावडरमध्ये इन्फ्लुएंझा विषाणूचा संसर्ग रोखण्याचे अनपेक्षित गुणधर्म असल्याचे आधुनिक शास्त्रज्ञांना आढळले आहे. जर्मनीच्या मारबर्ग युनिव्हर्सिटीच्या औषधनिर्माण शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हा खुलासा झाला असून आहे.
संशोधकांनी वेगवेगळ्या संग्रहालयांतून ममीचे अवशेष, कवट्या आणि औषधांच्या २४ ऐतिहासिक नमुन्यांचे रेणुकीय विश्लेषण केले. यापैकी एका ममीच्या डोक्यापासून तयार केलेल्या पावडरच्या अर्काची प्रयोगशाळेतील प्राण्यांच्या पेशींवर चाचणी करण्यात आली. या चाचणीत दिसून आले की, या अर्काने इन्फ्लुएंझा विषाणूमुळे पेशींचे होणारे नुकसान लक्षणीयरीत्या कमी केले.
कोणता घटक ठरला प्रभावी?
शास्त्रज्ञांना आढळले की, सर्व ऐतिहासिक ममी पावडरमध्ये अणकुचीदार सुईसारख्या पानाच्या झाडांची राळ वापरण्यात आली होती. या राळेमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. याशिवाय, काही नमुन्यांमध्ये प्रथमच कोरफडीचे अंशदेखील सापडले आहेत, ज्यामुळे प्राचीन इजिप्शियन ग्रंथांमधील एनएच-इमी म्हणजेच ज्यात जीवन आहे या शब्दाचा संबंध कोरफडीशी असावा, या सिद्धांताला बळ मिळाले आहे. मात्र, या औषधातील मुख्य रासायनिक घटक ७-ऑक्सोडीहायड्रोअबिएटिक ॲसिड स्वतंत्रपणे काम करताना निष्प्रभावी ठरला. त्यामुळे नेमक्या कोणत्या मिश्रणामुळे हा फ्लूविरोधी परिणाम झाला, याचे रहस्य अजूनही पूर्णपणे उलगडलेले नाही.
इतिहास आणि अंधश्रद्धा
इ.स. १३०० च्या सुमारास जखमा, हाडे मोडणे आणि रक्तस्राव थांबवण्यासाठी हे औषध सर्रास वापरले जात होते. ऐतिहासिक ग्रंथांमध्ये याचा वापर डोकेदुखी आणि खोकल्यासाठीही सुचवला होता. १८१४ मध्ये वैद्यकीय शब्दकोशाने याच्या कथित गुणधर्मांना फेटाळले होते, तरीही लोकांची यावरील अंधश्रद्धा कायम होती.
इतकेच नव्हे तर, प्रसिद्ध जर्मन फार्मास्युटिकल कंपनी ई. मर्क आपल्या १९२४ च्या कॅटलॉगमध्ये या ममी पावडरची विक्री करत होती, तर न्यूयॉर्कमधील एका दुकानात १९७३ पर्यंत जादूटोण्याच्या साहित्यात ही पावडर विकली जात होती. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, या निकालांचा अर्थ ममी पावडर मानवी फ्लूला पूर्णपणे बरी करू शकते असा नाही; परंतु यामुळे प्राचीन काळातील औषधनिर्मितीच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला आहे.
Read About : Avocado and Mango Benefits for Heart – दररोज अॅव्होकॅडो आणि आंबा खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते? संशोधनात मोठा खुलासा
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.