‘दिवाळी मिलन’कार्यक्रमात जुन्या आठवणींना दिला उजाळा; देशाची यशोगाथा जगासमोर आणण्याचे आवाहन
नवी दिल्ली : Media’s Role in Democracy आपली लोकशाही जिवंत ठेवण्यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. जुन्या काळातील पत्रकारितेपासून ते आजच्या इंस्टाग्राम रील्सपर्यंतच्या प्रवासावर भाष्य करताना त्यांनी पत्रकारांसोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
भारताने मिळवलेले नेत्रदीपक यश आणि प्रगतीची गाथा अर्थात ‘इंडिया स्टोरी’ प्रसारमाध्यमांनी जागतिक स्तरावर ठळकपणे मांडावी, असे आवाहनही मोदींनी केले. भाजप मुख्यालयात पत्रकारांसाठी आयोजित ‘दिवाळी मिलन’कार्यक्रमाला संबोधित करताना मोदींनी पूर्वीपासून पत्रकारांसोबत आपले चांगले संबंध असल्याचे नमूद केले. वर्ष २००१ मध्ये आपण गुजरातचे मुख्यमंत्री होणार असल्याची कुणकुण महिला पत्रकारांना आधीच लागली होती. त्या दिवशी महिला पत्रकारांचा एक गट अचानक माझ्या खोलीत शिरला. त्याकाळी दबदबा असणाऱ्या या महिला ब्रिगेडने थेट माझी कॉलर पकडून पेढ्यांची मागणी केली. मी पेढे कशाबद्दल म्हणून विचारणा केल्यानंतर त्यांनी आपण गुजरातचे मुख्यमंत्री बनत असल्याचे सांगितले. परंतु आपल्याला याबाबत काहीही कल्पना नसल्याचे दाखवण्याचा मी प्रयत्न केला होता, अशी मिश्किल आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
अतिशय मोजक्या लोकांनाच मी मुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती असतानादेखील या पत्रकारांकडे आधीच अचूक माहिती होती, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी त्यांनी तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदलत असलेल्या प्रसारमाध्यमांच्या स्वरूपावरही भाष्य केले. पूर्वी मोठमोठ्या ओबी व्हॅनसाठी प्रयत्न करावे लागत होते. मात्र, आजघडीला मोबाईल फोनच एक ओबी व्हॅन बनली आहे. आज प्रत्येकाकडे स्वत:चे विचार व्यक्त करण्याचे व्यासपीठ आहे, चॅनल आणि पॉडकास्ट आहे. पूर्वी म्हटले जायचे की, भारतात प्रत्येक गल्लीबोळात क्रिकेटचा तज्ज्ञ भेटेल. गावातील एखाद्या गल्लीत बसलेला व्यक्तीदेखील सचिन तेंडुलकरने काय चूक केली हे सांगायचा. आजघडीला प्रत्येक बातमीवर आपले मत मांडणारे तज्ज्ञ आहेत. याच विचारांच्या विविधतेमुळे आपली लोकशाही मजबूत बनते. यात प्रसारमाध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असे मोदी म्हणाले. तसेच प्रसारमाध्यमांच्या जगात काहीही अशक्य नसल्याची बाब आपल्यासाठी खूप विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले.
अपघात, भूकंप तथा पुरासारख्या संकटाच्या वेळी संपूर्ण जग त्या ठिकाणापासून पळ काढत असते. मात्र, पत्रकार स्वत:चा जीव धोक्यात घालून आणि कुटुंबाची चिंता न करता सर्वात आधी बातमी सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याठिकाणी पोहोचतात. अशाप्रकारची समर्पण वृत्ती दुर्मीळच आहे. या गोष्टींचा मी नेहमीच प्रशंसक राहिलो आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. पत्रकारांचे संपूर्ण जीवन डेडलाइन (वेळमर्यादा) च्या अवतीभोवती फिरते. देशासमोर देखील २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याची डेडलाइन आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी छोट्या-मोठ्या टप्प्यात काम करावे लागले, असे मोदी म्हणाले.
पित्रोदांनी मोदींना म्हटले ‘गुजराती मित्र’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कडवे टीकाकार म्हणून ओखळले जाणारे विदेशातील काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी अचानक मोदींचा उल्लेख ‘गुजराती मित्र’ म्हणून केला आहे. विशेष म्हणजे मोदींनी देखील यावर अत्यंत आत्मीयतेने उत्तर देत, पित्रोदा यांना दिवाळी आणि आगामी नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. या संवादामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. पित्रोदा हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी, मोदी हे आपले गुजराती मित्र असून एक व्यक्ती म्हणून आपण त्यांचा आदर करत असल्याचे म्हटले होते. मी माझ्या पत्नीसह मोदींना यापूर्वी भेटलो असून, त्यावेळी पंतप्रधानांनी अतिशय आपुलकीने व्यवहार केल्याचे पित्रोदांनी नमूद केले होते.
५० कोटी लोक दारिद्रयरेषेच्या वर आले
पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना देशाची यशोगाथा जगासमोर आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. तसेच मोदींनी आपल्या सरकारच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीवर प्रकाश टाकला आणि भारत निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला. एनडीए सरकार देशातून गरिबीचे निर्मूलन करण्यात यशस्वी झाले असून, ५० कोटी लोक दारिद्रयरेषेच्या वर आले आहेत. पूर्वी ‘गरिबी हटाओ’च्या घोषणा दिल्या जात होत्या, पण या सरकारने खरोखरच गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी काम केले आहे. जागतिक बँकेनुसार, गेल्या १२ वर्षांत ५० कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या गर्तेतून बाहेर आले आहेत, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवून भारताने इतिहास रचला.
सौरऊर्जा निर्मिती क्षमता ५० पटींहून अधिक वाढली
आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे, चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारला गेला आहे, सौरऊर्जा निर्मिती क्षमता ५० पटींहून अधिक वाढली आहे आणि जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था भारतात निर्माण झाली आहे. या यशोगाथांचा मोदींनी आवर्जून उल्लेख केला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना अमली पदार्थांच्या वाढत्या वापराबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Sharad Pawar Discharged from Hospital – रुग्णालयातून डिस्चार्ज : ‘चाणक्य’ नव्या राजकीय पटांसाठी चार्ज!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.